इम्तियाज अहमद(प्रतिनिधी)
भुसावळ,27 जानेवारी: राजकारणात नाथाभाऊ आमचे 'बाप'. नाथाभाऊंनी मला वडिलांसारखे प्रेम दिले. मात्र, मुलगा कधी मानले नाही, त्यामुळे त्यांच्यावर ही वाईट वेळ आली, अशा शब्दांत शिवसेना नेते आणि पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी कानपिचक्या लगावल्या आहेत. भुसावळ शहरात जाहीर सत्कारात गुलाबराव पाटील बोलत होते.
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा त्यांच्या मित्र परिवाराकडून जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांनी व आरपीआयच्या पदाधिकाऱ्यांनी गुलाबराव पाटील यांचा सत्कार केला. यावेळी बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले, राजकारणात छोटा विचार ठेवू नये. एकनाथ खडसे यांचेही विचार असेच होते. मात्र त्यांचे कान फुके लोक आल्याने त्यांचाच कार्यक्रम वाजवून गेले, अशी खोचक टीका गुलाबराव पाटील यांनी यावेळी केली. मात्र, राजकारणात नाथाभाऊ आमचे बाप आहेत, असे सांगायलाही गुलाबराव पाटील विसरले नाहीत.
मागची दुश्मनी काढली नाही...
नाथाभाऊंनी अशा लोकांना सोबत ठेवलं, त्यांचा रक्त ग्रुप चेक केला नाही. जर त्यांनी रक्त ग्रुप चेक करुन माणसं ठेवली असती,तर गुलाबराव पाटलासारखा सच्चा माणूस कधी तुटला नसता आणि तुटू शकणारही नाही. कालसुद्धा रक्षाताई खडसे लोकसभेला उभ्या राहिल्या. तेव्हा मी त्यांच्या प्रचाराला गेलो होतो. माझी मागची दुश्मनी काढली नाही कारण मला या देशाचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाहायचे होते, असेही गुलाबराव पाटील यांनी यावेळी सांगितले. माणसाने राजकारणात छोटे विचार ठेवू नये. माझ्या परीने काम होईल, ते मी निश्चितपणे सांगतो. नाथाभाऊ तरच काम करायचे. नाथाभाऊ 'नाथाभाऊ' होते नंतर त्यांचे प्रॉब्लेम झाले. काही कान फुके लोक भाजपमध्ये आले आणि त्यांचा 'कार्यक्रम'वाजवून गेले, अशा शब्दात गुलाबराव पाटील यांनी भाजपवर निशाणा साधला.
शरद पवारांना पुन्हा सुरक्षा द्यावी...
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची सुरक्षा काढल्याबाबत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, सुरक्षा काढणे हा केंद्र सरकारचा व राज्य सरकारचा विषय असतो. कोणत्याही पक्षाच्या नेत्यांची सुरक्षा काढताना याबाबत विचार केला पाहिजे होता.
कारण नेता हा जनतेची सेवा करतो. पवारांची सुरक्षा काढली नाही, असे जर कोणी म्हणत असेल पुन्हा सुरक्षा द्यावी, असेही गुलाबराव पाटील यांनी सांगितले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.