News18 Lokmat

ज्येष्ठ साहित्यिक आणि लेखिका शिरीष पै यांचं निधन

कथा, कविता, ललित लेखन, बालवाङ्मय, नाटक इत्यादी साहित्याच्या सर्व क्षेत्रात लेखिका शिरीष पै यांनी लेखन केलंय.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Sep 2, 2017 03:37 PM IST

ज्येष्ठ साहित्यिक आणि लेखिका शिरीष पै यांचं निधन

02 सप्टेंबर : ज्येष्ठ साहित्यिक, लेखिका आणि आचार्य अत्रे यांच्या कन्या शिरीष पै यांचं निधन झालं. त्या 88 वर्षांच्या होत्या. कथा, कविता, ललित लेखन, बालवाङ्मय, नाटक इत्यादी साहित्याच्या सर्व क्षेत्रात  लेखिका शिरीष पै यांनी लेखन केलंय.

शिरीष पै यांचा  १५ नोव्हेंबर १९२९ रोजी त्यांचा जन्म झाला होता. त्यांच्या घरातच साहित्य विविध अंगानी मुक्तपणे संचार करीत होतं. हे बाळकडू त्यांना बालपणापासून मिळत होतं. साहित्य विचाराचे संस्कार त्यांच्यावर आजूबाजूच्या वातावरणामुळे सतत होत असले तरी शिरीष पै यांची स्वतःची अशी एक शैली आहे. त्यांच्यातील वैशिष्ट्यपूर्ण अशा प्रसन्न शैलीतील ललित लेखिकेने वाचकांना आनंद दिला.

तसंच त्यांनी लिहिलेल्या कवितांनी काव्यप्रकाराला न्याय दिला. एक तारी, एका पावसाळ्यात, गायवाट, कस्तुरी, ऋतुचक्र इत्यादी त्यांचे कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत. मराठी कवितेत जपानी हायकूं हा प्रकार रूजविण्याचा मान शिरीष पै यांच्याकडे जातो.

लालन बैरागीण, हे ही दिवस जातील ह्या कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या. छोट्या मुलांसाठी आईची गाणी, बागेतल्या जमती या बाल साहित्याची निर्मिती केली तर चैत्रपालवी खडकचाफा, सुखस्वप्न, कांचनबहार हे त्यांचे कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. शिवाय हा खेळ सावल्यांचा, झपाटलेली, कळी एकदा फुलली होती ही त्यांनी लिहिलेली नाटकं. ललित साहित्याची त्यांची आजचा दिवस, आतला आवाज, प्रियजन, अनुभवांती, सय मी माझे मला ही पुस्तके गाजली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 2, 2017 03:37 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...