मुंबई 4 फेब्रुवारी : परस्परांची उनीधुनी काढत, चिफलफेक करत शिवसेना - भाजपनं स्वबळाचं बाहुलं नाचवलं. पण, अखेर राजकीय परिस्थितीचा अंदाज घेत दोन्ही पक्षांनी 'सिर सलामत तो पगडी पचास' म्हणत युती करण्यावर शिक्कामोर्तब केलं आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना भाजपमध्ये 25 - 23चं सुत्र निश्चित झाल्याची माहिती न्यूज18 लोकमतच्या खात्रीलायल सुत्रांनी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील लोकसभेच्या 48 जागांपैकी भाजप 25 तर, शिवसेना 23 जागा लढवण्याची शक्यता आहे. पण, यावेळी शिवसेना भिवंडीच्या जागेसाठी आग्रही असल्याची माहिती पुढे येत आहे.
भिवंडीचं राजकीय महत्त्व
भाजप खासदार कपिल पाटील काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा सध्या जोरात सुरू आहे. त्यामुळे शिवसेनेनं भिवंडीतील जागेसाठी आग्रह धरला आहे. शिवाय, पालघर पोटनिवडणुकीमध्ये देखील शिवसेनेला पराभवाचा सामना करावा लागला होता. हा पराभव शिवसेनेच्या अद्यापही जिव्हारी लागला आहे.
पालघर आणि भिवंडीसारख्या भागांमध्ये भाजपचं वाढतं प्राबल्य शिवसेनेसाठी आगामी काळात डोकेदुखी ठरू शकते. मुंबई शहरामध्ये देखील पालिका निवडणुकीमध्ये शिवसेनेला निसटता विजय मिळाला होता. अशा स्थितीमध्ये पालघर, भिवंडी, कल्याण - डोंबिवलीसारख्या भागांमध्ये भाजपची वाढती ताकद शिवसेनेच्या वर्चस्वाला नजीकच्या काळात मोठं आव्हान ठरू शकते.
त्यामुळे भाजपला रोखण्यासाठी शिवसेनेचा गड असलेल्या ठाण्यानजीकची भिवंडीची जागा शिवसनेसाठी महत्त्वाची आहे. यासाऱ्या राजकीय समीकरणांचा विचार करता शिवसेना भिवंडीच्या जागेसाठी आग्रही आहे.
भिवंडीचं वाढतं व्यापारी महत्त्व
व्यापाराच्या दृष्टीनं देखील भिवंडीचं महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक उद्योगधंदे सध्या भिवंडीमध्ये स्थलांतर करत आहे. शिवाय, सरकारनं देखील भिवंडीच्या विकासाठी मोठ्या प्रमाणावर निधी दिला आहे.
ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या भिवंडीमध्ये मेट्रोचा प्रकल्प देखील प्रस्तावित आहे. मुंबई, ठाणे, कल्याण - डोंबिवली या शहरांचा विचार करता भिवंडीचं स्थान देखील मोक्याचं आहे.
स्वबळाचा नारा 'बार फुसका'?
'मी कुणाच्याही दारी युतीसाठी कटोरा घेऊन जाणार नाही' अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबई पालिका निवडणुकीच्या तोंडावर स्वबळाचा नारा दिला. त्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर आरोप- प्रत्यारोप देखील झाले.
'सामना'तून देखील भाजपवर टीकेचे बाण चालवले गेले. प्रत्येक वेळी शिवसेनेनं स्वबळाचा नारा दिला. अमित शहा यांनी 'मातोश्री'वर जात उद्धव ठाकरे यांच्याशी बंद दाराआड साधारण दोन तास चर्चा केली होती. त्यानंतर देखील शिवसेनेकडून स्वबळाचा नारा कायम राहिला होता. पण, आता मात्र शिवसेना - भाजप युतीवर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती न्यूज18 लोकमतला सुत्रांनी दिली आहे.