कल्याण, 8 नोव्हेंबर : राज्यपाल नियुक्त आमदारांवरून पुन्हा एकदा राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार असा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण या आमदारांच्या नावाची शिफारस करणारी यादी राज्यपालांना सादर करण्यात आल्यानंतरही अद्याप त्याच्यावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून शिक्कामोर्तब करण्यात आलेलं नाही. याबाबत आता शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
'महाविकास आघाडीच्या नेत्यांनी 6 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांच्या नावाची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सादर केली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब केल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ही यादी राज्यपालांकडे सुपूर्द केली. त्यानंतर दोन दिवस उलटून गेले तरीही राज्यपालांनी अद्याप नावे जाहीर केलेली नाहीत. त्यामुळे राज्यपालांनी ही यादी जाहीर करावी,' अशी विनंती शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.
एकनाथ शिंदे यांनी कल्याणमध्ये बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या भेटीवरही प्रतिक्रिया दिली. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शुक्रवारी संध्याकाळी राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी राज्यपालांकडे सादर केल्यानंतर दुसऱ्या दिवशी चंद्रकांत पाटील यांनी राज्यपालांची भेट घेतली. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. याबाबत एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारला असता “राज्यपालांची भेट कुणीही घेऊ शकतो”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
'मेट्रो कारशेडची जागा सरकारचीच'
“मेट्रो कारशेडचा फायदा ठाणे, कासारवडवली, मीरा-भाईंदर, गायमुख, कल्याण, भिवंडी शहरांना होणार आहे. कांजूरमार्ग मेट्रो कारशेडची जागा राज्य सरकारची आहे. त्यावर तशा नोंदीही आहेत. या जागेसंदर्भात तत्कालीन महसूल मंत्र्यांकडे जे अपील केले होते. ते फेटाळण्यात आले आहे. राज्य सरकारने त्याठिकाणी मेट्रो कारशेडचे काम सुरु केले आहे”, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Shivsena