चंद्रकांत खैरेंचे एका दगडात दोन पक्षी, सासऱ्यांसह जावयावर केली घणाघाती टीका

चंद्रकांत खैरेंचे एका दगडात दोन पक्षी, सासऱ्यांसह जावयावर केली घणाघाती टीका

हर्षवर्धन जाधव यांच्यावर बोलावं अशी त्यांची पात्रता नाही. कुठून कुठे व कितीवेळा जातात ते समजत नाही. ह्यूमजिकल चाळे करणारा तो माणूस आहे

  • Share this:

मुंबई,23 जानेवारी:शिवसेनेचे माजी खासदार आणि गटनेते चंद्रकांत खैरे यांनी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंचे जावई आणि मनसेचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यावर अत्यंत खालच्या भाषेत टीका केली आहे. हर्षवर्धन जाधव यांच्यावर बोलावं अशी त्यांची पात्रता नाही. कुठून कुठे व कितीवेळा जातात ते समजत नाही. ह्यूमजिकल चाळे करणारा तो माणूस आहे, अशा शब्दांत चंद्रकांत खैरे यांनी टीका केली आहे. हिंदुत्त्व हे फक्त शिवसेनेचे आहे, ते कुणी हिरावून घेवू शकत नाही, आतापर्यंत 40 सेना पण त्या टिकू शकल्या नाहीत, असे सांगत चंद्रकांत खैरे यांनी रावसाहेब दानवे यांनाही टोला लगावला आहे. चंद्रकांत खैरे यांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन दर्शन घेतले. यावेळी खैरे यांनी हर्षवर्धन जाधव यांच्यावर टीका केली.

हर्षवर्धन जाधव आणि प्रकाश महाजन राज ठाकरेंच्या भेटीला

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी हर्षवर्धन जाधव ‘कृष्णकुंज’वर गेले होते. त्यापाठोपाठ भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांचे बंधू प्रकाश महाजनही ‘कृष्णकुंज’वर दाखल झाले होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी दोन्ही नेते पोहचले असून हर्षवर्धन जाधव आणि प्रकाश महाजन कोणती नवी राजकीय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.

हर्षवर्धन जाधव हे याआधी मनसेच्या तिकीटावर आमदारपदी निवडून आले होते. पुढील आठवड्यात होणाऱ्या मनसेच्या महाअधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्त्व प्राप्त झालं आहे. हर्षवर्धन पाटील मनसेमध्ये पुनरागमन करणार का, असा प्रश्न विचारला जात आहे.

हर्षवर्धन जाधव हे औरंगाबाद जिल्ह्याच्या राजकारणातील सतत वादग्रस्त ठरलेलं व्यक्तिमत्त्व आहे. शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, मनसे अध्यक्ष राज ठाकरे असो किंवा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, हर्षवर्धन जाधव यांनी कुणालाच सोडलं नाही. त्यांनी बेफामपणे अनेक नेत्यांवर आरोपांच्या फैरी झाडल्या. नुकतंच त्यांनी सासरे आणि भाजपचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यावरही घर फोडल्याचा आरोप केला होता. त्यानंतर शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनीही जाधव यांच्यावर पैशांसाठी पत्नीला मारहाण करत माहेरी पाठवल्याचा गंभीर आरोप केला होता.

हर्षवर्धन जाधव यांचा राजकीय आलेख उतरत्या दिशेने असून त्यांना लोकसभेनंतर विधानसभेतही पराभवाचा सामना करावा लागला. त्यांच्या राजकीय जीवनासोबतच व्यक्तिगत जीवनही नेहमीच वादळी ठरलं आहे. अपक्ष, मनसे, शिवसेना, पुन्हा अपक्ष असा प्रचंड विस्कळीत राजकीय प्रवास करणाऱ्या हर्षवर्धन जाधव यांनी आजपर्यंत अनेकांवर गंभीर आरोप केले.

चंद्रकांत पाटील यांनी आपल्याला 5 कोटींची ऑफर दिली, राज ठाकरे हे आपल्याला न्याय देऊ शकत नाही, उद्धव ठाकरे निष्क्रिय आहेत असे अनेक आरोप हर्षवर्धन जाधव यांनी केले आहेत. आता तर हर्षवर्धन जाधव यांनी स्वतःचे सासरे रावसाहेब दानवेंवरच गंभीर आरोप केले. माझ्या बायकोला हाताशी धरुन रावसाहेब दानवे माझं राजकीय आयुष्य संपवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप हर्षवर्धन जाधव यांनी केला.

First published: January 23, 2020, 3:27 PM IST

ताज्या बातम्या