दिनेश केळुसकर, सिंधुदुर्ग, 11 ऑक्टोबर : नाणार प्रकल्पाच्या मुद्द्यावरून शिवसेना आणि भाजप पुन्हा एकदा आमने-सामने येण्याची शक्यता आहे. कारण याबाबतच सुभाष देसाईंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पलटवार केला आहे. कुणाची माय व्याली तरी शिवसेना नाणार पुन्हा होऊ देणार नाही, अशा शब्दांमध्ये देसाई यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
'सरकारमध्ये शिवसेना भागीदार आहे. भाजपवाले नाणार पुन्हा आणू, असं म्हणत आहेत. भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नितेश राणेंनी आता नाणारबाबत भूमिका स्पष्ट करावी. पण कुणाची माय व्याली तरी शिवसेना नाणार पुन्हा होऊ देणार नाही,' असा इशारा कणकवलीतील शिवसेना उमेदवार सतीश सावंत यांच्या प्रचारसभेत बोलताना सुभाष देसाई यांनी दिला आहे.
विनायक राऊतांनीही केली होती टीका
'आमचं नातं लाल मातीशी आहे. मग आम्हाला रिफायनरी नको. दलालांच्या दिखाव्याला मुख्यमंत्री बळी पडले. शिवसेना स्थानिक जनतेसोबत आहे, अशा शब्दात खासदार विनायक राऊत यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.
'एकच जिद्द रिफायनरी रद्द' अशी घोषणा खासदार विनायक राऊत व्यासपीठावरुन घोषणा केली होती. मुख्यमंत्र्यांना येथील जनतेचे मत जाणून घ्यायचे असेल तर समोरासमोर चर्चेला या, असे आव्हान देखील खासदार राऊत यांनी दिले होते. जे शिवसैनिक प्रकल्प समर्थनाची बाजू घेत आहेत, त्यांच्यावर हकालपट्टीची कारवाई करणार असल्याचा इशारा खासदार राऊत यांनी दिला. शिवसेनेच्या या भूमिकेचा युतीवर काय परिणाम होतो, याकडे सगळ्यांचे लक्ष लागलं आहे.
मुख्यमंत्र्यांनी दिले होते संकेत
राज्यभर गाजलेल्या नाणार रिफायनरीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रेदरम्यान अतिशय महत्त्वाचं वक्तव्य केलं होतं. 'नाणार रिफायनरी ही नाणारलाच झाली पाहिजे असं आमचं मत होतं. मात्र इथं झालेल्या विरोधामुळे तो निर्णय थांबवावा लागला. आता लोकांची इच्छा असल्यास त्यावर पुन्हा चर्चा करण्यास तयार आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.
जाणिवा नसलेली लोकं म्हणजे जिवंत प्रेत? राज ठाकरेंचं गोरेगावमधील UNCUT भाषण
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा