शरद पवारांच्या धक्कातंत्रानंतर हालचाली, शिवसेना 'प्लॅन बी' तयार करणार?

शरद पवारांच्या धक्कातंत्रानंतर हालचाली, शिवसेना 'प्लॅन बी' तयार करणार?

शिवसेनेनं प्लॅन बी तयार करावा, अशी मागणी शिवसेना नेत्यांकडून करण्यात येत असल्याची माहिती आहे.

  • Share this:

मुंबई, 19 नोव्हेंबर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आपल्या धक्कातंत्रासाठी ओळखले जातात. विधानसभा निवडणुकीत आम्हाला विरोधी पक्षात बसण्याचा कौल मिळाला आहे, असं म्हणणाऱ्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने नंतरच्या काळात शिवसेनेसोबत सत्तास्थापनेची बोलणी सुरू केली. मात्र पुन्हा शरद पवार यांनी गुगली टाकून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.

शरद पवार आणि काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यातील बैठकीनंतर महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा संभ्रम दूर होईल, अशी चर्चा होती. मात्र शिवसेनेबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. सत्तास्थापनेबाबत तुम्ही भाजप आणि शिवसेनेला विचारा, असं म्हणत शरद पवार यांनी खळबळ उडवून दिली. त्यानंतर शिवसेनाही गोंधळात पडली आहे. यातूनच शिवसेनेनं प्लॅन बी तयार करावा, अशी मागणी शिवसेना नेत्यांकडून करण्यात येत असल्याची माहिती आहे.

'शिवसेनेनं आता राष्ट्रवादीसोबत चर्चा करणं थांबवून पुन्हा भाजपसोबत चर्चा करावी,' असा मतप्रवाह शिवसेनेत तयार होत आहे. शिवसेनेच्या एका आमदाराने पक्षाकडे अशी मागणी केली आहे. याबाबत 'महाराष्ट्र टाईम्स' या दैनिकाने वृत्त दिलं आहे. त्यामुळे शिवसेना खरंच पुन्हा यू-टर्न घेत सत्तास्थापनेसाठी भाजपच्या पर्यायाचा विचार कऱणार का, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष असणार आहे.

शरद पवारांची गुगली, कुणाची जाणार विकेट?

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि राष्ट्रवादीचे शरद पवार यांच्या दिल्लीतल्या भेटीकडे महाराष्ट्राची नजर होती. राज्यात सरकार स्थापन होणार का, कधी होणार, कुणाचं होणार, शिवसेनेला साथ द्यायला काँग्रेस - राष्ट्रवादी तयार आहेत का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या भेटीनंतर मिळतील अशी अपेक्षा होती. पण सत्तास्थापनेचा पेच सुटण्यापेक्षा अधिकच वाढला आहे. सोनिया गांधींच्या भेटीनंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. त्या वेळी आमची फक्त राजकीय परिस्थितीविषयी आपसांत चर्चा झाली आहे. कुठलाही निर्णय किंवा चर्चेआधी स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेकाप अशा मित्रपक्षांबरोबर चर्चा आवश्यक आहे, असं शरद पवार यांनी म्हटलं. शिवसेनेविषयी आमच्यात काहीच चर्चा झाली नाही, असं शरद पवार म्हणाले.

VIDEO: सत्ता स्थापनेवरुन शरद पवारांच्या वक्तव्यामुळे मोठी खळबळ, पाहा काय म्हणाले

Published by: Akshay Shitole
First published: November 19, 2019, 3:47 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading