साई जन्मस्थळाचा वाद चिघळला, 'शिर्डी बंद'ला 25 गावांचा पाठिंबा

साई जन्मस्थळाचा वाद चिघळला, 'शिर्डी बंद'ला 25 गावांचा पाठिंबा

पाथरी ग्रामस्थांच्या कृतीचा निषेध करण्यासाठी शिर्डीकरांची रविवारीपासून शिर्डी बंदची हाक. आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी शिर्डीत ग्रामसभा

  • Share this:

हरिष दिमोटे (प्रतिनिधी) शिर्डी, 18 जानेवारी: रविवारपासून शिर्डीत बेमुदत बंद पुकारण्यात आला आहे. आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी शनिवारी ग्रामसभा बोलावण्यात आली आहे. पाथरीच्या विकासाला नव्हे तर पाथरीला साईबाबांची जन्मभूमी म्हणण्याला विरोध असल्याचं शिर्डीकरांनी स्पष्ट केलं. एकंदरीतच शिर्डी विरूद्ध पाथरी वाद चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिर्डी बंदला एकूण 25 गावांनी पाठिंबा दिला आहे.

शिर्डीत देश आणि विदेशातून साईबाबांचे भक्त भक्तीभावानं दर्शनासाठी येत असतात. मात्र रविवारपासून भक्तांना साईबाबांचं दर्शन घेता येणार नाही. शिर्डीकरांनी बेमुदत बंद पुकारल्यानं भाविकांना आता दर्शनासाठी सबुरी ठेवावी लागणार आहे. मुख्यमंत्र्यांनी मराठवाडा दौऱ्यावर असताना, साईबाबाचं जन्मस्थळ म्हणून पाथरीच्या विकास आराखड्याचं लवकरच भूमिपूजन केलं जाईल अशी घोषणा केली. त्या घोषणेनंतर शिर्डीत नाराजी पसरली.

साईबाबांचा जन्म,धर्म याबाबत साईचरित्रात स्पष्ट लिहलेलं असतानाही जन्मस्थानाविषयी दावे केले जातात. हे सर्व प्रकार निंदणीय असल्याचं शिर्डीतल्या नागरिकांनी सांगितलं.

साईबाबांच्या जन्मस्थळाचा कोणताही अधिकृत पुरावा नसताना सरकार साईबाबांचं जन्मस्थळ म्हणुन पाथरीचा विकास करण्यावर शिर्डीकरांनी आक्षेप घेतला आहे. या सर्व प्रकाराचा निषेध करण्यासाठी शिर्डीकरांनी बंदचं हत्यार उपसण्याचा निर्णय घेतला.

साईबाबांनी आयुष्यभर फकिराच्या वेशात राहुन दिनदुबळ्यांची सेवा केली. मात्र आता साईभक्तांच्या भावनेला व साईबाबांच्या विचारधारेला नख लावण्याचा प्रयत्न केला जात असल्याची भावना शिर्डीमध्ये पोहोचली आहे. त्यामुळे शिर्डी आणि पाथरीतला वाद सामोपचारानं सोडवण्याची गरज आहे

हेही वाचा-पंतप्रधान मोदींचे कौतुक करताना राहुल गांधीवर भडकले रामचंद्र गुहा

साईबाबांबद्दलचा 'हा' उल्लेख खटकला

साईबाबांनी हयातीत कधीही जन्मस्थळ, जात, धर्म उघड केला नाही. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘साईबाबांचे जन्मस्थळ असलेल्या परभणी जिल्हयातील पाथरीचा विकास करणार’ असा उल्लेख केल्याने शिर्डीकर व साईभक्त नाराज झाले आहेत.

यापूर्वी राष्ट्रपतींनी साईसमाधी शताब्दी सोहळ्यात साईबाबांच्या जन्मस्थळाचा उल्लेख केला होता. यावर नाराज झालेल्या शिर्डीकरांनी थेट राष्ट्रपतींची भेट घेऊन जन्मस्थळाचा खुलासा केला होता. त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांनीच थेट साईबाबांच्या जन्मस्थळाचा उल्लेख केल्याने शिर्डीकर व साईभक्तांमध्ये नाराजीचा सूर आहे. पाथरीच्या विकासाला आमचा विरोध नाही, मात्र पाथरी या गावाचा ‘साईबाबांचे जन्मस्थान’ असा उल्लेख करणे आक्षेपार्ह असल्याचे शिर्डीतील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. तरी लवकरच ग्रामस्थांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत. पाथरीच्या विकासाला मदत करण्याबाबत आमचा कोणताही आक्षेप नाही. मात्र पाथरी या गावाचा साईबाबांचे जन्मस्थान असा उल्लेख करण्याला साईभक्त आणी शिर्डीकरांचा आक्षेप आहे, असे शिर्डीकरांचे मत असल्याचे कमलाकर कोते यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री ठाकरे हे साईबाबांचे भक्त आहेत, त्यांनी शिर्डीकरांच्या या भावना जाणून घ्याव्यात, अशी गावकऱ्यांची अपेक्षा आहे. त्यासंबंधीची भूमिका गावकऱ्यांनी शनिवारी जाहीर केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.

काय म्हणाले होते मुख्यमंत्री?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबाद दौऱ्यावर असताना माध्यमांशी बोलताना त्यांनी साईबाबांचे जन्मगाव पाथरी असा उल्लेख करून पाथरीच्या विकासासाठी तीर्थक्षेत्र विकास आराखडा मंजूर झाला असून लवकरच भूमिपूजन करणार असल्याची घोषणा केल्यावर शिर्डीसह देश-विदेशातील साईभक्तांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. साईबाबांनी जगाला सर्वधर्म समभावाची शिकवण देऊन श्रध्दा आणि सबुरी हा मंत्र दिला. आयुष्यभर पडक्या मशिदीत राहून दीनदुबळ्यांची सेवा केली. साईबाबा कोणत्या जातीचे आहेत, ते कोठून आले याबाबत साईबाबांनी आपल्या हयातीत कोणाला सांगितले नाही. जे साईबाबांना मान्य नव्हते त्यावर चर्चाच नको हीच भूमिका आजवर साईभक्तांची राहिलेली आहे. बाबांविषयी अधिकृत माहिती साईसतचरित्रातच आहे. मात्र, मुख्यमंत्री साईभक्त असतानाही त्यांनी साईबाबांच्या जन्मस्थळाचा उल्लेख करून परत नव्या वादाला जन्म घातल्याने साईभक्तांच्या संघर्षाचा सामना मुख्यमंत्र्यांना करावा लागेल.

हेही वाचा-STFची यशस्वी कारवाई, कानपूरमधून 'डॉक्टर बॉम्ब' अटकेत

First published: January 18, 2020, 9:48 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading