महाविकास आघाडीत रणकंदन, शिवसेना नेत्याची थेट अजित पवारांवर घणाघाती टीका

महाविकास आघाडीत रणकंदन, शिवसेना नेत्याची थेट अजित पवारांवर घणाघाती टीका

शिवसेनेचे आमदार आणि नाराज नेते तानाजी सावंत यांनी महाविकास आघाडीच्या सरकारला घरचा अहेर दिला आहे.

  • Share this:

उस्मानाबाद, 6 फेब्रुवारी : 'राज्य सरकारने कितीही नाटक केलं तरी केंद्राच्या मदतीशिवाय राज्यातील एकही प्रकल्प पूर्ण होणार नाही. मराठवाड्यावर राष्ट्रवादीने अन्याय केला,' असं म्हणत शिवसेनेचे आमदार आणि नाराज नेते तानाजी सावंत यांनी महाविकास आघाडीच्या सरकारला घरचा अहेर दिला आहे. तसंच राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.

'एका मंत्र्याने मराठवाड्याच्या ग्रीड योजनेला स्थगिती दिली. जी योजना आम्ही आणली होती. मराठवाड्यावर अन्याय केला तर हाणून पाडू, मराठवाडा पेटून उठेल,' असा इशारा देत तानाजी सावंत यांनी अजित पवारांवर टीका केली आहे. शिवसेनेच्या आमदारानेच राज्य सरकारवर हल्लाबोल केल्यामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, तानाजी सावंत यांनी काही पहिल्यांदाच सरकारविरोधात वक्तव्य केलं नाही. काही दिवसांपूर्वीही एका कार्यक्रमात त्यांनी वॉटर ग्रीड योजनेवरून सरकारवर निशाणा साधला होता. शिवसेनेनं मंत्रिपद नाकारल्यानंतर तानाजी सावंत नाराज झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे नाराज तानाजी सावंत सरकारसाठी डोकेदुखी ठरत असल्याचं दिसत आहे.

तानाजी सावंत आणि पक्षातील बेबनाव

उस्मानाबाद जिल्हापरिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीत शिवसेना उपनेते आ.तानाजी सावंत यांनी पक्षविरोधी भूमिका घेतल्याने शिवसेनेला धक्का बसला. सावंत यांनी भाजपचे नेते आ. राणाजगजितसिंह पाटील व आ.सुजितसिंह ठाकूर यांनी साथ देत भाजपा युतीचा झेंडा रोवला. राज्यात महविकास आघाडीचा बोलबाला असला तरी उस्मानाबाद जिल्हापरिषदेत नाट्यमय घडामोडी घडवत ही जिल्हा परिषद भाजपा शिवसेना यांनी ताब्यात घेतली.

उस्मानाबाद जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सावंत यांचे निकटवर्तीय लक्ष्मीकांत ठोंगे- पाटील हे शिवसेनेच्या सात सदस्यांच्या संपर्कात राहिलाचाही ठोंगे पाटलांवर आरोप आहे. तसंच शिवसेना जिल्हा परिषद सदस्यांच्या बंडखोरीमध्ये पाटील यांचाही वाटा असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं त्यांच्यावर कारवाई केली. तसंच समर्थकांवरील कारवाईनंतर आता थेट तानाजी सावंत यांच्यावरही शिवसेनेकडून कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सावंत यांना मंत्रिपद नाकारलं

मागील युती सरकारमध्ये मंत्री असलेल्या तानाजी सावंत यांना शिवसेनेनं यंदा मात्र मंत्रिपद दिलं नाही. त्यामुळे तानाजी सावंत पक्षावर नाराज असल्याचंही बोललं जात आहे. त्यातच जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांनी भाजपला मदत केल्याचा आरोप आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर तानाजी सावंत विरुद्ध शिवसैनिक असा संघर्ष निर्माण झाला आहे.

First published: February 6, 2020, 11:28 PM IST
Tags:

ताज्या बातम्या