उदयनराजे की अजित पवार? शिवेंद्रराजे भोसलेंनी दिलेल्या उत्तराने सर्वच अचंबित

उदयनराजे की अजित पवार? शिवेंद्रराजे भोसलेंनी दिलेल्या उत्तराने सर्वच अचंबित

शिवेंद्रराजे यांनी एका प्रश्नावर दिलेल्या उत्तराने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

  • Share this:

मुंबई, 13 ऑक्टोबर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी शिवेंद्रराजे भोसले यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपने त्यांना विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारीही दिली आहे. याच शिवेंद्रराजे यांनी एका प्रश्नावर दिलेल्या उत्तराने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

महाराष्ट्राच्या राजकारणातील आवडता नेता कोण? असा प्रश्न विचारताना शिवेंद्रराजे भोसले यांना अजित पवार, उदयनराजे भोसले, रामराजे निंबाळकर असे काही पर्याय देण्यात आले होते. या प्रश्नावर शिवेंद्रराजे यांनी आपल्याला अजितदादा पवार यांचं नेतृत्व आवडत असल्याचं म्हटलं आहे.

'मी राष्ट्रवादीत असताना अजितदादांनी मला अनेकदा ताकद दिली आहे. अगदी माझ्या पहिल्या निवडणुकीपासून त्यांनी मला मदत केली आहे,' असं शिवेंद्रराजे भोसले म्हणाले. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शिवेंद्रराजेंनी ही प्रतिक्रिया दिली आहे. शिवेंद्रराजेंनी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्या उदयनराजे यांच्याऐवजी अजित पवारांना पसंती दाखवल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

विधानसभा निवडणूक आणि साताऱ्यातील राजकारण

भाजपमध्ये प्रवेश केलेल्या शिवेंद्रराजे भोसले यांना आव्हान देण्यासाठी राष्ट्रवादीने मोठी खेळी खेळली. विधानसभा निवडणुकीत दोन वेळा भाजपचे उमेदवार राहिलेल्या भाजपच्या दीपक पवार यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. शिवेंद्रराजे हटाव'चा नारा देत दीपक पवार राष्ट्रवादीत दाखल झाले. त्यानंतर राष्ट्रवादीने त्यांना उमेदवारीही दिली.

मागील विधानसभा निवडणुकीत शिवेंद्रराजे यांच्याविरोधात दीपक पवार यांनी अटीतटीची लढत दिली होती. त्यामुळे शिवेंद्रराजे विरुद्ध दीपक पवार ही लढत रंगतदार होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर भाजपने साताऱ्याचे एकेक मोहरे आपल्या तंबूत घेतले. त्यामुळे राष्ट्रवादीच्या साताऱ्याच्या बालेकिल्ल्याला खिंडार पडून इथे पहिल्यांदाच भाजपचा झेंडा फडकणार असल्याची चिन्हं असल्याची चर्चा आहे. याआधीच्या दोन निवडणुकांमध्ये सातारा जिल्ह्यातली एकही जागा भाजपला मिळाली नव्हती. आता मात्र समीकरणं बदलण्याची शक्यता आहे.

साताऱ्याचे राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि खासदार उदयनराजे या दोघांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. रामराजे नाईक निंबाळकर हे शिवसेनेच्या वाटेवर असल्याचीही चर्चा झाली होती. माणचे काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरेंनीही भाजपचा रस्ता धरला.

या सगळ्या नेत्यांचा भाजप प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेसला चांगलाच महागात पडू शकतो. राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात यावेळी 4 आमदार निवडून आणण्याचा निर्धार भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 13, 2019 10:35 PM IST

ताज्या बातम्या