Home /News /maharashtra /

'ती' जबाबदारी उद्धव ठाकरे किंवा शरद पवारांची नाही, शिवसेनेची फडणवीसांवर खरमरीत टीका

'ती' जबाबदारी उद्धव ठाकरे किंवा शरद पवारांची नाही, शिवसेनेची फडणवीसांवर खरमरीत टीका

'फ्री काश्मीर' पोस्टरवरून देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली होती. त्यावरून आता शिवसेनेनं फडणवीसांचा समाचार घेतला आहे.

    मुंबई, 9 जानेवारी : 'विरोधी पक्षाची प्रतिष्ठा राखण्याची अपेक्षा जनता करीत आहे. या पदाची किंमत त्यांनीच ठेवली पाहिजे. ती जबाबदारी उद्धव ठाकरे किंवा शरद पवारांची नाही. श्री. फडणवीस यांच्या काळजात घुसलेला बाण व त्यानंतरची वेदना आम्ही समजू शकतो. तरीही त्यांनी त्या वेदनेवर संयमाचा बाम चोळून काही काळ शांत राहायला हवे,' असं म्हणत शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या 'सामना'तून विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती टीका करण्यात आली आहे. 'फ्री काश्मीर' पोस्टरवरून देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली होती. त्यावरून आता शिवसेनेनं फडणवीसांचा समाचार घेतला आहे. 'ज्याला ‘कौन्सिलिंग’ म्हणतात अशा समुपदेशनाची आज विरोधी पक्षाला गरज आहे; कारण रोज त्यांना वाटते की, सरकार पडेल व आपण पुन्हा येऊ! मेहक प्रभू या मुलीने झळकविलेल्या ‘फ्री कश्मीर’ फलकाबाबतही विरोधी पक्षनेत्यांनी सारासार विचार न करता सरकारवर टीका केली आणि नंतर मेहक प्रभूने नेमकं काय केलं, हे स्पष्ट झाल्यावर ते तोंडावर आपटले. विरोधी पक्षाने प्रतिष्ठा गमावणे, स्वतःची विश्वासार्हता घालवून बसणे महाराष्ट्राला परवडणारे नाही. आम्हाला विरोधी पक्षाची काळजी वाटते,' अशी खरमरीत टीका शिवसेनेनं केली आहे. 'सत्ताधाऱ्यांवर ते रोज एक भंपक, बिनबुडाचा आरोप करतात' 'महाराष्ट्रातील विरोधी पक्ष रोज स्वतःचे हसे करून घेत आहे याचे आम्हाला अतीव दुःख होत आहे. विरोधी पक्षाचे इतके अधःपतन किंवा बेइज्जती गेल्या पन्नास वर्षांत कधीच झाली नव्हती, पण माजी मुख्यमंत्री फडणवीस हे जेव्हापासून विरोधी पक्षनेतेपदावर विराजमान झाले आहेत तेव्हापासून विरोधी पक्ष दिशाहीन आणि भरकटलेला झाला आहे. लोकशाहीसाठी हे चित्र चांगले नाही. श्री. फडणवीस यांचे हे असे का झाले आहे, ते महाराष्ट्राला चांगलेच माहीत आहे. सत्ताधाऱयांवर ते रोज एक भंपक, बिनबुडाचा आरोप करतात व नंतर तोंडावर आपटतात याचे आमच्याइतके वाईट कुणालाच वाटत नसेल,' असा उपरोधिक हल्ला फडणवीस यांच्यावर करण्यात आला आहे. 'नागरिकता सुधारणा कायदा व ‘जेएनयू’तील निर्घृण हल्ला प्रकरणानंतर देशभरातील तरुण वर्ग संतापून रस्त्यावर उतरला आहे. मुंबईतील गेट वे ऑफ इंडियासमोर तरुणांनी आंदोलन, धरणे वगैरे धरली. त्यात एका मुलीच्या हातात ‘फ्री कश्मीर’ असा कागदी फलक घेतलेला फोटो प्रसिद्ध झाला. यावर विरोधी पक्षनेत्यांना धक्का बसला. त्यांच्यातला राष्ट्रभक्त उसळला व त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व सरकारलाच धारेवर धरले. काय तर म्हणे, ‘‘पहा, पहा, उद्धव ठाकरे यांच्या नाकासमोर कश्मीरातून फुटून निघण्याचे फलक नाचवले जात आहेत. हा देशद्रोह मुख्यमंत्री ठाकरे यांना मान्य आहे काय?’’ वगैरे वगैरे वगैरे. विरोधी पक्षनेत्यांच्या सुरात सूर मिसळण्यास इतर भगतगणही पुढे आले, पण त्यांचा हा आरोप म्हणजे भंपकपणाचा कळसच ठरला,' असा हल्लाबोल शिवसेनेनं केला आहे. 'ज्या मुलीने ‘फ्री कश्मीर’चा फलक झळकवला. ती मुलगीच तासाभरात वृत्तवाहिनीच्या कॅमेऱयासमोर आली व तिने विरोधी पक्षाच्या ढोंगाचा बुरखाच फाडला. मुळात ही मुलगी मुसलमान किंवा कश्मिरी नव्हती. शुद्ध मराठीत तिने आपले नाव मेहक प्रभू असे सांगितले. त्यामुळे पहिल्या फटक्यातच भगतगण कोलमडले. मेहक असे म्हणाली की, ‘जेएनयूतील विद्यार्थ्यांवरील हल्ले पाहून मी अस्वस्थ झाले व एका कर्तव्यभावनेने गेट वे ऑफ इंडियासमोरील विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सहभागी झाले. ही माझी उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती. आंदोलनाच्या ठिकाणी अनेक फलक पडले होते. त्यातला एक फलक उचलून मी कॅमेऱयासमोर झळकवला. त्यावर ‘फ्री कश्मीर’चा उल्लेख होता. माझ्या दृष्टीने ‘फ्री कश्मीर’ म्हणजे देशातून फुटून निघणे असा होत नाही, तर आज कश्मीरच्या नागरिकांवर जी बंधने लादली आहेत, त्यांना देशापासून तोडले आहे. इंटरनेट सेवा, मोबाईल सेवा अशापासून सुरक्षेच्या जोरजबरदस्तीने वंचित ठेवले आहे या सगळय़ा बेडय़ांतून तेथील जनतेस मुक्ती मिळावी म्हणजे ‘फ्री कश्मीर.’ पण यानिमित्ताने कुणीतरी वेगळेच अर्थ काढले.’ मेहक प्रभूची ही वेदना बरेच काही सांगून जाते. कश्मिरी जनतेची वेदना एका मुंबईकर मराठी मुलीने मूकपणे मांडली. यावर विरोधी पक्ष म्हणतो हा देशद्रोहच आहे. विरोधी पक्षाच्या बेजबाबदारपणाचे यापेक्षा घाणेरडे उदाहरण दुसरे नसेल. देशाचा जो नागरिक निर्भयपणे भावना व्यक्त करील तो देशद्रोही, असा प्रचार मोदी-शहांचे भगतगण करीत असतील तर ते स्वतःबरोबरच देशासाठी खड्डा खणत आहेत,' असा इशाराही शिवसेनेनं दिला आहे.
    Published by:Akshay Shitole
    First published:

    Tags: Devendra fadanavis, Shivsena

    पुढील बातम्या