शिवसेनेची अभूतपूर्व कोंडी! भाजपशी काडीमोड पण नव्या संसारातही कुरबुरी

शिवसेनेची अभूतपूर्व कोंडी! भाजपशी काडीमोड पण नव्या संसारातही कुरबुरी

भाजपसोबत युती केल्यानंतरही निकालानंतर मात्र सेनेनं वेगळी वाट धरली. त्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यासोबत सरकार स्थापनेसाठी चर्चा सुरु असली तरीही त्यात असलेल्या अडचणींमुळे सेनेची अभूतपूर्व अशी कोंडी झाली आहे.

  • Share this:

मुंबई, 18 नोव्हेंबर : राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यापासून दररोज नवनवी समीकऱणं मांडली जात आहेत. त्यात प्रत्येक पक्षाच्या नेत्यांच्या वेगळ्याच वक्तव्याने गोंधळ निर्माण होत आहे. निकाल लागल्यानंतर सेनेनं जे ठरलं ते झालं पाहिजे असं म्हणत मुख्यमंत्रिपदाची मागणी केली. त्यावर भाजपकडून सकारात्मक उत्तर मिळालं नाही. शेवटी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि भाजपने आपण सत्ता स्थापन करण्यास असमर्थ आहोत असं सांगितलं.

भाजप आणि शिवसेनेनं निवडणूक जरी एकत्र लढवली असली तरी निकालानंतर दोघांमध्ये मुख्यमंत्रिपदामुळे वाद निर्माण झाला. अखेर त्यांची युती तुटण्यापर्यंत पोहोचलं. त्यानंतर शिवसेनेला राज्यपालांनी सत्ता स्थापनेसाठी आमंत्रण दिलं. मात्र त्यांनाही वेळेत दावा करता आला नाही. सेनेची वेळ संपल्यावर राष्ट्रवादीला संधी दिली. त्यांनी सत्ता स्थापनेच्या दाव्यासाठी वेळ मागितली पण राज्यपालांनी नकार देत राष्ट्रपती राजवटीची शिफारस केली आणि गेल्या आठवड्यात राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली.

राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर पहिल्यांदा सत्ता स्थापनेसाठी असमर्थता दर्शवणाऱ्या भाजपने पुन्हा आमचंच सरकार येणार असा दावा केला. तर दुसरीकडे शिवसेनेच्या नेत्यांनी राष्ट्रवादी-काँग्रेससोबत चर्चा सुरु असल्याचे सांगितले. यात सेनेचे खासदार संजय राऊत यांनी सातत्याने भाजपवर टीका करताना आघाडीच्या नेत्यांसोबतच्या चर्चा सुरू आहेत. लवकरच सेनेचा मुख्यमंत्री होईल असं म्हटलं. याशिवाय राऊत यांनी 170 ते 175 आमदारांचे संख्याबळ असल्याचा दावाही राऊत यांनी केला.

शिवसेनेकडून सरकार स्थापनेसाठी हालचाली सुरु असल्या तरी आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या वक्तव्याने मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची राज्यातील सरकार स्थापनेबाबत चर्चा सुरु असताना पवारांनी याबद्दल शिवसेनेला विचारा असा प्रश्न टाकल्यानं आणखी संभ्रम निर्माण झाला. याआधीही त्यांनी काँग्रेससोबत सेनेला पाठिंबा देण्यासाठी कोणती बैठक असल्याचं मला माहिती नाही असं म्हटलं होतं.

वाचा : 'अमित शहांनी सांगितलंय, राज्यात भाजप-सेनेचं सरकार येणार'

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी निकालानंतर आम्हाला जनतेनं विरोधी पक्षात बसण्याचा कौल दिला आहे असं सांगितलं होतं. त्यानंतर सेनेकडून कोणताही प्रस्ताव आलेला नाही असंही सांगितलं होतं. सेनेकडून राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत चर्चा सुरु असल्याचं उद्धव ठाकरे यांनीही म्हटलं होतं. पण आता शरद पवार यांच्या या गुगलीने सेनेची अवस्था इकडे आड तिकडे विहीर अशी झाली आहे.

राज्यातील सरकार स्थापने संदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना शिवसेनेलाच विचारा असे उत्तर शरद पवारांनी दिले. इतकंच नव्हे तर सरकार स्थापनेसंदर्भात चर्चा सुरु आहे का याबद्दल विचारले असता पवार म्हणाले, कसली चर्चा, कोणाशी चर्चा. पवारांच्या या उत्तरामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

वाचा : राष्ट्रवादी भाजपसोबत जाणार का? जयंत पाटलांनी केला खुलासा

राज्यात गेल्या काही दिवसांपासून शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचे सरकार स्थापन होणार अशी चर्चा आहे. असे असताना पवारांनी मात्र असे काही सुरुच नसल्याचे म्हटले आहे. शिवसेना-भाजप यांनी एकत्र निवडणूक लढवली आहे. ते वेगळे आहेत आणि आम्ही व काँग्रेस वेगळे आहोत. त्यांनी त्यांचा मार्ग निवडायचा आम्ही आमचे राजकारण करू, असे पवार म्हणाले.

एकीकडे भाजपसोबत जाण्याचे परतीचे दोर सेनेनं कापले आहेत. केंद्रातील मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता एनडीएतूनसुद्धा शिवसेना बाहेर पडली आहे. यातच संजय राऊत यांनीही महाराष्ट्रातील सरकारचा निर्णय पहिल्या आठवड्यात होईल असं म्हटलं आहे. त्यानंतर शरद पवारांनी सेनेबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर सरकार स्थापनेचा पेच सुटण्याची चिन्हे कठिण दिसत आहेत. या सर्व राजकीय हालचालींमध्ये शिवसनेची पुरती कोंडी झाली आहे.

वाचा : शिवसेनेची चिंता वाढली; अजित पवार म्हणतात, सत्तावाटपाचं काहीच ठरलेलं नाही

सध्या सेनेकडे असलेला पर्याय म्हणजे राष्ट्रवादी-काँग्रेससोबत जाणं हाच आहे. त्यातही काँग्रेसला सेनेच्या हिंदुत्ववादी भूमिकेची अडचण असल्यानं चर्चा रखडल्याचं म्हटलं जात आहे. आघाडीशिवाय सेनेला आता पुन्हा भाजपकडे जाणं जवळपास अशक्य आहे. शिवसेनेनं मुख्यमंत्रिपदाची मागणी करत भाजपसोबत काडीमोड केला खरा पण त्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत नवा संसार थाटण्यात त्यांना यश कसं मिळणार याकडेच लक्ष लागून राहिलं आहे.

वाचा : राष्ट्रवादीसोबत आघाडी करणार का? 20 वर्षांपूर्वी बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते...

Published by: Suraj Yadav
First published: November 18, 2019, 2:09 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading