'शिवाजी पार्कवर शिवसेनेचा मुख्यमंत्री शपथ घेणार'

'अंतिम निर्णयापर्यंत उद्धव ठाकरे आले आहेत. महाराष्ट्रात शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल.'

News18 Lokmat | Updated On: Nov 3, 2019 11:06 AM IST

'शिवाजी पार्कवर शिवसेनेचा मुख्यमंत्री शपथ घेणार'

मुंबई, 3 नोव्हेंबर : 'सत्तेचं गणित जमलं की आम्ही माध्यमांसमोर मांडणार आहोत. पण आता अंतिम निर्णयापर्यंत उद्धव ठाकरे आले आहेत. महाराष्ट्रात शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल. ऑपरेशन कमळ महाराष्ट्रात चालणार नाही. काही दिवसांत शिवतीर्थावर शिवसेनेचा मुख्यमंत्री शपथ घेईल,' असा दावा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

'महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी पलटी मारली म्हणून चर्चा थांबली. आता चर्चा मुख्यमंत्रिपदावरच होईल. भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी निकालानंतर महाराष्ट्राकडे लक्ष दिलं नाही. चर्चेबाबत शहांनी पुढाकार घेतला नाही. कारण त्यांनी ही जबाबदारी राज्यातील नेतृत्वाकडे दिली आहे. हरियाणाचा तिढा सुटला, मग महाराष्ट्राचा का सुटला नाही?' असा सवाल करत संजय राऊत यांनी भाजपला लक्ष्य केलं.

'भाजपचा सामना संजय राऊतांशी'

राज्यात सत्तास्थापनेचा संघर्ष तीव्र झाला आहे. मुख्यमंत्रिपदाच्या समसमान वाटणीसाठी शिवसेना आणि भाजपमध्ये घमासान युद्ध सुरू झालं आहे. शिवसेनेकडून या लढाईचं नेतृत्व सरदार संजय राऊतांकडे देण्यात आलंय. शिवसेनेकडून ही लढाई एकहातीपणे संजय राऊतांकडे दिल्याचं स्पष्ट होतं आहे. लेखणीचे रोखठोक वार करणाऱ्या संजय राऊतांनी त्यांच्या सच्चाईच्या बाईटनं भाजपच्या नेतृत्वाला जेरीस आणलं आहे.

'सामना'चे 30 वर्षांपासून संपादक असलेले संजय राऊत शिवसेनेचे नेतेही आहेत. संजय राऊतांच्या लिखाणाचे राज्यात लाखो चाहते आहेत. ज्वलंत लिखाण हे त्यांचं खास वैशिष्ट्य. संजय राऊतांमुळे कधी कधी शिवसेना अडचणीतही येते. मात्र, अनेकदा अडचणीच्या काळात संजय राऊत शिवसेनेचा किल्ला लढवतात.

Loading...

2005 मध्ये नारायण राणेंनी शिवसेना सोडल्यानंतर मुंबईतल्या रस्त्यांवर शिवसैनिक आणि राणे समर्थक भिडले. शिवसेना अनेकदा बॅकफूटवर दिसली. त्यावेळी संजय राऊतांनी सामनातल्या बातम्या आणि अग्रलेखांनी राणेंना जेरीस आणलं. कुठेच सत्तेत नसलेल्या शिवसैनिकांच्या मनात अंगार पेटवला. आता सत्तेच्या संग्रामातही शिवसेनेची भूमिका संजय राऊत आक्रमकपणे मांडताना दिसत आहेत.

उद्धव ठाकरेंच्या आदेशाशिवाय संजय राऊत इतकी आक्रमक भूमिका घेणार नाहीत, हे ही तितकंच खरं आहे. संजय राऊतांच्या आडून उद्धव ठाकरेच सत्तेचा सारीपाट मांडत आहेत. त्यामुळे संजय राऊतांना उद्धव ठाकरेंनीच फ्री हँड दिल्याचं राजकीय विश्लेषक सांगतात.

परतीच्या पावसामुळे पिकांचं नुकसान; शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू, पाहा GROUND REPORT

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 3, 2019 10:58 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...