विधानसभेसाठी शिवसेनेला 'इतक्या' जागा देण्यास भाजप तयार, फॉर्म्युल्यावर उद्धव ठाकरे नाराज?

विधानसभेसाठी शिवसेनेला 'इतक्या' जागा देण्यास भाजप तयार, फॉर्म्युल्यावर उद्धव ठाकरे नाराज?

या बैठकीत भाजपतर्फे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन तर शिवसेनेतर्फे सुभाष देसाई हे उपस्थित होते.

  • Share this:

मुंबई, 5 सप्टेंबर : विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेना या दोन पक्षांमध्ये जागावाटपाची पहिली फेरी पार पडली आहे. यावेळी महायुतीतील इतर घटकपक्षांना 18 जागा देण्यावर दोन्ही पक्षांची सहमती झाली असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. याचाच अर्थ या दोन्ही पक्षांमध्ये 270 जागांपैकी किती जागा वाटून घ्यायच्या आहेत यावर चर्चा होणार आहे.

भाजपला  160 पेक्षा जास्त जागा हव्या आहेत. पण शिवसेना मात्र भाजपला इतक्या जागा देण्यास तयार नाही. तर स्वत:साठी शिवसेनेला 110 पेक्षा कमी जागा अमान्य आहेत. त्यामुळे चर्चेच्या पहिल्या फेरीनंतर सध्यातरी भाजप 160, शिवसेना 110 आणि मित्रपक्ष 18 या फॉर्म्युल्याबाबत खलबतं सुरू असल्याचं दिसत आहे.  प्राथमिक फेरीत समोर आलेला हा फॉर्म्युला अंतिम नाही. यावर चर्चेच्या आणखी काही फेऱ्या बाकी आहेत. त्यानंतर अंतिम जागावाटप ठरणार आहे. या बैठकीत भाजपतर्फे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन तर शिवसेनेतर्फे सुभाष देसाई हे उपस्थित होते.

दरम्यान, काही दिवसांतच विधानसभा निवडणूक आचारसहिंता लागेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. अशातच निवडणुकीत महायुती विरुद्ध महाआघाडी असा सामना रंगणार की मागील निवडणुकीप्रमाणे सर्व पक्ष स्वबळाची वाट निवडणार, याची चर्चा सुरू झाली आहे.

मागील विधानसभा निवडणुकीत 25 वर्षांपासून असलेली शिवसेना-भाजपची युती तुटली. पण त्यानंतर सत्तास्थापनेसाठी हे दोन्ही पक्ष एकत्र आले. त्यानंतर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही शिवसेना-भाजपने युती केली. पण आता आगामी विधानसभा निवडणुकीतही भाजप सेना युती होणार की नाही, याबाबतचा संभ्रम कायम आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कोणत्या अटींवर युती करायची याबाबत आपल्या पक्षातील नेत्यांना सूचना दिल्याची माहिती आहे. 'शिवसेनेसोबत युती करा, तडजोड नाही,' अशा थेट सूचना पंतप्रधान मोदींनी भाजप अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्याची माहिती आहे. मोदींच्या या सूचनांनंतर जागावाटपात भाजपने आक्रमक भूमिका घेत जास्त जागांची मागणी केल्यास शिवसेनेची डोकेदुखी वाढणार आहे.

VIDEO: पुन्हा सत्ता काबीज करण्यासाठी फॉर्म्युला ठरणार, युतीची चर्चा आजपासून सुरू

Published by: Akshay Shitole
First published: September 5, 2019, 10:23 AM IST

ताज्या बातम्या