मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

धनुष्यबाणाची लढाई, निवडणूक आयोगाची डेडलाईन, पण शिवसेना अजूनही तयार नाही!

धनुष्यबाणाची लढाई, निवडणूक आयोगाची डेडलाईन, पण शिवसेना अजूनही तयार नाही!

फाईल फोटो

फाईल फोटो

शिवसेना उद्धव ठाकरेंची का एकनाथ शिंदेंची? पक्षाचं धनुष्यबाण हे चिन्ह कुणाला मिळणार? ही लढाई सध्या निवडणूक आयोगाकडे सुरू आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Shreyas

मुंबई, 4 ऑक्टोबर : शिवसेना उद्धव ठाकरेंची का एकनाथ शिंदेंची? पक्षाचं धनुष्यबाण हे चिन्ह कुणाला मिळणार? ही लढाई सध्या निवडणूक आयोगाकडे सुरू आहे. निवडणूक आयोगाने शिवसेनेला आपलं म्हणणं मांडण्यासाठी ७ ऑक्टोबर पर्यंतची वेळ दिली आहे, पण ठाकरे गट निवडणूक आयोगाकडे आणखी वेळ मागणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगात कागदपत्रं दाखल करण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाकडून आणखी काही दिवसांची मुदत मागितली जाणार आहे.

दसरा मेळावा असल्यामुळे 7 ऑक्टोबरपर्यंत कागदपत्र दाखल करणं शक्य नसल्याने ठाकरे गटाकडून आणखी कालावधी मागून घेतला जाणार आहे. निवडणूक आयोगाकडे तशाप्रकारचं पत्र शिवसेना पाठवणार आहे, अशी माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे.

निवडणूक आयोगाने अंधेरी पूर्व विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर केली आहे, त्यामुळे शिवसेना कुणाची, तसंच पक्षचिन्ह धनुष्यबाण कुणाला मिळणार, याबाबत निर्णय घ्यावा लागणार आहे. जर तोपर्यंत हा निर्णय झाला नाही तर धनुष्यबाण हे चिन्हदेखील गोठवलं जाऊ शकतं.

शिवसेनेनं 23 सप्टेंबरला आपलं म्हणणं मांडण्यासाठी निवडणूक आयोगाकडे वेळ वाढवून मागितली होती. 27 सप्टेंबरला सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला शिवसेनेचं निवडणूक चिन्ह कोणाला द्यायचं यावर सुनावणी घेण्याची परवानगी दिली होती. त्यामुळे निवडणूक आयोगाने शिवसेनेला आपलं म्हणणं मांडण्यासाठी 7 ऑक्टोबर पर्यंतची वेळ दिली आहे.

एकनाथ शिंदे यांनी निवडणूक आयोगात आपणच शिवसेना असल्याचा दावा केला आहे. शिवसेनेचे 40 आमदार, 12 खासदार आणि अनेक पदाधिकारी आपल्यासोबत असल्याचं एकनाथ शिंदे यांनी निवडणूक आयोगाला सांगितलं आहे. या सगळ्यांची प्रतिज्ञापत्रही शिंदे गटाकडून निवडणूक आयोगाला देण्यात आली आहेत. दोन्ही गटांकडून कागदपत्रं सादर झाल्यानंतर निवडणूक आयोग या कागदपत्रांची छाननी करेल. कागदपत्रांची तपासणी झाल्यानंतर गरज पडली तर दोन्ही गटांच्या नेते आणि पदाधिकाऱ्यांना निवडणूक आयोग सुनावणीसाठी बोलावू शकते. या कालावधीमध्ये जर निवडणूक झाली आणि निर्णय झाला नाही तर धनुष्यबाण हे चिन्ह गोठवलं जाऊ शकतं.

First published:

Tags: Cm eknath shinde, Shivsena, Uddhav Thackeray