पुणे, 14 मार्च : मुंबईत शिवसेना – भाजप आमदारांच्या मनोमिलनासाठी डिनर डिप्लोमसीचं आयोजन केल्यानंतर आता दोन्ही पक्षांनी पुण्यात लक्ष केंद्रीत केलं आहे. परस्परांवर चौफेर टिका केल्यानंतर देखील दोन्ही पक्षांनी परिस्थितीचा अंदाज घेत अखेर हातमिळवणी केली. पण, कार्यकर्त्यांमध्ये अद्याप तरी कटुता कायम दिसून येत आहे. त्याच पार्श्वभूमिवर आता दोन्ही पक्षांनी खबरदारीची पावलं उचलायला सुरूवात केली आहे. कार्यकर्त्यांच्या दिलजमाईसाठी आता पुण्यात मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं असून शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
यापूर्वी देखील डिनर डिप्लोमसीच्या माध्यमातून दोन्ही नेत्यांनी आमदारांना मार्गदर्शन करत सत्ता आपलीच येणार असा विश्वास दिला होता. लोकसभेसाठी भाजप 25 तर शिवसेना 23 जागा लढणार आहे. तर, विधानसभेसाठी दोन्ही पक्षांनी 50 – 50चा फॉर्म्युला निश्चित केला आहे.
नाराज राजू शेट्टींची आघाडी सोबत हातमिळवणी; दोन जागा मिळण्याची शक्यता
विदर्भात देखील मेळावे
24 मार्च रोजी देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे कोल्हापुरातून प्रचाराचा नारळ फोडणार आहेत. त्यापूर्वी दोन्ही पक्षांनी नेत्यांची, कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्यावर भर दिला आहे. त्यामुळे आता भाजप शिवसेनेची युती झाल्यानंतर पहिल्यांदा विदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नागपूर आणि अमरावती येथे शुक्रवारी संयुक्त मेळावे घेणार आहेत. विदर्भातील अकरा जिल्ह्यातील दहा लोकसभा मतदार संघासाठी हे मेळावे आहेत. शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधी या मेळाव्याला एकत्र येणार आहेत.
कोण कुठून लढणार? आतापर्यंत काँग्रेसकडून 36 उमेदवार जाहीर!
मुंबई, कोकणात देखील नाराजी
मुंबईतील काही मतदारसंघामध्ये आणि कोकणात देखील दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असून त्यांनी परस्परांचा प्रचार करणार नाही असा पवित्रा घेतला आहे. त्यामुळे युती तर झाली पण, कार्यकर्त्यांची, नेत्यांची नाराजी दूर करण्यावर आता दोन्ही पक्षांनी भर दिला आहे. शिवाय, हे आव्हान देखील दोन्ही पक्षांना पेलावं लागणार आहे.
SPECIAL REPORT: पुण्यात लोकसभेचं तिकीट कुणाला? उमेदवारीचा सस्पेन्स कायम