02 नोव्हेंबर : देशाचा पंतप्रधान चहावाला होऊ शकतो तर पानटपरी चालवणार राज्याचा राज्यमंत्री का होऊ शकत नाही ? हे जनतेनं दाखवून दिलंय असं वक्तव्य राज्याचे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी केलंय. ते पाचोऱ्यातल्या सभेत बोलत होते.
पाचोरा नगरपरिषदेच्या वतीने महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान योजने अंतर्गत एकूण 60 कोटी 7 लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन, लोकार्पण आणि आमदार किशोर पाटील यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्या प्रसंगी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी तुफान फटकेबाजी केली.
शिवसेनेचे नेते आणि शिवसैनिक यांनी अनेक खस्ता खाल्या, संकटे झेलली, छगन भुजबळ, नारायण राणे, राज ठाकरे आणि भाजपने युती तोडल्यानंतर शिवसेना संपेल असं म्हटलं जात होतं, मात्र कार्यकर्त्यांच्या जोरावर शिवसेना पुन्हा एकदा ताकदीने उभी राहिल्याचे गुलाबराव पाटील यांनी म्हटलं.
राजकारणात प्रत्येक दिवस सारखा नसतो, एक काळ असा होता कोणतेही सण आले की पोलीस आपल्याला विविध गुन्ह्यांखाली उचलून जेलमध्ये टाकायचे आता मात्र काळ बदलला आहे तेच पोलीस आपण मंत्री झाल्यापासून आपल्या संरक्षणासाठी पुढे एक गाडी मागे एक गाडी आणि मध्ये गुलाब गडी अशा रीतीने मागे फिरत आहेत असं वक्तव्य राज्याचे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी केलंय. ते पाचोऱ्यातल्या सभेत बोलत होते.
नारायण राणे यांचा मंत्रिमंडळात समावेश आता निश्चित मानला जात आहे यावर बोलताना गुलाबराव पाटील यांनी त्यांना शुभेच्छा देत त्यांनी तिसऱ्या घरातील संसार नीट करावा असा सल्ला नारायण राणे यांना दिलाय.
'खडसेंची मंत्रिमंडळ वापसी अशक्य'
नारायण राणे यांना मंत्रीमंडळात स्थान देण्याच्या विषयावरून खडसे यांनी नुकतीच नाराजी व्यक्त केली होती. या विषयावर गुलाबराव यांनी खडसे यांच्याशी आपले काही बाबतीत मतभेद आहेत. मात्र, त्यांनी पक्षासाठी मोठे काम केले आहे. हे मान्य करावे लागेल आणि त्यांच्यावर मागील काळात झालेले आरोप पहाता खडसेंना मंत्रीमंडळात घेतले जाणार नाही असं आपल्याला वाटतं असंही ते म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Gulabrao patil, गुलाबराव पाटील, जळगाव, शिवसेना