उद्धव ठाकरेंची बैठक संपल्यानंतर मुख्यमंत्रिपदाबाबत एकनाथ शिंदे म्हणतात...

उद्धव ठाकरेंची बैठक संपल्यानंतर मुख्यमंत्रिपदाबाबत एकनाथ शिंदे म्हणतात...

शिवसेनेत असलेल्या संभ्रमाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना आमदारांची बैठक बोलावण्यात आली होती.

  • Share this:

मुंबई, 22 नोव्हेंबर : महाराष्ट्रात सत्तास्थापनेचा तिढा सुटत आला असला तरीही मुख्यमंत्रिपद कोणाला मिळणार, याबाबत अजून स्पष्टता नाही. मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेनेतून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे, संजय राऊत आणि अरविंद सावंत यांच्यासह अनेक नावं चर्चेत आहेत. त्यामुळे शेवटी कोणत्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात येतं, याबाबतची उत्सुकता आहे.

मुख्यमंत्रिपदावरून शिवसेनेत असलेल्या संभ्रमाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना आमदारांची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीनंतर एकनाथ शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. 'शिवसेनेचे आमदार बैठकीनंतर जयपूरला जाणार नाहीत तर मुंबईत राहतील. शिवसेनेची काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सुरू असलेली चर्चा योग्य ट्रॅकवर असल्याचं उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत सांगितलं आहे. मुख्यमंत्रिपदाबाबत उद्धव ठाकरे हेच अंतिम निर्णय घेतील. त्यांचा निर्णय आमच्यासारख्या शिवसैनिकांना मान्य असेल,' अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

महाराष्ट्राचा सत्तासंघर्ष संपण्याची चिन्हे दिसत असली तरीही मुख्यमंत्रिपदी कोण विराजमान होणार, याबाबतचा सस्पेन्स अजूनही कायम आहे. मुख्यमंत्रिपदाच्या स्पर्धेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं नाव सर्वात आघाडीवर असल्याची चर्चा होती. मात्र आता शेवटच्या क्षणी शिवसेनेचे फायरब्रँड नेते आणि खासदार संजय राऊत यांचंही नाव पुढे आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचाही संजय राऊत यांच्या नावाकडे कल असल्याची माहिती आहे.

शिवसेनेतून मुख्यमंत्रिपदासाठी अनेक नावं चर्चेत

मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेनेत संजय राऊत यांच्यासह नुकताच केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिलेले अरविंद सावंत यांचंही नाव पुढे आलं आहे. मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत संजय राऊत यांचे असलेले संबंध लक्षात घेता उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपद स्वीकारण्यास अनुत्सुकता दाखवल्यास राऊत यांच्याच नावावर सहमती होऊ शकते.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदासाठी आपण इच्छुक नसल्याचं सांगितल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. प्रत्यक्ष सरकारमध्ये सहभागी होण्यापेक्षा शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्यासह सरकारच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्याची उद्धव ठाकरे यांची भूमिका असल्याची माहिती आहे.

महाविकास आघाडीतून हे 2 नेतेही आहेत स्पर्धेत

1. एकनाथ शिंदे

ठाणे जिल्ह्याच्या राजकारणावर पकड निर्माण करणाऱ्या शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांचं पक्षातही चांगलं वजन आहे. अनेक आमदारांशी त्यांचे जवळचे संबंध असल्याचं राजकीय निरीक्षक सांगतात. तसंच मागील युती सरकारमध्ये ते मंत्रीही होते. पक्षातील त्यांच्या कामाच्या अनुभवामुळेच शिवसेनेनं आताही त्यांच्या खांद्यावर विधीमंडळ गटनेतेपदाची जबाबदारी टाकली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून ठाकरे कुटुंबाबाहेरील व्यक्तीचा मुख्यमंत्रिपदासाठी विचार झाल्यास एकनाथ शिंदे यांचं नाव आघाडीवर असू शकतं.

2. अजित पवार

विधानसभा निवडणुकीत शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीच्या जागा निवडणुकीत आल्या आहेत. शिवसेनेनं 56 तर राष्ट्रवादीने 54 जागांवर विजय मिळवला आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीला मिळालेल्या जागांमध्ये फार मोठा फरक नाही. त्यामुळे राष्ट्रवादीकडून अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदावर दावा करण्यात येऊ शकतो. अशातच राष्ट्रवादीचे विधीमंडळ पक्षनेते असलेले अजित पवार यांचं नाव पक्षाकडून मुख्यमंत्रिपदासाठी समोर येऊ शकतं.

Published by: Akshay Shitole
First published: November 22, 2019, 1:29 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading