Home /News /maharashtra /

बंडखोर तानाजी सावंत शिवसेना आमदार कैलास पाटलांवर भडकले, पक्षप्रमुखांची दिशाभूल केल्याचा आरोप

बंडखोर तानाजी सावंत शिवसेना आमदार कैलास पाटलांवर भडकले, पक्षप्रमुखांची दिशाभूल केल्याचा आरोप

शिवसेना आमदार कैलास पाटील यांच्या दाव्यावर शिवसेनेचे बंडखोर आमदार तानाजी सावंत यांनी रोष व्यक्त केला आहे. कैलास पाटील खोटं बोलत असून त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची दिशाभूल केली. पक्षप्रमुखांनी त्यांच्यापासून सावध राहावं, असं तानाजी सावंत म्हणाले.

पुढे वाचा ...
    गुवाहाटी, 23 जून : उस्मानाबादचे शिवसेना आमदार कैलास पाटील यांनी मोठा दावा केला होता. कैलास पाटील यांना शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी फिरण्याच्या बहाण्याने सुरतच्या दिशेला नेले आणि आपल्याला जेव्हा खरं माहिती मिळाली तेव्हा आपण लघूशंकेच्या नावाने बंडखोरांच्या ताब्यातून निसटलो. त्यावेळी मध्यरात्री भर पावसात आपल्याला काही किलोमीटरपर्यंत पायी चालावं लागलं. त्यानंतर ट्रकने दहीसरला दाखल झालो, असा धक्कादायक दावा कैलास पाटील यांनी केला होता. त्यांच्या या दाव्यावरुन शिवसेनेचे बंडखोर आमदार तानाजी सावंत यांनी रोष व्यक्त केला आहे. कैलास पाटील खोटं बोलत असून त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची दिशाभूल केली. पक्षप्रमुखांनी त्यांच्यापासून सावध राहावं, असं तानाजी सावंत म्हणाले. तानाजी सावंत यांचा गौप्यस्फोट "आमदार कैलास पाटील यांनी महाराष्ट्राची दिशाभूल केली. कैलास पाटील यांची सुरतमधून मुंबईकडे परतीच्या प्रवासाची आम्ही व्यवस्था करून दिली. कैलास पाटील यांचा प्रचंड पाऊस पडत असताना 4 किलोमीटर चालत गेले असल्याचा दावा साफ खोटा आहे. आमदार कैलास पाटील खोटं आणि आभासी कथानक रचून मातोश्रीची सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत हे दुर्दैवी आहे. डबलढोलकी असणारे आमदार कैलास पाटील यांच्यापासून पक्ष प्रमुखांनी देखील सावध राहावं", असा इशारा तानाजी सावंत यांनी दिला. ('बंडखोर आमदारांना परिणाम भोगावे लागतील', शरद पवारांचा मोठा इशारा) तानाजी सावंत नेमकं काय म्हणाले? "विधान परिषदेच्या मतदानाच्या दिवशी दुपारी मतदान झालं आणि त्यावेळी कैलास पाटील माझ्याजवळ आले. तेव्हा त्यांनी सांगितलं, आपल्याला भाईंना भेटण्यासाठी नंदनवनला जायचं आहे. अन्यथा मला या काहीच गोष्टी माहिती नव्हत्या. मी मतदान करुन परत जाणार होतो. कारण माझी तब्येत ठिक नव्हती. चार दिवसांपूर्वीच माझा अपघात झालेला होता. म्हणून मी म्हटलं आपण जावू. आम्ही नंदनवनला गेलो. तिथे भाईंशी (एकनाथ शिंदे) पूर्णपणे चर्चा झाली. त्यानंतर आम्ही बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर ते म्हणाले की, माझ्याकडे गाडी नाही. आपण तुमच्याच गाडीने निघू. ज्या दिशेने चर्चा झाली त्या दिशेने आपल्याला जायचंय, असं सांगितलं. मी म्हटलं चल आपण निघू. पुढे जात असताना कैलास पाटील हे त्यांचा मोबाईल आणि इतर गोष्टींमध्ये मग्न होते. मी माझ्या आजारपणामुळे व्यस्त होतो. त्यामुळे मी कुणाशी बोलत नव्हतो. किंवा कुणाला फोन करत नव्हतो", असं तानाजी सावंत यांनी सांगितलं. "गुजरातच्या चेकपोस्टवर आल्यानंतर कैलास पाटील यांनी गाडी थांबायला लावली. लघुशंकेला जायचंय, असं सांगितलं. मला त्यानंतर खाली या जरा आपण चर्चा करु, असं सांगितलं. मला परत जायचं आहे. असं सांगितलं. मी म्हटलं आता परत कसं जाणार. मला भीती वाटतेय, असं ते म्हणाले. मी माझी गाडी घेऊन परत जा सांगितलं", असं तानाजी सावंत म्हणाले. "आता ते मीडियाची दिशाभूल करत आहेत. कैलास पाटील यांना कोणीही धरलेलं नाही. ते पक्षप्रमुखाची देखील दिशाभूल करत आहेत. अशाने स्वत:चं महत्त्व वाढत नसतं. कारण ते इतके दिवस सांगत होते की, सावंत साहेब मी तुमच्यामुळे निवडून आलेलो आहे. तुमचा आधार पाहिजे. त्यांनी पक्षप्रमुखाची, माझी दिशाभूल केली. कैलास पाटील यांनी केलेल्या दाव्यासारखं काहीही घडलेलं नाही. गुवाहाटीला आलेला प्रत्येक आमदार हा स्वखुशीने आलेला आहे. कुणालाही भाईने फोन केलेला नाही. कुणाला कुठलाही दबाव नाही", असं तानाजी सावंत यांनी स्पष्ट केलं.
    Published by:Chetan Patil
    First published:

    पुढील बातम्या