मुंबई, 31 मार्च : राष्ट्रवादी आणि काँग्रेसमुळेच आम्ही महाविकास आघाडीतून बाहेर पडलो असं म्हणत शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी पवारांवर खापर फोडलं होतं. पण, आज शिवसेनेचे नेते आणि उद्योग मंत्री उदय सामंत आणि शिवसेना प्रतोद भरतशेठ गोगावले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
आज दुपारी शिवसेनेचे नेते आणि उद्योग मंत्री उदय सामंत आणि शिवसेना प्रतोद भरतशेठ गोगावले हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे निवास्थान असलेल्या सिल्व्हर ओकवर पोहोचले. अचानक शिवसेनेचे नेते सिल्व्हर ओकवर आल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
दोन्ही नेत्यांनी शरद पवार यांच्यासोबत चर्चा केली. या भेटी वेळी प्राध्यापक प्रदीप ढवळ हे देखील उपस्थित होते. ही भेट कशा संदर्भात होती या संदर्भात कोणाताही खुलासा करण्यात आला नसल्यामुळे भेटीचे कारण गुलदस्त्यातच असल्याचं समजतंय. या तिन्ही नेत्यामध्ये कुठल्या मुद्यावर चर्चा झाली. याची माहिती अद्याप समोर येऊ शकली नाही.
(भावी मुख्यमंत्री अजितदादा.. बॅनर पाहून जितेंद्र आव्हाड म्हणतात, निवडणुका लागुद्या मग..)
अजित पवारांवर शिवसेनेच्या प्रवक्त्यांचा गंभीर आरोप
दरम्यान, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अध्यक्षपदाच्या निवडणुकीत रोहित पवार यांचा पराभव करण्यासाठी अजित पवार यांनी ताकद पणाला लावली होती, असा खळबळजनक आरोप शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केला. रोहित पवार यांनी एमसीएच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवली होती. त्यांच्याविरोधात अभिषेक बोके हे निवडणुकीच्या मैदानात होते. परंतु, रोहित पवार यांनी क्लब वर्गातून सर्वाधिक मतं मिळवत विजय मिळवला होता. निवडणुकीच्या काळात पवार कुटुंबातील एक व्यक्ती रोहित पवारांना पाडा, म्हणून सर्वांना फोन करत होती असा दावा त्यांनी केला.
(शिंदेंच्या खेळीवर अजितदादा आता स्पष्टच बोलले, अमृता फडणवीसांचाही केला उल्लेख)
अजित पवार यांनी नरेश म्हस्के यांच्या या आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे. कोण नरेश म्हस्के? मी त्यांना ओळखत नाही, त्यामुळे आलतू फालतू स्टेटमेंट करणाऱ्यांना मी महत्त्व देत नाही. आम्ही घरामध्ये असं कधीच वागत नाही. अजित पवार जे इकडे बोलतो तीच मागेही भूमिका असते, हे महाराष्ट्राला माहिती आहे. माझ्याकडून असं कधीच घडणार नाही, तो आमच्या घरातला आहे. तो माझा पुतण्या आहे, माझ्या मुलासारखा तो आहे, असं अजित पवार म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Sharad Pawar