मुंबई, 11 जानेवारी : भाजप आणि शिवसेना यांच्यातील लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाची चर्चा पुढे सरकली असल्याची माहिती आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत दोन्ही पक्षांनी जिंकलेल्या जागा स्वत:कडे कायम ठेवणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
मागील लोकसभा निवडणुकीत शिवसेनेनं 18 तर भाजपनं 23 जागांवर विजय मिळवला होता. आगामी निवडणुकीसाठी युतीमध्ये दोन्ही पक्ष आपण जिंकलेल्या जागा स्वत:कडे ठेवून घेणार आहेत. म्हणजे युतीसाठीच्या 41 जागांबाबतचा निर्णय अंतिम टप्प्यात आहे. याबाबत भाजप-सेनेने कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. मात्र काही दिवसांपासून युतीच्या चर्चा समोर येत आहेत. त्यातच या फॉर्म्युला ठरल्याची सूत्रांची माहिती आहे.
उर्वरित 7 जागांचा निर्णय बाकी
मागील निवडणुकीत भाजप-सेनेनं मित्रपक्षांना सोबत घेत महायुती केली होती. त्यामुळे काही जागा मित्रपक्षांनाही सोडल्या होत्या. त्यामुळे हे दोन्ही पक्ष पराभूत झालेल्या आणि मित्रपक्षांना सोडलेल्या अशा एकूण 7 जागांवरील युतीची चर्चा अद्याप बाकी असल्याची माहिती आहे.
युतीसाठी पंतप्रधान मोदींचा पुढाकार
शिवसेनेसोबतचा तणाव कमी व्हावा यासाठी आता खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढाकार घेणार असल्याची माहिती आहे. आगामी लोकसभा निवडणुका लक्षात घेता महाराष्ट्रात शिवसेनेची भूमिका महत्त्वाची ठरू शकते. त्यामुळेच भाजपकडून शिवसेनेला सोबत घेण्याच्या हालचालींना आता वेग आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी 23 जानेवारीला मुंबईत येण्याची शक्यता आहे. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक आणि समृद्धी महामार्गाच्या भूमीपूजनासाठी पंतप्रधान मोदी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकाच मंचावर यावेत असा भाजपचा शिवसेनेला प्रस्ताव आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या समृद्धी महामार्गाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याचा प्रस्ताव भाजपने शिवसेनेसमोर मांडला असल्याचीही माहिती आहे. भाजपकडून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या या प्रयत्नांनंतर शिवसेना नेमका काय निर्णय घेणार याकडे आता राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
VIDEO : 'ती सुंदर मुलगी वाघाला कुत्रं समजून मारते', धनंजय मुंडेंचा शिवसेनेवर अप्रत्यक्ष हल्लाबोल