'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेवरून अमोल कोल्हे आणि खोतकरांमधील मतभेद चव्हाट्यावर

'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेवरून अमोल कोल्हे आणि खोतकरांमधील मतभेद चव्हाट्यावर

अर्जुन खोतकरांच्या वक्तव्यांनंतर अमोल कोल्हे यांनी खुलासा केला. त्यानंतर आता खोतकरांनी अतिशय सावध प्रतिक्रिया दिली आहे.

  • Share this:

जालना, 22 फेब्रुवारी : 'झी मराठी' वाहिनीवर प्रसारित होणाऱ्या 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेचा शेवट न दाखवण्यावरून सुरू असलेल्या चर्चेवरून शिवसेना नेते आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर आणि अभिनेते अमोल कोल्हे यांच्यातील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. अर्जुन खोतकरांच्या वक्तव्यांनंतर अमोल कोल्हे यांनी खुलासा केला. त्यानंतर आता खोतकरांनी अतिशय सावध प्रतिक्रिया दिली.

'माझे अमोल कोल्हे यांच्याशी प्रदीर्घ बोलणे झाले होते, पण त्यांची काय मजबुरी आहे, हे कळत नाही. त्यांनी हेही सांगितले होते की हा सर्व अधिकार झी समूहाचा आहे. मात्र त्या समूहाला मी आणि ते दोघेही बोलणार होते. मला हा विषय वादाचा करायचा नाही, माझी भूमिका मांडण्यासाठी मला इतरही व्यासपीठ उपलब्ध असून आम्हा शिव आणि शंभूप्रेमींच्या भावना लक्षात घेऊन त्यांनी पुन्हा एकदा विचार करावा,' असेही खोतकर म्हणाले.

काय आहे वाद?

झी मराठीवरील छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारीत स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका सध्या खूप चर्चेत आहे. संभाजी महाराजांच्या अटकेनंतरचे भाग प्रदर्शित करू नये, अशी मागणी शिवसेनेचे नेते आणि माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी केली होती. अखेर स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेतील संभाजी महाराजांच्या हत्येचा भाग वगळणार असल्याचं आश्वासन डॉ. अमोल कोल्हे यांनी दिलं आहे, असा दावा खोतकरांनी दिला होता. अमोल कोल्हेंनी फोनवरून हे आश्वासन दिल्याचं अर्जुन खोतकरांनी सांगितलं होतं.

अमोल कोल्हेंनी दावा खोडला

'मुळात गेली अडीच वर्षे मालिका सुरू असताना जगदंब क्रिएशन्स आणि झी मराठी वाहिनीने जबाबदारीने आणि नैतिक कर्तव्यभावनेने ही मालिका केली आहे. माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या भावनेविषयी आदर आहे. परंतु मुळातच काळजी घेतली असल्यामुळे कुणाच्या सांगण्यावरून काही बदल करण्याची आवश्यकता आहे, असे मला वाटत नाही. मालिकेचे चित्रीकरण पूर्ण झाले असून काय दाखवायचे, काय वगळायचे हा निर्णय सर्वस्वी 'झी मराठी' वाहिनीचा असेल,' असं अमोल कोल्हे म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 22, 2020 09:30 PM IST

ताज्या बातम्या