नवी दिल्ली, 10 ऑक्टोबर : एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या वादामध्ये निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह गोठवलं, त्यानंतर आता निवडणूक आयोगाने ठाकरे आणि शिंदे गटाला नवीन नाव दिलं आहे, तसंच ठाकरे गटाला नवीन चिन्हही देण्यात आलं आहे. निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब आणि शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव दिलं आहे.
निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे गटाला धगधगती मशाल हे चिन्ह दिलं आहे, पण एकनाथ शिंदे गटाला अजून कोणतंही चिन्ह देण्यात आलेलं नाही. निवडणूक आयोगाने त्रिशूळ आणि गदा ही दोन्ही चिन्ह बाद केली आहेत. त्रिशूळाची शिंदे आणि ठाकरे दोन्ही गटाकडून मागणी करण्यात आली होती. धार्मिक चिन्ह असल्यानं निवडणूक आयोगाने त्रिशूळ आणि गदा ही दोन्ही चिन्ह बाद केली आहेत. शिंदे गटाला निवडणूक आयोगाकडून नव्याने तीन चिन्ह द्यायला सांगण्यात आली आहेत.
बाळासाहेबांची शिवसेना!!! सेना आमच्या साहेबांची.... नाही कोणाच्या बापाची....
— sheetal mhatre (@sheetalmhatre1) October 10, 2022
ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाला त्रिशूळ, उगवता सूर्य आणि धगधगती मशाल ही तीन चिन्ह पाठवण्यात आली, तर शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे आणि शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे अशा तीन नावांचा प्रस्ताव ठेवण्यात आला.
शिंदे गटाकडून सुद्धा उगवता सूर्य, गदा आणि त्रिशूळ ही तीन पक्ष चिन्ह मागण्यात आली होती. बाळासाहेबांची शिवसेना, बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना बाळासाहेबांची अशी 3 नावं शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे पाठवली आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Eknath Shinde, Election commission, Shivsena, Uddhav Thackeray