मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Dasara Melava : शिवतिर्थावर ठाकरेंच्या भाषणाआधी धडाडली सुषमा अंधारेंची तोफ, शिंदे-राणे-भाजपवर प्रहार!

Dasara Melava : शिवतिर्थावर ठाकरेंच्या भाषणाआधी धडाडली सुषमा अंधारेंची तोफ, शिंदे-राणे-भाजपवर प्रहार!

सुषमा अंधारे यांचा नारायण राणेंवर निशाणा

सुषमा अंधारे यांचा नारायण राणेंवर निशाणा

"तुम्ही हिंदुत्वाला कलंक लावला. कारण हिंदू व्यक्ती कुटुंब संकटात असताना पळून जात नाही. हिंदू एकमेकांना आधार देतात", असा घणाघात सुषमा अंधारे यांनी केला.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Chetan Patil

मुंबई, 5 ऑक्टोबर : मुंबईत शिवसेना आणि शिंदे गटाचा दोन वेगवेगळ्या मैदानावर दोन वेगवेगळी दसरा मेळावे आयोजित करण्यात आले होते. या मेळाव्यांमध्ये दोन्ही गटातील नेत्यांकडून एकमेकांवर कुरघोडी आणि टीका करण्यात आली. यापैकी काही नेत्यांची भाषणे चांगलीच गाजली. यामध्ये शिवसेनेच्या सुषणा अंधारे यांचादेखील समावेश आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भाषणाआधी सुषमा अंधारे यांनी भाषण केलं. यावेळी त्यांनी शिंदे गट, केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि भाजपवर सडकून टीका केली. "मिंदे गटातल्या तमाम लोकांनी आणि त्यांचा म्होरक्या, कळसूत्री बाहुल्यांचा सूत्रधार असणारे देवेंद्र फडणवीसांनी आपल्या अंतकरणावर हात ठेवावा, ज्या परमेश्वराला तुम्ही मानता, नसेल मानत तर तुमच्या जवळच्या व्यक्तीच्या डोक्यावर हात ठेवून सांगा की हिदू धर्मातला कोणतं वेद, पुराण किंवा ग्रंथ आहे ज्यामध्ये इतर धर्मांचा द्वेष केला पाहिजे असं म्हटलं आहे. तुम्ही हिंदुत्वाला कलंक लावला. कारण हिंदू व्यक्ती कुटुंब संकटात असताना पळून जात नाही. हिंदू एकमेकांना आधार देतात", असा घणाघात सुषमा अंधारे यांनी केला.

"माझ्या राजकीय कारकिर्दीतलं पहिलं भाषण मी आज इथे करत आहे. पण मी बोलण्याआधीच विरोधकांचे पोटशूळ उठले. हिंदुत्ववादी शिवसेनेत सुषणा अंधारे कशा म्हणे, कठीण आहे. एकीकडे तुम्ही म्हणता शिवसेनेने हिंदुत्व सोडलं, दुसरीकडे हिंदुत्ववादी शिवसेनेत सुषमा अंधारे कशा? काय खोटं आणि काय खरं? तुम्ही हिंदुत्व जपणारे? आमच्या मराठवाड्यात एक म्हण आहे निंनाद्याला बारा बुद्या असतात. तशी बारा कारणं या लोकांनी सांगितली. त्यातलं पहिलं कारण म्हणजे हिंदुत्व जपायचं. खरंच? तानाजी सावंत, भरत गोगावले, संजय शिरसाठ, अब्दुल सत्तार ही चिल्लर कंपनी त्यांच्या मतदारसंघात जावून संपेल त्यावर बोलायचंच नाही. पण किरण पावस्करने हिंदुत्वासाठी चाललो असं म्हणावं? किरण पावस्कर तुम्ही शिवसेनेत होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांनी तुम्हाला विधान परिषदेचं चॉकलेट दिल्यावर तुम्ही सहा वर्ष राष्ट्रवादीत गेलात मग मिंदे गटात आलात. सहा वर्ष पावसकर तुम्ही तुमचं हिंदुत्व कोणत्या खुंटीला टांगून ठेवलं होतं?", असा सवाल त्यांनी केला.

(दसरा मेळाव्याला मिलिंद नार्वेकर कुठे होते? सस्पेन्सवरचा पडदा अखेर उठला)

"नारायणराव, मला तुमच्या दोन वाह्यात बाजार बुनग्यांवर बोलायचंच नाहीय. पण नारायणराव तुम्ही शहाणेसुरते आहात. ते म्हणाले की, शिवाजी पार्कवर जाऊन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींचा विचार ऐकायचा आहे का? नारायणराव तुम्ही विसरलात का त्याच सोनियाजींच्या पायावर लोटांगण घालत गेली दहा वर्ष तुम्ही आमदारकी-खासदारकी आणि महसूलकी भोगली", असं सुषणा म्हणाल्या.

"गेल्या अडीच वर्षातील उद्धव ठाकरे यांचं संयमी नेतृत्त्व मी मान्य केलं आहे. मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, भटके विमुक्त, अठरा पगड जाती उद्धव ठाकरेंच्या पाठिशी येत आहेत. हे तुमची पोटदुखी आहे. शिवसेना वाचवायला मिंदे गट निघाला आहे तर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा शिवसेना संपवण्याची भाषा करत होते त्यावेळी तुमची दातखीळ का बसली होती? तुम्ही शिवसेना वाचवायला निघाला होता तर 2019 मध्ये 40 बंडखोर उभे करणं असेल, मुरजी पटेलला उमेदवार दिली आहे. तुम्ही शिवसेनेचे वारसदार असता तर शिवसैनिकांची काळजी घेतली असती. तुमच्या खांद्याला खांदा लावून लढणारे आमदार रमेश लटकेंचं निधन झालं. भाऊ गेला, भावाची विधवा पत्नी अंधेरी पूर्वमध्ये लढतेय. भावाच्या पत्नीविरोधात भाजपला जागा देऊन तुम्ही मोकळे झाला नसता", अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली.

First published:

Tags: Eknath Shinde, Shiv sena dasara melava, Shivsena