शिवसेनेनं काढला वचपा, कल्याणमध्ये राष्ट्रवादीला दणका देत केली परतफेड

शिवसेनेनं काढला वचपा, कल्याणमध्ये राष्ट्रवादीला दणका देत केली परतफेड

शिवसेना-राष्ट्रवादीत ठिणगी पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत असतानाच शिवसेनेनं कल्याणमध्ये राष्ट्रवादीला दणका देत वचपा काढला आहे.

  • Share this:

कल्याण, 6 जुलै : पारनेरमधील शिवसेनेच्या 5 नगरसेवकांनी नुकताच राष्ट्रवादीत प्रवेश केला. बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हे नगरसेवक राष्ट्रवादीत दाखल झाल्याने हा प्रवेश राज्यभर गाजला. या प्रकरणावरून शिवसेना-राष्ट्रवादीत ठिणगी पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत असतानाच शिवसेनेनं कल्याणमध्ये राष्ट्रवादीला दणका देत वचपा काढला आहे.

शिवसेनेने रविवारी कल्याण आणि अंबरनाथ पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपसोबत हातमिळवणी राष्ट्रवादीला धोबीपछाड दिला आहे. त्यामुळे कल्याण पंचायत समितीत राष्ट्रवादीला सभापती आणि उपसभापतीपदावर पाणी सोडावे लागले आहे.

कल्याण आणि अंबरनाथ तालुका पंचायत समिती सभापती-उपसभापतीपदाची निवडणूक घेण्यात आली. कल्याणमध्ये भाजपचे 5, शिवसेनेचे 4, राष्ट्रवादीची 3 असे पंचायत समिती सदस्य आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादीत ठरल्यानुसार सभापतीपद आणि उपसभापतीपद राष्ट्रवादीला देण्यात येणार होते. मात्र रविवारी सकाळी अचानक मुरबाडचे भाजप आमदार किसन कथोरे आणि शिवसेना नेत्यांचे अचानक सूर जुळले.

राष्ट्रवादीला दोन्ही पदे देण्याऐवजी भाजपने शिवसेनेला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. वास्तविक शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये ठरल्यानुसार शिवसेनेचे सभापती व उपसभापतीपदाचे उमेदवार रविवारी अर्ज मागे घेणार होते. मात्र भाजप आमदार किसन कथोरे आणि कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रवींद्र घोडविंदे यांनी कल्याण बाजार समिती राष्ट्रवादीच्या घशात घालण्याचा डाव पूर्णपणे उधळून लावला.

रविवारी पार पडलेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या अनिता दशरथ वाकचौरे यांनी सभापतीपदी बाजी मारली तर, शिवसेनेचे रमेश बांगर उपसभापतीपद मिळालं. या निवडणुकीतील मतदानामध्ये शिवसेनेच्या अनिता वाकचौरे यांना 7 मते मिळाली, तर राष्ट्रवादीच्या दर्शना जाधव यांना 5 मते मिळाल्याने शिवसेनेच्या अनिता वाकचौरे या सभापतीपदी विराजमान झाल्या.

संपादन - अक्षय शितोळे

Published by: Akshay Shitole
First published: July 6, 2020, 3:54 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading