Home /News /maharashtra /

मोठी बातमी! एकनाथ शिंदे गटाची थेट सुप्रीम कोर्टात धाव, ठाकरे सरकारचा उद्या फैसला होणार?

मोठी बातमी! एकनाथ शिंदे गटाची थेट सुप्रीम कोर्टात धाव, ठाकरे सरकारचा उद्या फैसला होणार?

महाराष्ट्राच्या राजकारणातील एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांच्या बंडखोर गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.

    नवी दिल्ली, 26 जून : महाराष्ट्राच्या राजकारणातील (Maharashtra Politics) एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शिवसेनेचे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडखोर गटाने सुप्रीम कोर्टात (Supreme Court) धाव घेतली आहे. महाविकास आघाडी सरकारकडून (Maha Vikas Aghadi Government) बंडखोर आमदारांकडून करण्यात आलेल्या कारवाईविरोधात त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ (Narhari Zirwal) यांनी महाधिवक्तांशी चर्चा करुन शिवसेनेच्या 16 बंडखोर आमदारांवर (Shiv Sena Rebel MLAs) अपात्रतेची कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबत त्यांना दोन दिवसात म्हणणं मांडण्यासाठी नोटीसही बजावण्यात आली आहे. या नोटीशीनुसार शिंदे गटाच्या आमदारांना उद्या चार वाजेपर्यंत विधान भवनात दाखल होणं अपेक्षित आहे. अन्यथा त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई होण्याची दाट शक्यता आहे. पण शिंदे गटाने ही कारवाई थांबवण्यासाठी नामी शक्कल लढवली आहे. शिंदे गटाने या कारवाई विरोधात थेट सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. विशेष म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख यांच्या सूचनेनुसार शिवसेनेचा गटनेता बदलण्यात आला आहे. त्याला नरहरी झिरवळ यांनी मान्यता दिली आहे. त्यामुळे अजय चौधरी (Ajay Chaudhari) हे शिवसेनेचे नवे गटनेता आहेत. या निर्णयाविरोधातही बंडखोरांनी कोर्टात याचिका दाखल केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. बंडखोर आमदारांची याचिकेत नेमकी काय मागणी? एकनाथ शिंदे गटाने सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेत तीन प्रमुख मागण्या ठेवल्या आहेत. त्या पुढीप्रमाणे : 1) शिंदे गटाने नरहरी झिरवळ यांच्या अपात्रतेच्या कारवाईला सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं आहे. तसेच शिवसेना विधीमंडळ पक्षनेतेपदी अजय चौधरी यांच्या नियुक्तीविरोधात आक्षेप घेत याचिका दाखल केली आहे. 2) विधानसभेच्या उपाध्यक्षांच्या अविश्वासाच्या ठरावावर कोणताही निर्णय होत नाही तोपर्यंत त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्यात येऊ नये, असे निर्देश उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना देण्यात यावेत, अशी मागणी शिंदे गटाने सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेत केली आहे. ('आमचा संयम तुटायची वाट बघू नका', दीपक केसरकरांचं राऊतांना सडेतोड प्रत्युत्तर) 3) शिंदे गटाने त्यांच्या कुटुंबाला महाराष्ट्र सरकारकडून सुरक्षा देण्यात यावी, अशी मागणी केली आहे. शिंदे गटाने आपल्या याचिकेची प्रत राज्य सरकारला पाठवली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. या याचिकेवर सुप्रीम कोर्टात उद्या सुनावणी होणार आहे. तसेच सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्येष्ठ वकील हरीश साळवे हे शिंदे गटाची सुप्रीम कोर्टात बाजू मांडणार आहेत. याचिकेत आणखी काय म्हटलं आहे? शिवसेनेच्या दोन तृतीयांश पेक्षा जास्त आमदारांचा याचिकेला पाठिंबा आहे. विधानसभेच्या उपाध्यक्षांनी बजावलेली नोटीस ही पूर्णपणे बेकायदेशीर आणि त्यांची मनमानी आहे, अशी भूमिका शिंदे गटाने मांडली आहे. मला आणि माझ्या गटातील सहकाऱ्यांना रोज जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत, असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे. विशेष म्हणजे आम्ही संबंधित पाऊल उचलल्यानंतर सरकारने केवळ आमच्या कुटुंबाची सुरक्षा काढून घेतली नाही तर आमच्याविरोधात कार्यकर्त्यांना प्रचंड भडकावलं जात आहे, असं शिंदे गटाकडून याचिकेत म्हटलं गेलं आहे. याशिवाय या सर्व प्रकरणामुळे आमच्या काही सहकाऱ्यांचं मालमत्तेचं नुकसान झालं आहे. तसेच त्यांच्या जीवीतास देखील धोका आहे, असं याचिकेत म्हटलं आहे. शरद पवारांचं सूचक विधान दरम्यान, एकनाथ शिंदे गटाकडून विधानसभा उपाध्यक्षांविरोधात अविश्वासाचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. पण तो प्रस्ताव फेटाळण्यात आला आहे. याउलट त्यांच्याविरोधातच आज-उद्या कारवाई होईल, असं सूचक विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी केलं. "शिंदे गटावर आज किंवा उद्या काही कारवाई होण्याची शक्यता आहे. 16 किंवा 14 आमदारांवर कारवाई होण्याची शक्यता आहे", अशी माहिती शरद पवार यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
    Published by:Chetan Patil
    First published:

    Tags: Eknath Shinde, Maharashtra News, Maharashtra politics, Shiv sena

    पुढील बातम्या