देवेंद्र फडणवीस यांना भेटणं अपराध आहे का? संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया

देवेंद्र फडणवीस यांना भेटणं अपराध आहे का? संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया

  • Share this:

मुंबई, 26 सप्टेंबर: शिवसेना खासदार संजय राऊत आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत बीकेसीमधील सॉफिटेल हॉटेलमध्ये गुप्त भेट झाली आहे. शनिवारी दुपारी दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास उभय नेत्यांमध्ये ही भेट झाली. मात्र, यावरून महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय भूकंपाची चर्चा सुरू आली आहे. यावर आता खुद्द संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा...बँक घोटाळा! पुण्यात भाजपशी घरोबा केलेल्या आमदाराच्या 3 आलिशान गाड्या जप्त

देवेंद्र फडणवीसांसोबत भेट गुप्त नव्हती. 'सामना'च्या मुलाखतीसंदर्भात फडणवीसांची भेट घेतल्याचं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. मी देवेंद्र फडणवीस यांना भेटणं काय अपराध आहे का? देवेंद्र फडणवीस माजी मुख्यमंत्री आहेत. भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. राज्यतील दोन वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांनी भेटणं म्हणजे अपराध नाही आहे. मुळात ती गुप्त भेट नव्हती, जाहीरपणे आम्ही भेटलो.  दोन वेगवेगळ्या पक्षाचे नेते भेटू शकतात. चर्चा करू शकतात. शरद पवार यांची मुलाखत घेतली होती, तेव्हाच आपण देवेंद्र फडणवीस, राहुल गांधी आणि अमित शाह यांचीही मुलाखत घेणार असल्याचं जाहीर केलं होतं, असंही संजय राऊत यांना सांगितलं. देवेंद्र फडणवीस यांना भेटणं अपराध आहे का? असा सवाल देखील संजय राऊत यांनी केला आहे.

महाराष्ट्रात राजकीय भूकंपाची चर्चा

संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईत आज दुपारी दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास ही भेट झाली. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये बऱ्याच वेळ चर्चा झाली असून राज्याच्या राजकारणाबद्दल खलबतं झाल्याचं बोललं जात आहे.

संजय राऊत हे वारंवार देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात टीका करत असतानाच ही भेट झाल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारविरोधात टीका होत आहे. तसंच बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणानंतरही ठाकरे सरकारची कोंडी करण्यात आली. या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा नव्याने काही राजकीय समीकरणे तयार केली जात आहेत का, अशी चर्चा रंगू लागली आहे.

संजय राऊत यांची भेट का आहे महत्त्वाची?

विधानसभा निवडणुकीनंतर भाजपपासून दूर होत शिवसेना सत्तास्थापनेसाठी हालचाली करत असताना संजय राऊत यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. महाविकास आघाडीची स्थापना करताना संजय राऊत हे सातत्याने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या संपर्कात होते, तर दुसरीकडे भाजपवर हल्लाबोल करत नव्या आघाडीसाठी वातावरणनिर्मिती करण्यातही राऊत हेच आघाडीवर होते. संजय राऊत यांनी या सर्व काळात शिवसेनेची भूमिका ठामपणे मांडली आणि मुख्यमंत्रिपदी उद्धव ठाकरे विराजमान झाले.

हेही वाचा...फडणवीस-राऊत भेटीमागील नेमकं कारण काय? प्रवीण दरेकरांनी केला महत्त्वाचा खुलासा

सत्ता स्थापनेनंतरही संजय राऊत हेच शिवसेनेची भूमिका प्रामुख्याने मांडत आहेत. त्यामुळे आज त्यांनी घेतलेली देवेंद्र फडणवीस यांची भेट ही पक्षाच्याच अजेंड्याचा भाग असू शकते. त्यामुळे फडणवीस-राऊत भेटीला महत्व प्राप्त झालं आहे.

Published by: Sandip Parolekar
First published: September 26, 2020, 8:54 PM IST

ताज्या बातम्या