एकनाथ खडसे भाजप सोडणार? शिवसेनेच्या बड्या नेत्याने केलं भाष्य

एकनाथ खडसे भाजप सोडणार? शिवसेनेच्या बड्या नेत्याने केलं भाष्य

खडसे यांनी एक पाऊल पुढे टाकत आता इतर पक्षातील नेत्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत.

  • Share this:

ठाणे, 10 डिसेंबर : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या नाराजीची सध्या राज्यभर जोरदार चर्चा सुरू आहे. एकनाथ खडसे यांनीही एक पाऊल पुढे टाकत आता इतर पक्षातील नेत्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. खडसे यांनी काल (सोमवारी) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्यामुळे एकनाथ खडसे हे इतर मार्गांची चाचपणी करत असल्याचं स्पष्ट झालं. या सगळ्या घडामोडींवर शिवसेनेचे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनीही भाष्य केलं आहे.

'एकनाथ खडसे आणि आम्ही अनेक वर्षे एकत्र काम केले आहे. एकनाथ खडसे हे नुकतेच शरद पवार यांना भेटले. शरद पवार आणि उद्धव ठाकरे साहेबांबरोबर खडसे यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यामुळे कोणी कुठेही भेटू शकतो. ही लोकशाही आहे,' असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी खडसेंच्या राजकीय हालचालींवर भाष्य केलं आहे. तसंच एकनाथ खडसे हे लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही भेट घेऊ शकतात, असं शिंदे यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा - भाजप सोडण्याची चर्चा सुरू असतानाच पंकजा मुंडेंनी समर्थकांना केलं आवाहन

'170 चा आकडा अजून वाढणार'

'महाविकास आघाडीमध्ये तीन वेगवेगळे पक्ष आहेत. त्यांची चर्चा सुरू आहे. लवकरच खाते वाटप होईल. याबाबत उद्धव ठाकरे लवकरात लवकर निर्णय घेतील. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षाची महाविकास आघाडी झाली आहे. कॉमन मिनिमम प्रोग्राम आम्ही तयार केला आहे. महाराष्ट्रातील जनतेच्या हितासाठी आम्ही चांगले काम करू. राज्यातील विकास प्रकल्पाला कुठेही स्थगिती दिलेली नाही. आढावा घेण्याचे काम सुरू आहे. आमचा विधानसभेतील 170 चा आकडा आहे. भविष्यात आणखी वाढेल,' असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

एकनाथ खडसेंची नाराजी

विधानसभा निवडणुकीपूर्वीही एकनाथ खडसे यांच्या पक्षांतराची चर्चा रंगली होती. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी एकनाथ खडसेंची भेट घेतल्याचंही बोललं गेलं. मात्र नंतर खडसे यांनी आपली निष्ठा पक्षासोबत असल्याचं बोलून दाखवलं. आता मात्र विधानसभा निवडणुकीत भाजपने कापलेलं तिकीट आणि नंतर मुलगी रोहिणी खडसे यांचा पराभव, यामुळे एकनाथ खडसे निर्णायक बंडाच्या तयारीत असल्याचं दिसत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 10, 2019 11:00 AM IST

ताज्या बातम्या