मुंबई 27 मे : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर शिवसेना नेते आणि लोकसभेतील विजयी आणि पराभूत उमेदवारांची सोमवारी बैठक झाली. यात राज्यातल्या निकालांचा विभागवार आढावा घेण्यात येतोय. तसच पाच महिन्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुकांची मोर्चेबांधणी करण्यावर भर देण्यात येत आहे.
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आणि केंद्रातल्या नव्या मंत्रिमंडळासाठी शिवसेनेच्या उमेदवारांची निवड करणं यासाठी सध्या मातोश्रीवर मॅरेथॉन बैठका सुरू आहेत. तीन दिवसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथविधी आहे. त्यासाठी शिवसेनेकडून नावं सुचविली जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात किती जणांना शपथ दिली जाते याबाबत कमालीची गुप्तता पाळली जाते. त्याबरोबर कुणाचा समावेश होते याकडेही सगळ्यांचं लक्ष लागलंय.
आदित्य ठाकरे निवडणूक लढविणार?
लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजप-शिवसेने युतीने दणदणीत असा विजय मिळवत विरोधकांच्या तोंडचे पाणी पळवले. आता विधानसभेच्या दृष्टीने पुन्हा एकदा युतीने तयारी सुरु केली आहे. अशातच शिवसेनेचे युवा नेते आणि युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढवावी अशी आग्रहाची मागणी पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे.
ठाकरे कुटुंबातून आतापर्यंत कोणीही निवडणूक लढवलेली नाही. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठोपाठ उद्धव ठाकरे यांनी देखील निवडणुक लढवणार नसल्याचे म्हटले होते. पण आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढवावी अशी मागणी शिवसेना आणि युवासेनेचे पदाधिकारी करत आहेत. उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भात याआधीच स्पष्ट केले होते की, निवडणूक लढवायची की नाही याचा निर्णय आदित्य ठाकरे यांचाच असेल.
युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी इंस्टाग्रामवरुन ही मागणी केली आहे. वरुण हे आदित्य ठाकरे यांचे मावस बंधू देखील आहेत, त्यांनी इंस्टाग्रामवरून ही मागमी केली आहे. 'हीच वेळ आहे..हीच संधी आहे.. लक्ष्य - विधानसभा २०१९ !! महाराष्ट्र वाट पाहतोय', असा उल्लेख करत त्यांनी आदित्य ठाकरे यांचा फोटो शेअर केला आहे. या पोस्टमध्ये त्यांनी आदित्य ठाकरे यांना टॅग देखील केले आहे. लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशाच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची मातोश्रीवर बैठक होत आहे. या बैठकीत विधानसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा केली जाणार आहे. विधानसभेसाठीच्या याबैठकी आधीच आदित्य ठाकरे यांच्या निवडणूक लढवण्यासंदर्भातील बातमी समोर येत आहे. पुढील महिन्यात आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस आहे. या निमित्ताने होणाऱ्या कार्यक्रमात निवडणूक लढवण्यासंदर्भातील मोठी घोषणा केली जाऊ शकते.