मुंबई, 21 मार्च : महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा आठवडा सुरू आहे, पण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी अधिवेशनातून काढता पाय घेतला आहे. विधिमंडळाच्या पायऱ्यांना नमस्कार करून भास्कर जाधव माघारी निघाले, तसंच पुन्हा विधिमंडळात यायची इच्छा नसल्याची भावनिक प्रतिक्रियाही भास्कर जाधव यांनी दिली आहे. विधानसभेमध्ये बोलू दिलं जात नसल्यामुळे आपण हा निर्णय घेतल्याचं भास्कर जाधव म्हणाले.
'मी आज विधानसभेतून बाहेर पडलो, उद्या गुढीपाडवा आहे, नंतर तीन दिवस बैठका आहेत. मी शहर सोडत आहे, पुन्हा येणार नाही, कारण यायची इच्छा नाही. भास्कर जाधव सभागृहात न चुकता जातो, पण यावर्षी मला जाणूनबुजून बोलण्याची संधी दिली जात नाही. मी नियमानुसार बोलण्याचा आणि सभागृहाला कायद्यानुसार चावण्याचा आग्रह धरतो,' असं भास्कर जाधव म्हणाले.
'विधिमंडळाच्या परंपरा, कामकाजाचे नियम, कायदे आणि संविधानाचं पालन केलं गेलं पाहिजे. मी दोन मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केला, पण कुणीही त्याच्याकडे लक्ष दिलं नाही, त्यामुळे मनाला त्रास झाला. जर मला सभागृहात बोलण्याची संधी मिळाली असती तर मी महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला असता. कोकणातले रस्ते सुधारण्यासाठी एका अभ्यास गटाची स्थापना करणं गरजेचं आहे, ज्यामुळे अधिकाऱ्यांच्या काळ्या कारनाम्यांचा पर्दाफाश होईल,' असं वक्तव्य भास्कर जाधव यांनी केलं.
'मी विदर्भ मराठवाड्याच्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा मुद्दा उपस्थित करणार होतो. कोकणावर बरीच नैसर्गिक संकटं आली. पुरामुळे चिपळूण, महाडचे बाजार डुबले, कोट्यवधींचं नुकसान झालं. शेतकऱ्यांना फटका बसला. देवाच्या कृपेने कोकणात एकाही शेतकऱ्याने आत्महत्या केली नाही. या लोकांची मानसिकता संकटात उभं राहण्याची असते. काहीही झालं तरी आत्महत्या करायची नाही, एवढी आत्मनिर्भरता येते कुठून? मी विदर्भ आणि मराठवाड्याच्या शेतकरी आत्महत्येचा मुद्दा उचलून धरणार होतो, पण मला बोलू दिलं गेलं नाही,' अशी खंत भास्कर जाधव यांनी व्यक्त केली.
विदर्भ, मराठवाड्याचा शेतकरी गंभीर संकटात आहे, त्याला अवकाळी पावसाचा सामना करावा लागत आहे. पिकाला हमीभाव मिळत नाही, कोणतीही गॅरंटी दिली जात नाही, त्यामुळे शेतकरी आत्महत्येचा मार्ग स्वीकारतात. अशी वेळ कुणावरही येऊ नये. शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये, अशी आमची भावना आहे, अशी प्रतिक्रिया भास्कर जाधव यांनी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bhaskar jadhav, Shivsena