चिपळूण, 26 जुलै: भाजपमधील मंडळींच्या वक्तव्यात कपटकारस्थान आणि राजकीय स्वार्थ दडलेला असतो. कोकणातील बेकारीबद्दल आणि तरुणांबद्दल जे काही प्रेम दाखवताय ते खऱ्या अर्थाने प्रेम दाखवताय की तुमचं कपटी राजकारण हे जनता ओळखून आहे, अशा शब्दात शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
प्रकल्पाबाबत एवढंच प्रेम आलं होतं, तर मागच्याच सरकारमध्ये तुमच्याच पक्षाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. त्यांनीच नाणार प्रकल्प रद्द का केला आहे, असा सवाव देखील भास्कर जाधव यांनी यावेळी केला आहे.
हेही वाचा...अंधश्रद्धेतून मायलेकाचा बळी, कल्याणमधील धक्कादायक प्रकाराने सर्वत्र खळबळ
दरम्यान, नाणार रिफायनरीच्या मुद्द्यावरून आता पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापू लागलं आहे. याच मुद्द्यावरून शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी भाजपला लक्ष केलं आहे.
भाजपचे राज्य महासचिव प्रमोद जठार यांनी हे नुकतेच रत्नागिरी दौऱ्यावर आले असता रिफायनरी प्रकल्प उभारणीबाबत केंद्र शासनाने राज्य शासनाला दोन महिन्यांचा अल्टिमेट दिला असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली होती. हाच मुद्दा पकडत आमदार भास्कर जाधव यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.
भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे की, 'भाजपची नेते मंडळी सध्या या रिफायनरीवरून शिवसेनेला दोष देत आहेत. हा प्रकल्प आल्यानंतर कोकणातील बेकारी दूर होईल, अशी वक्तव्ये सातत्याने करत आहेत. पण भाजपच्या लोकांची आपण कायमची जर पद्धत बघितली, तर त्यांच्या प्रत्येक वक्तव्यात कुठेना कुठेतरी कपटकारस्थान असतं. राजकीय स्वार्थ दडलेला असतो. दुसऱ्याला पुढे करून आपला हेतू साध्य करणे ही त्यांची प्रवृत्ती आहे.
नाणार प्रकल्पाबाबत तुम्हाला जर एवढंच प्रेम आलं होतं, तर मागच्याच सरकारमध्ये तुमच्याच पक्षाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते, त्यांनीच नाणार प्रकल्प रद्द केला आहे, त्यावेळी केंद्रातही सरकार तुमचंच होतं आणि राज्यातही मुख्यमंत्री तुमचेच होते. आज तुम्ही कोकणातील बेकारीबद्दल आणि तरुणांबद्दल जे काही शब्दातून प्रेम दाखवताय ते खऱ्या अर्थाने प्रेम दाखवताय की तुमचं कपटी राजकारण आहे हे कोकणी जनता पूर्णपणे ओळखून आहे. आणि कोकणी जनतेला पूर्णपणे भाजपच्या मंडळींचं प्रत्येक गोष्टींमध्ये कसं कपटी राजकारण दडलेलं आहे, हे माहिती असल्याने भाजपच्या वक्तव्याना कोकणातील मंडळी फार काही दाद किंवा महत्व देणार नाहीत, अशी टीका आमदार जाधव यांनी केली आहे.
हेही वाचा...मुंबई लोकल कधी होणार सुरू? धारावी कोरोनामुक्त करणारे आयुक्त म्हणाले...
दरम्यान या प्रकल्पाबाबत शिवसेनेने आपली भूमिका यापूर्वीच जाहीर केली आहे आणि ती आजही कायम आहे. पण भाजपची भूमिका सातत्याने बदलतेय, त्यामुळे नक्की भूमिका काय हे एकदा भाजपला लोकांसमोर जाहिर करावं लागेल, असं आमदार भास्कर जाधव यावेळी म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bhaskar jadhav, Shiv sena