रत्नागिरी, 30 नोव्हेंबर : महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी तीन पक्षांनी एकत्रितपणे सत्ता स्थापन केली असली तरी तिन्ही पक्षांतील नेत्यांत कुरबुरीच्या अनेक घटना समोर येताना दिसतात. आता कोकणात पुन्हा एकदा शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये जुंपल्याचं पहायला मिळत आहेत. शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव (Shiv Sena Bhaskar Jadhav) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. (Shiv Sena vs NCP in Konkan Maharashtra)
नेमकं काय म्हणाले भास्कर जाधव?
आपल्या घराण्यासाठी म्हणजेच केवळ नाव राष्ट्रवादी आणि काम मात्र आयुष्यभर कुटुंबवादी... हा शिक्का पुसावा म्हणून मी त्यांना सल्ला दिला होता की, कुणबी समाजाला ही जागा सोडावी. कुणबी समाजाला जागा मिळावली म्हणजे त्यांचा अपमान होईल असं त्यांना का वाटत? विधानपरिषदेच्या आमदारकीची योग्यता केवळ आमच्याच घराण्यात आहे आणि कुणबी समाजात ती योग्यता नाही असं बोलून त्यांनी कुणबी समाजाचा अपमान केला की सन्मान केला?
राष्ट्रवादी काँग्रेसमधून पुन्हा शिवसेनेत गेलेल्या भास्करराव जाधवांचं आम्ही वेळोवेळी मार्गदर्शन घेऊ असं म्हणत त्यांनी माझ्यावर खोचक आणि उपरोधिक भाष्य केलं. मला त्यांना सांगितलं पाहिजे की, मार्गदर्शन करण्यासाठी ज्याचे आचार, विचार चांगले असतात, वर्तन स्वच्छ असते, राजकीय कारकिर्द स्वच्छ असते त्याला मार्गदर्शन करणं योग्य आहे. तुम्ही खोट्या कंपन्या स्थापन करुन गोरगरिबांच्या हजारो एकरच्या जमीन घेतल्याचा आरोप तुमच्यावर होत आहे. अशा तुमच्यासारख्या महान माणसाला मार्गदर्शन करणं माझ्या अखत्यारितील गोष्ट नाही असंही भास्कर जाधव म्हणाले.
सुनील तटकरे यांना फक्त घ्यायचं माहिती आहे, द्यायचं माहीत नाही. सुनील तटकरे यांना खासदार करण्यात माझं योगदान आहे. तटकरेंना मदत करणाऱ्यांचं त्यांनी कायमच वाटोळं केलं आहे असंही भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे.
वाचा : लोकसभेत हिरवा तर राज्यसभेत लाल रंग हा योगायोग नाही, यामागे आहे विशेष कारण
यापूर्वी अनंत गितेंनी केली होती राष्ट्रवादीवर टीका
सप्टेंबर महिन्यात शिवसेनेचे नेते अनंत गिते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टीका केली होती. एका कार्यक्रमात भाषण करताना अनंत गिते यांनी थेट राष्ट्रवादी आणि शरद पवारांवर हल्लाबोल केला होता. अनंत गिते यांनी म्हटलं होतं, मला जाणीव आहे की शिवसेनेचा नेता या व्यासपीठावरुन बोलतोय. मी आज कोणतंही राजकीय भाष्य करणार नाहीये. शिवसेना काय आहे आणि शिवसैनिकांची जबाबदारी काय हे सांगत आहे. राज्यात आपलं सरकार आहे. आपलं कशासाठी म्हणायचं तर मुख्यमंत्री आपले आहेत. पण बाकी काँग्रेस, राष्ट्रवादी आपले नाहीत. आघाडीचं सरकार आहे. सत्ता आघाडीचे नेते सांभाळतील, तुमची आमची जबाबदारी काय आहे तर गाव सांभाळायचं आहे. आपलं गाव सांभाळायच असताना आम्हाला आघाडीचा विचार करायचा नाहीये... आघाडी आघाडीचं पाहून घेईल.
वाचा : 'त्या' वक्तव्यामुळे दिवसभर चर्चेत असलेले Anant Geete पडले एकटे, पक्षाने हात झटकत म्हटले....
शिवसेना ही काँग्रेसच्या विचाराची कदापी होऊ शकणार नाही
या आघाडीत तीन घटक आहेत. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस. काँग्रेस सुद्धा काँग्रेस आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा काँग्रेसच आहे. हे एकमेकांचे तोंज पाहत होते का, यांचं एकमेकांचं जमतय का, यांचा विचार एक आहे का? दोन काँग्रेस एक विचाराची होऊ शकत नाही तर शिवसेना ही काँग्रेसच्या विचाराची कदापी होऊ शकणार नाही असंही अनंत गिते म्हणाले होते.
राष्ट्रवादीचा जन्मच काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून
अनंत गिते पुढे म्हणाले होते, मुळात राष्ट्रवादीचा जन्मच काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झालेला आहे. मग त्या दोन काँग्रेस जर एक होऊ शकत नाही तर आम्ही त्यांच्या विचाराचे होणं कदापी शक्य नाही. जरी राज्यात आघाडी सरकार असलं तरी आम्ही आघाडी सैनिक नाही आम्ही शिवसैनिक आहोत आणि शिवसैनिकच राहणार.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bhaskar jadhav, NCP, Ratnagiri, Shiv sena, Sunil tatkare