मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

शिवसेनेच्या नेत्यानेच अनिल परबांची माहिती सोमय्यांना दिली, मनसेच्या वैभव खेडेकरांच्या विधानाने खळबळ

शिवसेनेच्या नेत्यानेच अनिल परबांची माहिती सोमय्यांना दिली, मनसेच्या वैभव खेडेकरांच्या विधानाने खळबळ

शिवसेनेचे नेते अनिल परब यांच्या बाबत भाजपच्या किरीट सोमय्यांना शिवसेनेच्याच नेत्याने माहिती दिली असं विधान मनसेकडून आलं आहे.

खेड, 18 सप्टेंबर : भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) हे गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत. तसेच्या त्या संदर्भात त्यांनी ईडीकडे कागदपत्रेही सोपवली आहेत. राज्याचे परिवहवन मंत्री आणि शिवसेनेचे नेते अनिल परब (Anil Parab) यांच्या संदर्भातही किरीट सोमय्या यांनी आरोप केले आहेत. आता या प्रकरणात मनसेने उडी घेत एक मोठा दावा केला आहे.

शिवसेना नेते आणि राज्याचे माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी महाविकास आघाडीचे सरकार अस्थिर करण्याचे काम केले आहे. इतकेच नाही तर परिवहन मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब यांच्याबाबतची माहिती रामदास कदम यांनी प्रसाद कर्वे नामक व्यक्तीच्या माध्यमातून माहितीच्या अधिकाराखाली मिळवली. मग ही माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांना दिली असा खळबळ जनक दावा मनसेचे राज्य सरचिटणीस आणि खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

वैभव खेडेकर यांच्या विधानाने कोकणातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. रामदास कदम हे शिवसेनेचे नेते असताना महाविकास आघाडीचे सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केल्याचे देखील खेडेकर म्हणाले. रामदास कदम यांचे मित्र किरीट सोमय्या यांनी रामदास कदम यांच्या देखील बेनामी संपत्तीचे माहिती जगासमोर आणावी असे आवाहन देखील वैभव खेडेकर यांनी केले आहे.

अनिल परबांचं रिसॉर्ट वादाच्या भोवऱ्यात

त्नागिरी जिल्ह्यातील दापोली मुरुड समुद्र किनाऱ्यावर बांधण्यात आलेलं साई रिसॉर्ट (Anil Parab Sai Resort) वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री तथा परिवहन मंत्री अनिल परब यांनी हे रिसॉर्ट आहे. अनिल परब यांनी हे रिसॉर्ट बेकायदेशीरपणे बांधले असल्याची तक्रार भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केली होती. त्यानंतर जून महिन्यात या रिसॉर्टची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक महाराष्ट्रात आले आणि त्यांनी रिसॉर्टची पाहणी केली.

अनिल परब यांना ईडीची नोटीस

शिवसेनेचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना गेल्या महिन्यात ईडीने नोटीस बजावली होती. तसेच चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. या नोटीसवर त्यावेळी अनिल परब यांनी प्रतिक्रिया देत म्हटलं होतं की, रविवारी संध्याकाळी ईडीकडून नोटीस मिळाली आहे. पण ही नोटीस नेमकी कशासाठी हे वकील तज्ञ समिती समवेत चर्चा करून उत्तर देईल. पण हे सूडबुद्धीने केले का यावर मला आता बोलायचे नाही, मला नोटीस आली त्याला उत्तर देईल. नोटीस बघून त्याला कायदेशीर उत्तर देण्यात येईल, असं सांगत परब यांनी कायदेशीर लढा देणार असल्याचं स्पष्ट केलं.

किरीट सोमय्यांचा बजरंग खरमाटेंवर गंभीर आरोप

राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांचे निकटवर्तीय मानले जाणारे बजरंग खरमाटे यांना काही दिवसांपूर्वी ईडीनं नोटीस बजावली आहे. अंमलबजावणी संचालनालयानं मनी लाँड्रिंग प्रकरणी ही नोटीस बजावली आहे. यावरुन भाजप नेते किरीट सोमय्या यांनी गंभीर आरोप केलेत. बजरंग खरमाटे यांच्या डोक्यावरील बेनामी संपत्ती ही अनिल परब यांचीच असल्याचा गंभीर आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. तसंच आरटीओ अधिकारी असलेले बजरंग खरमाटे यांची एकूण संपत्ती 650 कोटींची असल्याची माहिती किरीट सोमय्या यांच्याकडून देण्यात आली आहे.

First published:

Tags: Anil parab, BJP, Ramdas kadam, Shiv sena