जळगाव, 18 ऑक्टोबर : 'भाजपला बिहारमध्ये राजपूत समाजाची मते हवी आहेत. राजपूत समाजाच्या 8 टक्के मतांवर डोळा ठेवूनच भाजपाकडून सुशांतसिंह राजपूत जिंदाबाद अशी घोषणा दिली जात आहे,' असा आरोप करत शिवसेनेचे प्रवक्ते तथा राज्याचे सार्वजनिक पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. गुलाबराव पाटील हे आज सायंकाळी जळगावात आले होते. शहरातील अजिंठा विश्रामगृहात असताना ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी गुलाबराव पाटलांनी शिवसेनेचा दसरा मेळावा, बिहार निवडणूक, भाजप नेत्यांकडून महाविकास आघाडी सरकारवर होणारी टीका अशा मुद्द्यांवर भाष्य केलं.
'बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतला न्याय देण्यासाठी राज्य सरकारच्या विरोधात सगळ्या गोष्टी करण्यात आल्या. सुरुवातीला या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडून सुरू असताना विरोधकांनी केलेल्या मागणीनुसार, सीबीआयने तपास हाती घेतला. दीड महिने तपास केल्यानंतर त्यात काय तथ्य निघाले तर, सुशांतसिंहने आत्महत्या केली. त्याचे ड्रग्ज कनेक्शन समोर आले. ही गोष्ट किंवा राज्य सरकार सांगत नाही. विरोधकांच्या आग्रहानुसार जी एजन्सी या प्रकरणाच्या तपासकामी नेमण्यात आली, तिच्या तपासात या बाबी समोर आल्या आहेत. आम्ही सुरुवातीपासून सांगत आहोत की, सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण हे भाजपाने सोडलेले पिल्लू आहे. भाजपाला बिहारमध्ये राजपूत समाजाची असलेली 8 टक्के मते हवी आहेत, म्हणूनच ते सुशांतसिंह जिंदाबाद असे म्हणत आहेत,' अशी टीका गुलाबराव पाटलांनी केली.
सरकार कोसळण्याच्या दाव्यावरून पलटवार
भाजप नेत्यांकडून महाविकास आघाडी सरकारवर तीनचाकी सायकल म्हणून टीका केली जात असून हे सरकार कधीही कोसळेल, असे वारंवार सांगितले जात आहे. याबाबत पत्रकारांनी विचारणा केली असता गुलाबराव पाटील म्हणाले की, भाजपा नेत्यांच्या या टीकेला आता वर्ष होत आले आहे. पण अजूनही सरकार चांगल्या पद्धतीने काम करत आहे. यापुढेही पाच वर्षे आमचे सरकार काम करतच राहील, असा दावा गुलाबराव पाटील यांनी केला.