मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /नाणार रिफायनरीचा वाद पेटला, शिवसेनेच्या विनायक राऊतांना चपलेनं मारण्याचं BJP नेत्याचं विधान

नाणार रिफायनरीचा वाद पेटला, शिवसेनेच्या विनायक राऊतांना चपलेनं मारण्याचं BJP नेत्याचं विधान

नाणार रिफायनरी प्रकल्पावरुन भाजप व शिवसेनेमधील संघर्ष पेटला आहे

नाणार रिफायनरी प्रकल्पावरुन भाजप व शिवसेनेमधील संघर्ष पेटला आहे

नाणार रिफायनरी प्रकल्पावरुन भाजप व शिवसेनेमधील संघर्ष पेटला आहे

रत्नागिरी, 3 मार्च : कोकणात रिफायनरीला समर्थन करणाऱ्या शिवसैनिकांचं थोबाड फोडा, असं खासदार विनायक राऊत यांनी वक्तव्य केलं होतं. त्यावरुन आता हे प्रकरण पेटलं आहे. यामध्ये आता भाजपच्या नेत्यांच्या विधानामुळे वाद तीव्र झाल्याचे दिसून येत आहे. रिफायनरीचा विरोध करण्यासाठी घेतलेल्या सभेनंतर दुसऱ्याच दिवशी रिफायनरी समर्थकांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी भाजपचे  माजी आमदार प्रमोद जठार यांनी विनायक राऊत यांना चपलेनं मारु, नागवं करु अशी प्रक्षोभक विधानं केली आहेत. त्यामुळे रिफायनरीच्या मुद्द्यावरुन शिवसेना आणि भाजपात आता टोकाचा संघर्ष सुरु झाला.

कसा पेटला वाद ? 

काही दिवसांपूर्वी 'सामना' या शिवसेनेच्या मुखपत्रात रिफायनरीची जाहिरात छापून आल्यानंतर शिवसेनेच्याच काही पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या विरोधात जाऊन उध्दव ठाकरेंच्या दौऱ्यात रिफायनरीचं उघड समर्थन केलं होतं. या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना बडतर्फ करण्यात आलं. रिफायनरी रद्द करणार असल्याची भूमिका घेणारे शिवसेना पक्षातले कार्यकर्ते  रिफायनरीच समर्थन करायला पुढे आल्यामुळे शिवसेनेच्या नेत्यांना पक्षाची विरोधाची भूमिका स्पष्ट करण्यासाठी एक मार्चला रिफायनरी विरोधी सभा घ्यावी लागली. या सभेत खासदार विनायक राऊत यांनी जे शिवसैनिक रिफायनरीच समर्थन करतील त्यांचं चपलेनं थोबाडं फोडा, असे जाहीर आदेश दिले. राऊत यांच्या या वक्तव्यावरुन अनेक शिवसैनिक नाराज झाले. म्हणून लगेचच दुसऱ्या दिवशी म्हणजे दोन मार्चला रिफायनरी समर्थकांनी घेतलेल्या सभेत हे नाराज शिवसैनिक  हजर राहिले. याच नाराज शिवसैनिकांना आपलसं करण्यासाठी सभेला आलेल्या भाजपच्या नेत्यांनी राऊतांच्या या वक्तव्याचा निषेध केला. रिफायनरीचे समर्थक आणि माजी भाजप आमदार प्रमोद जठार यांनी तर या जाहीर सभेत शिवसैनिकांच थोबाड फोडण्याची भाषा करणाऱ्या विनायक राऊतांनाच ते जिथे असतील तिथे चपलेने मारू, असा जाहीर इशारा दिला. मात्र भाजप नेते जठार यांच्या या वक्तव्यामुळे आता रिफायनरीवरुन सेना भाजपात जोरदार संघर्ष सुरु झाला आहे. प्रमोद जठार यांनी खासदार राऊत यांची जाहीर माफी मागितली नाही, तर लवकरच त्यांना धडा शिकवला जाईल असा इशारा सिंधुदुर्गातल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.

काय आहे रिफायनरीचं राजकारण

पक्षाच्या विरोधात जाऊन रिफायनरीचं समर्थन करणारे शिवसैनिक हे राजापूरचे शिवसेना आमदार राजन साळवी यांचे कट्टर कार्यकर्ते आहेत. त्यामुळे या समर्थक शिवसैनिकाना आमदार राजन साळवींची फूस आहे अशी चर्चा आहे. म्हणूनच एक मार्चला झालेल्या रिफायनरीविरोधी सभेत खासदार विनायक राऊत आणि मंत्री उदय सामंत यांनी रिफायनरी समर्थक शिवसैनिकांवर कारवाईचे आदेश दिले असले तरी त्या सभेला उपस्थित असलेले आमदार राजन साळवी यांनी या पक्षाच्या विरोधात जाऊन रिफायनरीचं समर्थन करणाऱ्या शिवसैनिकांबद्दल अवाक्षरही काढलं नाही. त्यात आधीपासूनच सुरु असलेल्या राजन साळवी आणि उदय सामंत वादामुळे साळवी नाराज आहेत. अशा परिस्थितीत साळवींची राजकीय कोंडी करण्यासाठी त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांची शिवसेनेकडून हकालपट्टी करण्यात आली. हेच नाराज शिवसैनिक जर आपल्या गळाला लागले तर राजापूर तालुक्यात मजबूत असलेल्या शिवसेनेला खिंडार पडेल हा भाजपचा राजकीय डावपेच आहे. म्हणूनच भाजपचे माजी आमदार प्रमोद जठार यांनी या जाहीर सभेत सेना आमदार राजन साळवींचीही स्तुती करीत त्यांना भाजपासोबत येण्याचं आव्हान केलं. पण हे आव्हान करीत असताना नाराज शिवसैनिकांना खूष करण्यासाठी खासदार विनायक राऊत यांना चपलेने मारु असं प्रक्षोभक विधान त्यांनी केल्यामुळे आता राऊतांचे कार्यकर्ते भडकले आहेत. येत्या काही दिवसांत हा भडका आणखी मोठा होऊन सेना भाजपाचे कार्यकर्ते एकमेकांना रस्त्यावर भिडण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान रिफायनरी समर्थक संघटनेने आपल्याकडे साडेसात हजार एकरची जमीन संमती असल्याचा दावा केल्यामुळे रद्द झालेल्या रिफायनरीचा मुद्दा आता पुन्हा चर्चेत आला आहे.

First published:
top videos

    Tags: Bjp-shivsena, Nanar, Vinayak Raut