Home /News /maharashtra /

अयोध्या हे 'मवाळ' उद्धव ठाकरेंच्या 'आक्रमक' राजकारणाची सुरुवात!

अयोध्या हे 'मवाळ' उद्धव ठाकरेंच्या 'आक्रमक' राजकारणाची सुरुवात!

उत्तर भारतीयांना जो राग शिवसनेनेबद्दल कधी काळी होता, तोच राग आता मनसेबद्दल आहे. त्यामुळंच उद्धव यांनी अयोध्येत जावून उत्तर भारतीयांबद्दल शिवसेनेच्या मनात राग नाही तर प्रेम आहे हे सांगितलं. हे राज यांना खटकणारं आहे.

मुंबई, ता.25 नोव्हेंबर : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या भेटीची अपेक्षेप्रमाणं देशपातळीवर सगळ्यांनी दखल घेतली. महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन शक्तिप्रदर्शन करण्याची शिवसेनेची ही पहिलीच वेळ. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही राज्याबाहेर जाण्याचं धाडस कधी दाखवलं नव्हतं. ते धाडस उद्धव ठाकरेंनी दाखवलं तेही अशा वेळी जेव्हा नरेंद्र मोदी देशातले शक्तिशाली नेते आहेत. अयोध्येसारख्या नाजूक प्रश्नावर मोदींना थेट आव्हान देण्याचं धाडस दाखवून उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या राजकारणाची चौकट मोडलीय. शिवसेनेच्या या नव्या खेळीनं भाजपलाही धक्का दिलाय. याचं मोठं कारण म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी राजस्थानमधल्या प्रचारसभेत अयोध्या प्रश्नाचा उल्लेख करत काँग्रेसला टार्गेट केलंय. ऐकेकाळी उत्तर भारतीयांना झोडण्याचा उद्योग करणाऱ्या शिवसेनेने थेट उत्तरेतल्या अयोध्येतून राजकारणात नवा सेतू उभारण्याची सुरूवात केली आहे. सर्व फोटो सौजन्य - पीटीआय
सर्व फोटो सौजन्य - पीटीआय
चौकट मोडणारं राजकारण सामनाचा अग्रलेख, मोतोश्री आणि मुंबईतून शिवसेनेने गेल्या 50 वर्षात देशातल्या राजकारणावर भाष्य केलं, इशारे दिले, धमक्या दिल्या. देशात आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरही त्याची दखल घेतली गेली. बाळासाहेब ठाकरे यांना लाभलेलं 'वलय' त्यांची खास 'शैली' यामुळं ते कायम वादग्रस्त आणि चर्चेत असायचे. वादळ निर्माण करायचे पण हे करत असताना बाळासाहेबांनी महाराष्ट्राची सीमा कधी ओलांडली नाही. सहारीश्रींच्या मुलाच्या लग्नाचा अपवाद वगळता बाळासाहेब कधी राज्याबाहेर गेले नाहीत आणि विमानप्रवासही त्यांनी जास्त कधी केला नाही. 'मोतोश्री' हाच त्यांच्या सर्व राजकारणाचा केंद्र बिंदू होता. शरद पवार किंवा इतर राजकारणी ज्या प्रमाणं पायाला भिंगरी लावल्यासारखं देशभर फिरतात, गावं गाव पिंजून काढतात तसं ठाकरे घराण्यातल्या कुठल्याही नेत्याने केलं नाही. त्यामुळं त्यांच्या भोवती एक गुढ वलय निर्माण झालं. लोकांनीही त्यांना त्याच स्वरूपात स्वीकारलं. 'मवाळ' उद्धव ठाकरेंचं 'धाडस' उद्धव ठाकरेंच्या हातात शिवसेनेची धुरा आल्यानंतर त्यांनी बदलाला सुरूवात केली. आदेश आणि भावनांवर चालणाऱ्या शिवसेनेचं काहीसं लोकशाहीकरण झालं. संघटनेत आणि कामकाजात शिस्त आली. बाळासाहेबांनीही उद्धव यांना कधी आडकाठी आणली नाही. त्यामुळं उद्धव ठाकरेंनाही बळ मिळालं. बाळासाहेबांची आणि उद्धव यांची स्टाईल वेगळी होती. बाळासाहेब जहाल तर उद्धव मवाळ. त्यामुळं शिवसेनेचं काय होणार असा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता. उद्धव यांच्यावर टीकाही झाली. मात्र या सगळ्या टीकेनंतरही त्यांनी आपल्या पद्धतीने अनेक निर्णय घेतले. भाजपशी युती तोडणं, स्वबळाचा नारा देणं आणि आता थेट अयोध्येत जाऊन भाजपला अंगावर घेणं असे अनेक धाडसी निर्णय उद्धव ठाकरेंनी घेतल्यानं शिवसेनेची पुढची वाटचालही अशीच राहणार असल्याचं त्यांनी दाखवून दिलंय. राज ठाकरेंची चिंता वाढणार राज ठाकरेंचची कार्यशैली ही बाळासाहेबांशी मिळती जुळती. आक्रमकपणा आणि वलय त्यांना लाभलं. याच आक्रमक शैलीच्या जोरावर त्यांनी अनेकदा उद्धव यांची हेटाळणी केली. टिंगलही केली. मवाळ उद्धव यांना सोडून लोक आपल्याकडे येतील असा त्यांचा अंदाज होता मात्र झालं उलटच. मनसेची वाढ खुंटत गेली. राज यांचं व्यक्तिगत आकर्षण अजुनही कायम असलं तरी पक्ष म्हणून मनसेची वाढ मर्यादीत राहिली तर शिवसेना वाढत गेली. उद्धव यांनी अयोध्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घतल्यानं शिवसेनेची चर्चा नव्यानं होऊ लागली आहे. आगामी निवडणुकीत याचा सेनेला फायदा होऊ शकतो. त्यामुळं राज ठाकरे आणि मनसेची चिंता वाढणार आहे. राज ठाकरे यांचा रोख कायम उत्तर भारतीयांवर असतो. उत्तर भारतीयांना जो राग शिवसनेनेबद्दल कधी काळी होता, तोच राग आता मनसेबद्दल आहे. त्यामुळंच उद्धव यांनी अयोध्येत जावून उत्तर भारतीयांबद्दल शिवसेनेच्या मनात राग नाही तर प्रेम आहे हे सांगितलं. हे राज यांना खटकणारं आहे. तर उद्धव ठाकरेंची ही आक्रमक भूमिका मनसैनिकांना आकर्षित करू शकते त्यामुळं राज ठाकरे आणि मनसेची चिंता वाढण्याचीच शक्यता आहे. संजय राऊतांच वजन वाढणार उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याची सगळी सूत्र सांभाळली ती खासदार संजय राऊत यांनी. त्यासाठी संजय राऊत यांनी अयोध्येत ठाण मांडून सगळी व्यवस्था राबवली. कुठेही कमतरता राहणार नाही याची काळजी घेतली. या दौऱ्याची देशभर चर्चा होईल याची व्यवस्था केली. त्यामुळं हा दौराही चांगलाच गाजला. खासदार म्हणून देशपातळीवर असलेल्या संपर्काचा त्यांनी फायदा करून घेतला. यामुळं पक्षातलं त्याचं वजन वाढणार आहे. भाजपला 'चेकमेट'? लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेने राम मंदिराचा मुद्दा उचलल्याने भाजपची चिंता वाढलीय. हा भाजपला शिवसेनेचा 'चेकमेट' असल्याचं बोललं जातंय. त्यामुळं कधी नव्हे ते पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजस्थानमधल्या प्रचारसभेत काँग्रेसवर टीकेचं निमित्त साधत अयोध्येचा मुद्दा उपस्थित केला. तर विहिंपने देशातल्या तीन मुख्य शहरांमध्ये हुंकार सभा घेण्याचं जाहीर करत नागपूरातून सुरूवात केली. तर अयोध्येत धर्मसभा घेत वातावरण तापवायला सुरूवात केली. शिवसेनेच्या या आक्रमक भूमिकेवर आता राम कुणाचा? या श्रेयाच्या लढाईला सुरूवात होणार आहे.
First published:

Tags: BJP, Narendra modi, Ram Mandir, Ram temple, Shiv sena, Uddhav thackeray, अयोध्या, उद्धव ठाकरे, नरेंद्र मोदी, भाजप, राम मंदिर, शिवसेना

पुढील बातम्या