शिवसेना महाराष्ट्रात घडवणार राजकीय भूकंप, भाजपची धडधड वाढणार?

शिवसेना महाराष्ट्रात घडवणार राजकीय भूकंप, भाजपची धडधड वाढणार?

पुन्हा युती करण्यासाठी भाजपने शिवसेनेकडे अनेकदा टाळीसाठी हात पुढे केला मात्र शिवसेनेकडून प्रतिसाद अजुनही मिळालेला नाही.

  • Share this:

उदय जाधव, 4 जानेवारी : सत्तेचा 'नगर पॅटर्न'नंतर शिवसेनेतल्या हालचाली वाढल्या आहेत. आणि आता शिवसेनेनं राम मंदिराच्या मुद्यावर पुन्हा एकदा रणशिंग फुकण्याचं ठरवलंय. त्याचाच एक भाग म्हणून शिवसेनेनं आता राम मंदिराच्या मुद्यावर आधी गोदावरी मग वाराणसी हा प्लॅन तयार केला आहे. थेट मोदींना आव्हान देण्याच्या तयारीत उद्धव ठाकरे असून त्यामुळं युतीचं भवितव्य अंधारात असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

पुन्हा युती करण्यासाठी भाजपने शिवसेनेकडे अनेकदा टाळीसाठी हात पुढे केला मात्र शिवसेनेकडून प्रतिसाद अजुनही मिळालेला नाही त्यामुळं भाजपची धडधड वाढली आहे. तर तडजोडीचं सोडाच उलट नरेंद्र मोदींना थेट अंगावर घेण्याची रणणीती शिवसेनेने आखली आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या महिन्याच्या शेवटी नाशिकच्या गोदावरीची महाआरती करणार आहेत. आणि त्यानंतर शिवसेनेची पुढची धडक असणार हे ती थेट पंतप्रधान मोदींच्या मतदारसंघात म्हणजेच वारावणसीत.

या मेगा प्लॅनिगची तयारी शिवसेनेत जोरदार सुरू आहे कारण या खेळी मागेच दडलाय युतीच्या भविष्याचा खेळ. भाजपला जेरीस आणून त्यांची जागा दाखवून द्यायची, योग्य जागा दिल्या तरच युती करायची अन्यथा स्वबळावर लढायचं अशी सध्या शिवसेनेची मानसिकता आहे.

पंढरपूरच्या सभेतील उद्धव ठाकरेंचा आक्रमक पवित्राच युतीच्या भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करणारा होता. त्यातच नगर पॅटर्नमध्ये भाजपने राष्ट्रवादीला सोबत घेऊन शिवसेनेला पुन्हा एकदा कात्रजचा घाट दाखवल्याने सेना नेते पुन्हा आक्रमक झाले आहेत. भाजप आणि राष्ट्रवादीची छुपी युती असल्याचं आता सेना नेते उघडपणे बोलू लागले आहेत.

त्यामुळे नाशिकमध्ये गोदावरीच्या महाआरतीवेळी उद्धव ठाकरे काय भूमिका घेणार. सूत्रांच्या माहितीनुसार शिवसेनेची नाशिकची ही गोदावरी यात्रा प्रचंड वादळी ठरणार आहे. या नाशिकच्या गोदातिरावरच उद्धव ठाकरे 'त्या' राजकीय भूकंपाची घोषणा करण्याची शक्यता आहे.

राम मंदिरावर एवढा आक्रमकपणा दाखवून शिवसेनेनं भाजपपेक्षाही आपण कट्टर हिंदुत्ववादी आहोत. हे दाखवण्याचा पूर्णपणे प्रयत्न सुरू केलाय. शिवसेना नेतृत्वाला याची पूर्ण जाण आहे की 2019मध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये राम मंदिराचा मुद्दा केंद्रस्थानी राहणार आहे आणि या मुद्यावर आक्रमक होऊन शिवसेना भाजपला कोंडीत पकडण्याचा पुरेपूर प्रयत्न करतेय.

त्यामुळे आता राम मंदिराच्या मुद्यावर अगोदर गोदावरी आणि नंतर वाराणसी असं शिवसेनेचं मेगा प्लॅनिग आहे. पंतप्रधान मोदींनी नव वर्षाच्या महामुलाखतीतच हा राम मंदिराचा अध्यादेश न्यायालयीन प्रक्रियेपूर्वी आणणार नसल्याचं स्पष्ट केलंय.

त्यावर शिवसेनेने टीकाही केली होती. राम मंदिराच्या मुद्द्यावर आपण यापुढेही आक्रमकच राहणार असल्याचेच शिवसेनेनं या मेगा प्लॅनमधून दाखवून दिलंय.

पंढरपूरप्रमाणेच नाशिकच्या गोदाघाटावर महाआरतीचा मोठा इव्हेंट करण्याचा शिवसेनेचा मोठा प्लॅन आहे. त्यासाठी कदाचित नाशिक, त्र्यंबकेश्वर  आणि पंचवटीतल्या साधू महंतांनाही रितसर निमंत्रण दिलं जाऊ शकतं. शिवसेनेचे हे इरादेच राजकीय भूकंपाची नांदी ठरणार नाहीत ना, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

राफेलवरून नरेंद्र मोदींवर पुन्हा बरसले राहुल गांधी, पाहा लोकसभेतील UNCUT भाषण

First published: January 4, 2019, 6:27 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading