गांधी नेहरू घराण्याची बाजू घेत सेनेची भाजपवर बोचरी टीका

गांधी नेहरू घराण्याची बाजू घेत सेनेची भाजपवर बोचरी टीका

'अर्थव्यवस्थेचा बोजवारा उडाला त्याला नेहरू- गांधी जबाबदार नाहीत', असं सामनाच्या ताज्या अग्रलेखात म्हटलं आहे. पंतप्रधान मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर बोचरी टीका या लेखातून करण्यात आली आहे.

  • Share this:

मुंबई, 10 डिसेंबर : महाराष्ट्रात सत्तारूढ शिवसेना आघाडीने केंद्रातल्या भाजप सरकारला कांदे महागले, महागाई वाढली यासाठी धारेवर धरलं आहे. शिवसेनेचं मुखपत्र 'सामना'च्या लेखात भाजपवर बोचरी टीका करताना गांधी -नेहरूंची बाजू उचलून धरण्यात आली आहे. 'अर्थव्यवस्थेचा बोजवारा उडाला त्याला नेहरू- गांधी जबाबदार नाहीत', असं लेखात म्हटलं आहे.

'सामना'च्या अग्रलेखात अर्थतज्ज्ञ रघुराम राजन यांनी मांडलेल्या विचारांचा उल्लेख केला आहे. 'जय जय रघुवीर समर्थ' या मथळ्याखाली लिहिलेल्या लेखात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावरही टीका करण्यात आली आहे. 'कांद्याचे भाव 200 रुपये किलो झाल्यावर मी कांदा-लसूण खात नाही, त्यामुळे कांद्याचे मला विचारू नका असे बेताल विधान करणाऱ्या श्रीमती अर्थमंत्री देशाला लाभल्या आहेत व पंतप्रधानांना त्यात सुधारणा करण्याची इच्छा दिसत नाही', असं लेखात म्हटलं आहे.

'नाकास कांदा लावून बेशुद्ध व्यक्तीस शुद्धीवर आणले जाते, पण आता बाजारातून कांदाच गायब झाल्यावर तेदेखील शक्य नाही. पुन्हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा जो बोजवारा उडाला आहे त्यास पंडित नेहरूंना व इंदिरा गांधींना जबाबदार धरता येणार नाही. विद्यमान सरकार तज्ञांचे ऐकण्याच्या मनःस्थितीत नाही व देशाची अर्थव्यवस्था म्हणजे त्यांच्या दृष्टीने शेअर बाजाराचा ‘सट्टा’ झाला आहे. निर्मला सीतारामन या अर्थमंत्री आहेत, पण अर्थकारणात त्यांचे योगदान काय?' असा सवाल या संपादकीय लेखात करण्यात आला आहे.

'देशाची अर्थव्यवस्था देशपातळीवर कशी काम करते यापेक्षा राज्याच्या पातळीवर कशी काम करते याचे ज्ञान संबंधित तज्ञ व्यक्तींना नाही. त्यामुळे त्यांनी आखलेला कार्यक्रम अर्थव्यवस्थेसाठी सुसंवादी नाही, असे रघुराम राजन सांगतात ते योग्यच आहे, असंही लेखात म्हटलं आहे.'

मोदींवर टीका करताना सामनाने म्हटलं आहे की, 'आपली अर्थव्यवस्था ‘आजारी’ आहे, पण मोदी सरकार तेही मान्य करायला तयार नाही. त्यामुळे आजार लपवल्यामुळे अर्थव्यवस्थेला नायटा झाला व खाजवायची चोरी झाली. पुन्हा खाजवाल तर गुन्हेगार किंवा देशद्रोही ठरवले जाल अशी आपली अर्थव्यवस्था तळमळताना आणि तडफडताना दिसत आहे. आम्ही फक्त चिंता व्यक्त करू शकतो! ‘जय जय रघुराम समर्थ’ म्हणण्याशिवाय दुसरा पर्याय तरी कुठे आहे!'

First published: December 10, 2019, 2:56 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading