'शरद पवारांबद्दल CM फडणवीसांनी वापरलेली भाषा महाराष्ट्राला आवडली नाही'

'शरद पवारांबद्दल CM फडणवीसांनी वापरलेली भाषा महाराष्ट्राला आवडली नाही'

'निवडणुकीनंतर ‘पवार पॅटर्न’ महाराष्ट्रातून कायमचा संपलेला असेल, अशी विधाने भाजपच्या मुख्यमंत्र्यांसह इतर नेत्यांनी केली.'

  • Share this:

मुंबई, 27 ऑक्टोबर : 'महाराष्ट्रात विरोधी पक्ष उरणार नाही आणि निवडणुकीनंतर ‘पवार पॅटर्न’ महाराष्ट्रातून कायमचा संपलेला असेल, अशी विधाने भाजपच्या मुख्यमंत्र्यांसह इतर नेत्यांनी केली. ग्रामीण महाराष्ट्रातील जनतेला ही भाषा आवडली नाही. तिने एक मजबूत विरोधी पक्ष महाराष्ट्रात उभा केला. याचे श्रेय राज्यातील जनतेला द्यावे लागेल,' असं म्हणत शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आजच्या सामनातून आपले 'रोखठोक' मत मांडलं आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात मोठं वाकयुद्ध रंगलं होतं. दोन्ही नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडण्यात आल्या. त्यानंतर यंदाच्या निवडणुकीत महाराष्ट्राच्या राजकारणातून पवार पॅटर्न संपेल, असा शाब्दिक हल्ला मुख्यमंत्री फडणवीसांनी केला होता. त्याबाबतच आता संजय राऊत यांनी टीका केली आहे. तसंच निकालावर सामनामधून सविस्तर भाष्य केलं आहे.

सामनातून निकालावर 'रोखठोक' भाष्य, काय म्हणाले संजय राऊत?

"2014 साली भाजपचा वारू उद्धव ठाकरे यांनी रोखला. 2019 साली तो शरद पवार यांनी अडवला. हे सत्य आहेच. महाराष्ट्रात ‘युती’ला कामापुरते बहुमत मिळाले, पण काँग्रेस-राष्ट्रवादीसारखा मजबूत विरोधकही समोर उभा केला. राजकारणात कोणी कोणाला संपवायचे हा प्रश्न निकाली निघाला.

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले. निकालांचे अर्थ काय लावायचे हे ज्याचे त्याने ठरवायचे, पण सर्वच प्रमुख पक्षांनी दिवाळी साजरी करावी असे निकाल जनतेने दिले आहेत. दिवाळीआधी कोणी विजयाचे फटाके फोडायचे यावर प्रचार सभांतून फैरी झडल्या गेल्या. सत्ताधारी म्हणून शिवसेना-भाजप युती आणि विरोधक म्हणून काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी अशा दोघांनीही विजयाचे फटाके फोडावे असे हे निकाल आहेत. ऐन दिवाळीत एकाही नरकासुराचा वध झाला नाही. चारही पक्ष नरसिंह अवतारात प्रकट झाले. अनेकांचे बालेकिल्ले ढासळले. प्रमुख नेते पराभूत झाले. रेसचे घोडे असे मागे पडले की, टांग्याच्या घोडय़ांनी अनेक ठिकाणी शर्यत जिंकली, तरीही सत्तास्थापनेचे काय होणार यावर ‘सट्टा’ लावला जात आहे. पण सत्ता स्थापन नक्की कोणी करायची हे ठरले नाही. पूर्वी एकाच दिवशी लक्ष्मीपूजन होत असे. आता निवडणूक आली की ‘लक्ष्मीपूजन’ हे ठरले व लोकांना राजकारण्यांनी ही सवय लावून ठेवली. तरीही महाराष्ट्रात सत्ताधाऱयांनी केलेल्या लक्ष्मीपूजनाचा मोठा फायदा झाला नाही व सर्व मिळून 20-25 ही विरोधी पक्षाचे आमदार निवडून येणार नाहीत असे चित्र ज्यांनी प्रसारमाध्यमांसमोर उभे केले त्यांचे अंदाज चुकले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन प्रमुख पक्षांनी मिळूनच ‘शंभर’चा टप्पा गाठला. याचे सर्व श्रेय एकटय़ा शरद पवार यांना जाते. गेल्या काही दिवसांत शरद पवार यांच्या झुंजारपणाबद्दल बरेच काही प्रसिद्ध झाले. 2014 साली भारतीय जनता पक्षाचा वारू रोखण्याचे काम उद्धव ठाकरे यांनी केले होते. 2019 साली ते शरद पवार यांनी केले. महाराष्ट्राचे हे वैशिष्टय़ आहे.

निकाल बरा, तरीही गोंधळ

महाराष्ट्राचा निकाल तसा स्पष्ट आहे. भारतीय जनता पक्षाने 106 आणि शिवसेनेने 56 जागा जिंकल्या. हे स्पष्ट बहुमत आहे. पण ‘युती’ असूनही दोन्ही पक्षांना प्रचंड यश मिळाले नाही. 2014 साली स्वतंत्रपणे लढून भाजपने 122 आणि शिवसेनेने 63 जागा जिंकल्या. बलाढय़ सत्ता, प्रचंड धनशक्तीशी टक्कर देत शिवसेनेने हे यश तेव्हा मिळवले. या वेळी स्वतःकडे सत्ता, ‘युती’चे पाठबळ असूनही शिवसेना 56 जागांवर थांबली. हा 56 चा आकडा तुलनेत कमी असला तरी महाराष्ट्रातील सत्तेचा ‘रिमोट कंट्रोल’ उद्धव ठाकरे यांच्या हाती आला आहे. महाराष्ट्रात विरोधी पक्ष उरणार नाही आणि निवडणुकीनंतर ‘पवार पॅटर्न’ महाराष्ट्रातून कायमचा संपलेला असेल, अशी विधाने भाजपच्या मुख्यमंत्र्यांसह इतर नेत्यांनी केली. ग्रामीण महाराष्ट्रातील जनतेला ही भाषा आवडली नाही. तिने एक मजबूत विरोधी पक्ष महाराष्ट्रात उभा केला. याचे श्रेय राज्यातील जनतेला द्यावे लागेल.

आयाराम-गयाराम

भारतीय जनता पक्षाने मित्रपक्षांसह 164 जागा लढवल्या. त्यातील 144 जागा निवडून आणायच्याच अशी एकंदरीत व्यूहरचना होती. शिवसेनेला अडवायचे व विरोधकांना कस्पटासमान लेखून पुढे जायचे ही भूमिका लोकांनी ठोकरून लावली. काँग्रेस-राष्ट्रवादीतले ‘वतनदार’ विकत घेऊन, प्रसंगी चौकशांचा धाक दाखवून निवडून आणायचे यासाठी आयाराम-गयारामांचा जो बाजार भरवला तो शेअर बाजारासारखा कोसळला. राष्ट्रवादीतून भाजप किंवा शिवसेनेत आलेले बहुतेक मोठे नेते पराभूत झाले व त्यांचा पराभव सामान्य कार्यकर्त्यांनी केला. सातारचे उदयनराजे भोसले यांना यापुढे उडवायला ‘कॉलर’ही शिल्लक ठेवली नाही, इतका दारुण पराभव साताऱयात त्यांच्या वाट्याला आला. जनता तुमची गुलाम नाही व तुम्ही स्वतः देवाचे अवतार नाही. शिवरायांनी स्वतःला शेवटपर्यंत स्वराज्याचे सेवक म्हणवून घेतले. त्यांच्या तेराव्या वंशजाला शिवराय समजले नाहीत, हे शेवटी लोकांनी दाखवून दिले. सातारचा पराभव हा ‘आम्ही काहीही करू शकतो, कुणालाही ‘टोप्या’ बदलून पक्षांतर घडवून आणू शकतो’ या अनैतिक विचारांचा पराभव आहे. जयदत्त क्षीरसागर, निर्मला गावीत, वैभव पिचड, दिलीप सोपल, हर्षवर्धन पाटील असे सगळे पक्षांतर करूनही हरले. ‘वॉशिंग मशीन’ मंदीच्या फेऱयात अडकली, अशी प्रतिक्रिया त्यावर श्री. उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.

अंकुश हवाच

संपूर्ण निकालाचे विश्लेषण नंतर करता येईल. कामापुरते बहुमत युतीला आणि बहुमतावर अंकुश ठेवणारा प्रबळ विरोधी पक्ष असे नव्या विधानसभेचे चित्र आहे. मुख्यमंत्री कोण, सरकार कसे व कोणाचे यावर चर्चा बंद आहेत. ते फटाके दिवाळीनंतरच फुटतील. महाराष्ट्र लढणाऱयांच्या व संघर्ष करणाऱ्यांच्या पाठीशी उभा राहतो व संकटाच्या काळात लढणाऱ्यांना हात देतो हे बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात पाहता आले. 2014 साली उद्धव ठाकरे आणि 2019 साली शरद पवारांच्या बाबतीत त्याची पुनरावृत्ती घडली. 106 जागा जिंकूनही भाजपच्या डोक्यावर टांगती तलवार आहे आणि श्री. फडणवीस यांच्या चेहऱयावर तणाव आहे. उन्मादाने वागणाऱ्यांचा शेवटी ‘उदयनराजे’ होतो व राजा असूनही मग प्रजा जुमानत नाही. शरद पवार यांनी महाराष्ट्रासाठी काय केले, असे प्रश्न विचारले गेले. त्याचे उत्तर साताऱ्यासह महाराष्ट्रातील शंभर विधानसभा मतदारसंघांत मिळाले. शिवसेना फरफटत येईल हे स्वप्नही साकार झाले नाही. शिवसेनेचा वाघ हातात ‘कमळ’ घेऊन हुंगत बसला आहे असे एक व्यंगचित्र प्रसिद्ध झाले. ते बोलके आहे. महाराष्ट्राचे गृहीतक वेगळे आहे. गृहीत धरू नका हाच निकालाचा अर्थ. पुढचे पुढे पाहू!"

शरद पवारांच्या दणक्याने उदयनराजे हादरले, पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 27, 2019 10:07 AM IST

ताज्या बातम्या