संजय राऊतांचं कन्हैया कुमारबद्दल 'रोखठोक' मत; निवडणूक आयोगानं पाठवली नोटीस

संजय राऊतांचं कन्हैया कुमारबद्दल 'रोखठोक' मत; निवडणूक आयोगानं पाठवली नोटीस

संजय राऊत यांना देखील आचारसंहिता उल्लंघन प्रकरणी नोटीस पाठवण्यात आली आहे.

  • Share this:

मुंबई, 02 एप्रिल : शिवसेना नेते आणि 'सामना' या वृत्तपत्राचे संपादक संजय राऊत यांना जिल्हा निवडणुक अधिकारी मुंबई यांनी आचारसंहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी नोटीस पाठवली आहे. 'सामना'तील आपल्या 'रोखठोक' या सदरामध्ये संजय राऊत यांनी सीपीआयचे बेगुसरायमधील उमेदवार कन्हैया कुमार यांच्याविरोधात लिखाण केलं होतं. यामध्ये त्यांनी 'भाजपनं हवं तर EVMशी छेडछाड करून त्याचा पराभव करावा. पण, बाटलीतील हे विष संसदेमध्ये पोहोचता कामा नये' असं मत मांडलं होतं. त्यांच्या या सदरातील लिखाणाची दखल घेण्यात आली असून त्यांना आता नोटीस पाठवण्यात आली आहे. यावर आता संजय राऊत काय उत्तर देणार हे पाहावं लागणार आहे. सोमवारी संजय राऊत यांना नोटीस पाठवण्यात आली असून बुधवारीपर्यंत उत्तर देण्यास सांगण्यात आलं आहे. मुंबईचे जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी ही नोटीस पाठवली आहे.

काय म्हणाले संजय राऊत?

दरम्यान, यावर विचारले असता संजय राऊत यांनी 'सामनामधील लिखाणाबाबत मला नोटीस मिळाली आहे. आम्ही निवडणूक आयोगाचा पूर्ण आदर करत असून दिलेल्या वेळेत निवडणूक आयोगाला उत्तर दिलं जाईल' अशी प्रतिक्रिया दिली.

गिरीराज सिंह यांना आव्हान

दरम्यान, लोकसभेच्या रिंगणात बेगुसरायमधून लढणाऱ्या कन्हैया कुमार यांनी भाजपचे केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांना थेट आव्हान दिलं आहे. त्यामुळे देशातील सर्वाचं लक्ष देखील या लढतीकडे आहे. लोक वर्गणीतून कन्हैया कुमार यांनी निवडणुकीकरता पैसे गोळा केले आहेत. जेएनयुमध्ये झालेल्या आंदोलनानंतर कन्हैया कुमार राजकारणात सक्रिय झाले. दरम्यान, त्यांनी वेळोवेळी भाजपला देखील लक्ष्य केलं आहे.

VIDEO: 'देश पुन्हा काँग्रेस आणि भ्रष्टाचाऱ्यांच्या घशात घालायचा का?' उद्धव ठाकरे UNCUT

First published: April 2, 2019, 12:16 PM IST

ताज्या बातम्या