'नरेंद्र पाटलांना खासदार करण्याचं स्वप्न आहे', उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्र्यासमोरच वक्तव्य

'नरेंद्र पाटलांना खासदार करण्याचं स्वप्न आहे', उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्र्यासमोरच वक्तव्य

उद्धव ठाकरे यांनी माथाडी नेते नरेंद्र पाटील यांच्याबाबत केलेल्या एका वक्तव्याची जोरदार चर्चा होत आहे.

  • Share this:

नवी मुंबई, 25 सप्टेंबर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माथाडी कामगारांच्या नवी मुंबईतील कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी माथाडी कामगारांना संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी माथाडी नेते नरेंद्र पाटील यांच्याबाबत केलेल्या एका वक्तव्याची जोरदार चर्चा होत आहे.

'नरेंद्र पाटील हे लढवय्या पित्याचे लढवय्ये पुत्र आहेत. नरेंद्र पाटील यांनी जर थोडा आधी शिवसेनेत येण्याचा निर्णय घेतला असता तर आज ते इथे खासदार म्हणून बसले असते. लगेच साताऱ्याच्या जागेवरून कलगीतुरा असं नाही. पण यापुढेही नरेंद्र पाटील यांना खासदार करण्याचं आमचं स्वप्न आहे,' असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

लोकसभा निवडणुकीत सातारा मतदारसंघात उदयनराजे भोसले विरुद्ध नरेंद्र पाटील असा सामना रंगला होता. या निवडणुकीत उदयनराजेंनी नरेंद्र पाटलांचा पराभव केला. तेव्हा राष्ट्रवादीत असणाऱ्या उदयनराजेंनी खासदारकीचा राजीनामा देऊन आता भाजपमध्ये प्रवेश केला आहे. असं असताना उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र पाटलांना खासदार बनवण्याचं स्वप्न असल्याचं म्हटल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगत आहे.

साताऱ्यात होणार रणसंग्राम, लोकसभा पोटनिवडणुकीची तारीख जाहीर

सातारा लोकसभा पोटनिवडणुकीची तारीख जाहीर झाली आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांसोबतच ही पोटनिवडणूक होणार आहे. त्यामुळे या जागेसाठीही 21 ऑक्टोबरला मतदान होईल आणि 24 ऑक्टोबरला मतमोजणी होईल.

साताऱ्यातील खासदार उदयनराजे भोसले यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर साताऱ्यासह इतर भागातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले. 'सर्वांचा विरोध असताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीत उदयनराजेंना तिकीट दिलं. जनतेनंही उदयनराजेंच्या बाजूने कौल दिला. मग त्यांनी आता अवघ्या तीन महिन्यात पक्ष का सोडला,' असा प्रश्न राष्ट्रवादीकडून विचारला जात आहे.

उदयनराजेंच्या भाजप प्रवेशानंतर शरद पवार यांनी रविवारी पहिल्यांदाच साताऱ्यात दाखल होत जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. साताऱ्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात शरद पवारांचं स्वागत केलं. शरद पवारांच्या स्वागताला साताऱ्यात झालेल्या गर्दीनंतर उदयनराजेंसमोर मोठं राजकीय आव्हान उभं राहिलं आहे, अशी चर्चा आहे.

VIDEO : शरद पवारांवर गुन्हा दाखल झाल्यामुळे एकनाथ खडसेंनी व्यक्त केलं आश्चर्य, म्हणाले...

Published by: Akshay Shitole
First published: September 25, 2019, 1:32 PM IST

ताज्या बातम्या