राहुल खंडारे, प्रतिनिधी
बुलढाणा, 5 डिसेंबर : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजप नेते छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे चांगलेच अडचणीत सापडले आहेत. राज्यपालांनंतर सुधांशू त्रिवेदी आणि मग प्रसाद लाड यांनी केलेल्या वक्तव्यामुळे विरोधक चांगलेच आक्रमक झाले. शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाल्याचं विधान प्रसाद लाड यांनी कोकण महोत्सवाच्या कार्यक्रमात केलं.
प्रसाद लाड यांच्या या विधानाचा फक्त विरोधकच नाही तर शिंदे गटाच्या आमदारांनीही चांगलाच समाचार घेतला आहे. गुलाबराव पाटील यांच्यानंतर आता संजय गायकवाड यांनीही प्रसाद लाड यांच्यावर निशाणा साधला आहे. प्रसाद लाड यांचा जन्म पाकिस्तानात झाला का? हे तपासावं लागेल, असा टोला संजय गायकवाड यांनी लगावला.
गुलाबरावही आक्रमक
दरम्यान राज्य सरकारमधील मंत्री गुलाबराव पाटील हेदेखील या मुद्द्यावरून आक्रमक झाले आहेत. पद गेलं खड्ड्यात, पण शिवाजी महाराजांचा चुकीचा इतिहास ऐकून घेतला जाणार नाही, असा इशारा गुलाबराव पाटील यांनी दिला होता.
राज्यपालांविरोधातही गायकवाड आक्रमक
याआधी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्यावरही संजय गायकवाड चांगलेच आक्रमक झाले होते. या राज्यपालाला कुठंही नेऊन घाला, भगतसिंग कोश्यारी यांना राज्याच्या राज्यपाल पदावरून काढा. अशा प्रकारचा छत्रपतींचा अपमान होत राहिला तर आम्ही खपवून घेणार नाही, अन्यथा याचे परिणाम शिंदे-फडणवीस सरकारवर होईल, असा इशारा संजय गायकवाड यांनी दिला होता. संजय गायकवाड यांच्या या भूमिकेचं राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी कौतुक केलं होतं.
'...त्यांच्या धाडसाबद्दल आभार', सुप्रिया सुळेंकडून शिंदेंच्या आमदाराचं उघड कौतुक
प्रसाद लाडांकडून वक्तव्य मागे
भाजप आमदार प्रसाद लाड यांनी केलेलं वक्तव्य हे त्यांनी मागे घेतल आहे. आपलं वक्तव्य चुकलं असल्याचंही त्यांनी सांगितलं असल्याचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP