शिवसेनेच्या मंत्र्यांनी घेतली भाजप नेते विखे पाटलांची भेट, राजकीय चर्चेला उधाण

विखे पाटील यांच्या लोणी येथील निवासस्थानी अब्दुल सत्तार दाखल झाले.

विखे पाटील यांच्या लोणी येथील निवासस्थानी अब्दुल सत्तार दाखल झाले.

  • Share this:
अहमदनगर, 22 नोव्हेंबर : शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेतली आहे. विखे पाटील यांच्या लोणी येथील निवासस्थानी अब्दुल सत्तार दाखल झाले. त्यानंतर या दोन्ही नेत्यांमध्ये भेट झाली. तसंच सत्तार यांनी विखेंसोबत भोजनही केलं. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे. या भेटीनंतर एका लग्नाला दोन्ही नेत्यांनी हजेरी लावली. श्रीरामपूर येथे पंचायत समितीच्या नुतन इमारतीचे अब्दुल सत्तार यांच्या हस्ते भूमिपूजन झालं. राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सदाशिव लोखंडे हे दोघेही या कार्यक्रमाला उपस्थित होते. विखे आणि सत्तार...काय आहे राजकीय समीकरण? लोकसभा निवडणुकीपूर्वी राधाकृष्ण विखे पाटील आणि अब्दुल सत्तार हे दोन्ही नेते काँग्रेसमध्ये होते. मात्र अब्दुल सत्तार यांनी लोकसभेपूर्वी तर राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्षांतर केलं. काँग्रेसमध्ये असताना अब्दुल सत्तार हे विखे गटाचे म्हणून ओळखले जात. विखे यांच्याच सांगण्यावरून सत्तारांनी शिवसेनेत प्रवेश केल्याची चर्चा होती. विधानसभा निवडणुकीपर्यंत शिवसेना आणि भाजप हे एकत्र होते. मात्र निवडणुकीनंतर राज्यातील समीकरणे बदलली. शिवसेनेनं भाजपपासून फारकत घेत काँग्रेस-राष्ट्रवादीशी आघाडी केली. राज्यातील या बदललेल्या समीकरणांचा विखे-सत्तार यांच्या राजकीय नात्यावरही परिणाम झाला. राज्यात नवं सरकार आल्यापासून या दोन नेत्यांमध्ये प्रत्यक्ष भेट झाली नव्हती. मात्र आता ही भेट झाल्याने पुन्हा एकदा राजकीय चर्चेला उधाण आलं आहे.
Published by:Akshay Shitole
First published: