महाविकास आघाडीचा समान कार्यक्रम ठरला, शेतकऱ्यांना मिळू शकते आनंदाची बातमी!

महाविकास आघाडीचा समान कार्यक्रम ठरला, शेतकऱ्यांना मिळू शकते आनंदाची बातमी!

सरकार स्थापनेनंतर लगेचच शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कर्जमाफीचा निर्णय घेण्यात येणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 22 नोव्हेंबर : महाराष्ट्रात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस–काँग्रेस या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीचं सरकार येणार हे आता निश्चित झालं आहे. मात्र पहिल्यांदाच सरकार स्थापनेसाठी हे तीन पक्ष एकत्र येत असल्याने आगामी सरकारचा किमान समान कार्यक्रम ठरवण्यात आला आहे. यामध्ये शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून अनेक मुद्द्यांवर कृती कार्यक्रम आखण्यात आला आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यात अनेक मुद्द्यांवरून वैचारिक मतभेद असल्याचं यापूर्वी पाहायला मिळालं आहे. त्यामुळे एकत्रित सरकार चालवताना हे मतभेद चव्हाट्यावर येऊ नये म्हणून सत्तास्थापनेपूर्वीच या सर्व पक्षांनी खलबतं केली. त्यानंतर दिल्लीत सर्व मुद्द्यांवर एकमत झाल्यानंतरच आता सत्तास्थापनेसाठी पाऊलं उचलली जात आहेत. तसंच महाराष्ट्रात सध्या शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत सापडला आहे. त्यामुळे सरकार स्थापनेनंतर लगेचच शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कर्जमाफीचा निर्णय घेण्यात येणार आहे.

महाविकास आघाडीचा समान कृती कार्यक्रम

धर्मनिरपेक्षता

- घटनेतील धर्मनिरपेक्षतेच्या मुलभूत मुल्यांना तिन्ही पक्ष बांधील राहतील.

- राष्ट्रीय तसेच प्रादेशिक दृष्ट्या संवेदनशील असलेल्या आणि धर्मनिरपेक्ष ताणाबाण्यावर परिणाम करू शकणाऱ्या मुद्द्यांवर तिन्ही पक्ष सल्लामसलतीने निर्णय करतील

शेतकरी

- अवकाळी पावसामुळे आणि पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीची मदत दिली जाईल.

- शेतकऱ्यांना तत्काळ कर्जमाफी दिली जाईल.

- पीकहानी झालेल्या शेतकऱ्यांना भरपाईच्या हमीसाठी पीक विमा योजनेचा तत्काळ फेरआढावा घेतला जाईल.

- शेतीमालाला योग्य दर मिळावा यासाठी उपाययोजना केल्या जातील.

- दुष्काळग्रस्त भागात कायमस्वरुपी पाणीपुरवठ्यासाठी ठोस पावले उचलली जातील.

बेरोजगारी

- राज्य सरकारच्या अखत्यारितील रिक्तपदे भरण्यासाठी तातडीची नोकरभरती मोहीम सुरू केली जाईल.

- सुशिक्षित बेरोजगारांसाठी शिष्यवृत्ती (बेरोजगार भत्ता) सुरू केली जाईल.

- भूमिपुत्रांना नोकरभरतीत 80 टक्के आरक्षण मिळावे यासाठी कायदा आणला जाईल.

दरम्यान, सत्तास्थापनेबाबत आज राज्यात महत्त्वपूर्ण घडामोडी घडणार आहेत. काल रात्री उशिरा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत हे सिल्वर ओक येथील शरद पवार यांच्या निवासस्थानी दाखल झाले होते. यावेळी सर्व नेत्यांमध्ये तब्बल दीड तास चर्चा झाली. आजही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते शिवसेना पक्षातील प्रमुख नेत्यांशी चर्चा करणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 22, 2019 10:13 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading