मुंबई 14 फेब्रुवारी : महाराष्ट्रात युती होणार की नाही याची चर्चा गेली कित्येक महिने सुरू होती. या चर्चेला आता पुर्ण विराम मिळण्याची शक्यता आहे. गुरुवारी मुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मातोश्रीवर जाऊन भेट घेतली होती. त्यानंतर युतीचा तिढा सुटला असल्याचे समजते.
याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, युती संदर्भात जागा वाटप निश्चित झाले आहे. यात लोकसभेसाठी भाजपकडे 25 जागा तर शिवसेनेकडे 23 जागा राहणार आहेत. तर विधानसभेसाठी भाजपकडे 144 तर शिवसेनेकडे 144 जागा असतील. भाजपने पालघरची जागा शिवसेनेसाठी सोडली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून युतीवर ठोस निर्णय होत नव्हता. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे थेट मातोश्रीवर जाऊन युतीची चर्चा केली. गुरुवारचा दिवस हा युतीच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरला. दिवसभर विदर्भातले कार्यक्रम आटोपून मुख्यमंत्री सायंकाळी मुंबईत पोहोचले होते. विदर्भात त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना काही काळ आराम करावा लागला होता. मुंबई आल्यानंतर पुन्ह मुख्यमंत्र्यांनी बैठकिंना सुरुवात केली.
शिवसेनेचे नेते सुभाष देसाई आधी वर्षा बंगल्यावर पोहोचले होते. त्यांच्यात आणि मुख्यमंत्र्यांमधे चर्चा झाली. त्यानंतर त्यात चंद्रकांत पाटील त्या चर्चेत सामील झाले. त्यानंतर मुख्यमंत्री आणि चंद्रकांत पाटील मातोश्रीसाठी निघाले. मातोश्रीवर सर्व नेत्यांनी चर्चा केली.