मुंबई, 21 मे: राज्यातल्या गरीब आणि गरजू लोकांना 14 जूनपर्यंत शिवभोजन थाळी मोफत देण्याचा निर्णय ठाकरे सरकारनं घेतला आहे. सध्या राज्यात सुरु असलेल्या ब्रेक द चेन या अभियानांतर्गत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून राज्यातल्या विविध समाजघटकांसाठी मदतीचे पॅकेज घोषित केले होते. या पॅकेजमध्ये राज्यातल्या गरीब आणि गरजू लोकांना 15 एप्रिलपासून पुढे एक महिन्यासाठी शिवभोजन थाळी अंतर्गत मोफत जेवणाची व्यवस्था उपलब्ध करुन देण्यात आली होती. दरम्यान आता ही मुदत आणखी एका महिन्याभरासाठी वाढवण्यात आली आहे.
अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी पुढाकार घेऊन सादर केलेल्या याबाबतच्या प्रस्तावास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली आहे. 14 मे रोजी यासंबंधीचा निर्णय घेण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यात ब्रेक द चेन अंतर्गत राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आलेत. या पार्श्वभूमीवर शिवभोजन थाळीच्या राज्याच्या प्रतिदिन संख्येतही दीडपट वाढ करण्यात आली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे गरीब आणि गरजूंना मोठा दिलासा मिळाला आहे.
शिवभोजन थाळी १४ जून २०२१ पर्यंत मोफत!
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) May 21, 2021
कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव रोखण्यासाठी राज्यात सध्या ब्रेक द चेन प्रक्रिया संपूर्ण राज्यभर राबवण्यात येत आहे. लॉकडाऊनच्या काळात राज्यातल्या गोरगरीब जनतेचे हाल होऊ नयेत, यासाठी राज्य सरकारनं हा निर्णय घेतला. महाराष्ट्र राज्यात गेल्या 15 एप्रिल 2021 पासून शिवभोजन थाळी मोफत उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
हेही वाचा- PM Kisan:खात्यात अद्याप 2 हजार जमा झाले नाही? लगेचच करा 'या' नंबरवर फोन
किती लोकांनी घेतला योजनेचा लाभ
15 एप्रिल 2021 ते 20 मे 2021 पर्यंत 48 लाख 44 हजार 709 नागरिकांनी मोफत शिवभोजन थाळीचा लाभ घेतल्याची माहिती समोर आली आहे. कोरोनासारख्या अडचणी काळात मोफत शिवभोजन थाळीने राज्यातील गरीब जनतेला मोठा आधार मिळाला आहे.
राज्यभरात शिवभोजन थाळी योजना सुरु झाल्यापासून आतापर्यंत जवळपास 4 कोटी 27 लाख 81 हजार 306 थाळ्यांचे वितरण झाले. शिवभोजन योजनेअंतर्गत राज्यभरात एकूण 950 केंद्र सुरु आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Maharashtra, Uddhav thackarey