'मोदी-शहांना जे हवे तेच घडताना दिसत आहे, देश संकटात आहे'

'मोदी-शहांना जे हवे तेच घडताना दिसत आहे, देश संकटात आहे'

'याप्रश्नी हिंदू विरुद्ध मुसलमान अशी दरी पडेल व दंगली होतील अशी भाजपची आशा होती, ती फोल ठरली.'

  • Share this:

मुंबई, 7 जानेवारी : दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (JNU)विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्यानंतर कायदा आणि सुव्यवस्थेवरून सरकारविरोधात आंदोलने केली जात आहेत. अशातच आता शिवसेनेनंही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा साधला आहे. 'देशात अराजकता निर्माण करणारे राजकारण धोकादायक आहे. अशाने देशाचे तुकडे पडतील, समाजास तडे जातील. विद्यापीठे, महाविद्यालये रक्ताने भिजवायची, विद्यार्थ्यांना मारहाण करायची आणि त्यातून पेटलेल्या होळीवर सत्तेची पोळी शेकायची. इतके निर्घृण राजकारण कधी कोणी केले नव्हते. ‘जेएनयू’तील हिंसाचाराचे पडसाद देशभरात उमटू लागले आहेत. मोदी–शहांना जे हवे तेच घडताना दिसत आहे. देश संकटात आहे,' असा हल्लाबोल शिवसेनेचं मुखपत्र असणाऱ्या 'सामना' दैनिकातून करण्यात आला आहे.

'गृहमंत्री अमित शहा सध्या दिल्लीतच आहेत. नागरिकत्व सुधारणा कायद्याचा प्रचार करण्यासाठी ते घरोघरी सरकारी पत्रके वाटण्याच्या मोहिमेत सहभागी झाले आहेत. गृहमंत्र्यांवर ही काय वेळ आली आहे? ‘घर घर जागरुकता अभियाना’त स्वतः गृहमंत्री घरोघर पत्रके वाटत आहेत. नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबत गोंधळ उडाला आहे व देशभरात त्यामुळे अस्थिरतेचा उद्रेक झाला. राज्याराज्यात लाखोंचे मोर्चे निघाले. हे मोर्चे फक्त मुसलमानांचे नव्हते. याप्रश्नी हिंदू विरुद्ध मुसलमान अशी दरी पडेल व दंगली होतील अशी भाजपची आशा होती, ती फोल ठरली,' असा घणाघात शिवसेनेनं केला आहे.

अजित पवार हे माझे बॉस नाहीत - अशोक चव्हाण

'चेहरे झाकलेल्या अज्ञात हल्लेखोर टोळीने ‘जेएनयू’मध्ये हिंसाचार केला आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठात भाजपप्रणीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि ‘जेएनयू’ विद्यार्थी संघटनेमधील वाद विकोपाला गेल्याचे हे चित्र आहे. चेहरे झाकून एक टोळके आत घुसले व त्यांनी विद्यार्थ्यांच्या हॉस्टेलवर हल्ला केला. त्यात शंभरच्या आसपास विद्यार्थी आणि शिक्षक जखमी झाले आहेत. तोंडावर बुरखा घालून काळोखात हल्ले करणे ही मर्दानगी नाही. त्यामुळे अशा प्रवृत्तीचे बुरखे उतरवण्याची गरज आहे. 26/11 चा मुंबईवर हल्ला करणारे अतिरेकी असेच तोंडे झाकून आले होते. आता ‘जेएनयू’त तेच चित्र दिसले आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे काढणारी ही घटना आहे,' अशा शब्दांमध्ये शिवसेनेनं या मुद्द्यावरून टीका केली आहे.

'विद्यापीठात राजकारण आणि हिंसाचार कोणी घुसवला?'

'नागरिकत्व सुधारणा कायद्याचा फटका अनेक राज्यांत हिंदूंनाही बसत आहे. त्यामुळे हिंदूही चिडले. या कायद्यामुळे ‘भाजप विरुद्ध बाकी सर्व’ अशी स्थिती निर्माण झाल्याने भाजपची गोची झाली आहे व त्याच सूडभावनेतून अनेक उपद्व्याप केले जात आहेत. जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचा ‘राडा’ त्याचाच एक भाग आहे काय? अशी शंका आता येत आहे. ‘जेएनयू’मधील हिंसाचाराचा भाजपकडून निषेध करण्यात आला आहे. देशातील विद्यापीठे राजकारणापासून दूर राहणे गरजेचे आहे. येथे केवळ विद्यार्जनाचेच काम व्हावे असे भाजपने सांगितले आहे, पण गेल्या पाच वर्षांत विद्यापीठात राजकारण आणि हिंसाचार कोणी घुसवला? जे आपल्या विचाराचे नाहीत त्यांना उखडून टाकायचे व त्यासाठी सत्तेचा मस्तवाल वापर करायचा हे धोरण कोण राबवत आहे?' असा सवाल शिवसेनेनं उपस्थित केला आहे.

गांधी भाऊ-बहिणीने अमित शहांवर आणली ही वेळ

'गृहमंत्री अमित शहा यांचा असा आरोप आहे की, काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून लोकांची दिशाभूल करून हिंसाचार भडकवला. गृहमंत्र्यांनी हा आरोप पुराव्यासह जबाबदारीने केला असेल तर त्या पुराव्याच्या आधारे दंगल भडकविणाऱयांवर कारवाई व्हायला हवी. दंगलखोरांना अटक करायला तुम्हाला कोणी रोखले आहे? मुळात अमित शहा जेव्हा राहुल आणि प्रियंका गांधी यांनी हिंसाचार भडकविल्याचा आरोप करतात तेव्हा ते एकप्रकारे मान्यच करतात की, सरकारच्या एका कायद्याविरुद्ध जनमत तयार करण्याची व लोकांना रस्त्यावर उतरविण्याची ताकद राहुल आणि प्रियंका गांधी यांच्यामध्ये आहे. दुसरे असे की, गांधी भाऊ-बहिणीने दंगली भडकवल्या की काय ते सांगता येत नाही, पण देशाच्या गृहमंत्र्यांवर व त्यांच्या पक्षावर घरोघरी जाऊन खुलाशाची पत्रके वाटण्याची वेळ नक्कीच आणली आहे,' अशी विखारी टीका शिवसेनेनं केली आहे.

Published by: Akshay Shitole
First published: January 7, 2020, 7:31 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading