Home /News /maharashtra /

शीतल आमटेंना एकटे का सोडलं? फेसबुकवर डिलीट केलेली 'ती' पोस्ट आली समोर

शीतल आमटेंना एकटे का सोडलं? फेसबुकवर डिलीट केलेली 'ती' पोस्ट आली समोर

शीतल आमटे यांच्या सासू सुहासिनी आणि सासरे शिरीष करजगी यांनी फेसबुकवर आमटे कुटुंबाला प्रश्न विचारणारी पोस्ट टाकली होती.

    हैदर शेख, प्रतिनिधी चंद्रपूर, 02 डिसेंबर : कुष्ठरोगांच्या जखमेवर फुंकर घालणारे ज्येष्ठ समाजसेवक स्व. बाबा आमटे (Baba Amte)  यांची नात आणि आनंदवनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी  डॉ. शीतल आमटे (sheetal amte karajgi) यांच्या मृत्यूनंतर नवी घडामोड पुढे आली आहे. निराशेत असलेल्या मुलीला आमटे कुटुंबाने एकटे सोडल्याचा आरोप एका फेसबुक पोस्टमध्ये (Facebook) करण्यात आला आहे. शीतल आमटे यांच्या सासू सुहासिनी (Suhasini Karjagi )आणि सासरे शिरीष करजगी (Shirish Karjagi ) यांनी फेसबुकवर आमटे कुटुंबाला प्रश्न विचारणारी पोस्ट टाकली होती. अत्यंत व्यथित झाल्याने त्यांनी आपले मन मोकळे केल्याचा दावा करण्यात आला आहे. सेवाव्रती आमटे कुटुंबाने सेवाप्रकल्प चालविताना-अधिकार देताना मुलगा-मुलगी भेद केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. ज्या कौस्तुभ आमटे यांना विश्वस्तानी काढुन टाकले त्यांना दिवाळीच्या सुमारास पुन्हा कसे घेण्यात आले, असा सवाल विचारला आहे. करजगी दाम्पत्याच्या फेसबुक खात्यावरील ही पोस्ट सध्या डिलीट करण्यात आली आहे. डॉ. शीतल यांचे पती गौतम करजगी यांनी अशी पोस्ट सुहासिनी करजगी यांनी लिहिली असल्याची पुष्टी मात्र केली असून या घटनाक्रमावर कुठल्याही प्रतिक्रियेस नकार दिला आहे. अशी होती ती डिलिट केलेली पोस्ट "हे पत्र मी दोन दिवांपूर्वीच लिहिले होते व आज तिच्या कुटुंबियांनी ( संपूर्ण आमटे परीवार) कडून तिला दिला गेलेला त्रास तिला सहन न झाल्यामुळे तीनी स्वतःला संपवले......The End. 25-11-2020 च्या लोकसत्ता व अनेक पेपरमध्ये शितलच्या मानसिक आजाराबद्दल बातमी वाचली. खूप वाईट वाटले व आश्चर्य पण वाटले. यावर कांही प्रतिक्रिया  द्यावी की, चूप राहवे हे कळत नव्हते. परंतु, शेवटी विचार केला की शितल ‘आमटे‘असून तिच्या बाबतीत जर असा अन्याय होतो आहे,  तर  बाकी सामान्य मुलींचे काय होत असेल ? आमटे कुटुंबांनी (तिच्या स्वतःच्या आई- वडिलांनी व काका- काकूंनी) तिचा बद्दल असे संयुक्त निवेदन( स्वाक्षरी करून) द्यावे ह्या सारखी लाजीरवाणी गोष्ट आणखीन काय असू शकते. ज्या दिवशी गौतम- शीतलचे लग्न झाले त्या दिवसांपासून शीतल ला मी माझी मुलगीच मानले. आणि त्याच हक्काने आज मी आमटे कुटुंबीयांना काहीं प्रश्न विचारते. 1. शीतलने संस्थेच्या कामात खूप योगदान दिले आहे, असं तुम्हीच लिहले आहे, मग जर शीतलला आज काही मानसिक ताण व नैराश्य आहे तर तिला संभाळणे व आपुलकीने तिला जवळ न घेता, तिच्याशी न बोलता, तिला दूर का लोटले जाते आहे ? कारण आनंदवनात सगळया handicapped ( mental/ physical) लोकांची काळजी घेतली जाते मग सख्या मुली बाबत बोभाटा का? की या मागे आमटे कुटुंबाचा काहीं स्वार्थ आहे ? डॉ. प्रकाश आमटे यांना तर मुक्या प्राण्यांची भाषा कळते व ते त्यांच्याशी संवाद पण करतात, मग स्वतःच्या पुतणीशी संवाद साधता आला नाही त्यांना ? सोशल मीडियावर बदनामी करण्याची गरज काय ? 2. कौस्तुभ आमटे ह्यास परत विश्वस्थ मंडळावर घेतले. मला विचारावेसे वाटते की त्याला काढले का होते ? खास गोष्ट म्हणजे ज्या सगळया ट्रस्टींनी त्याला काढले त्यांनीच त्याला परत घेतले. तर आमचा सारख्या असंख्य लोकांना हे विचारावेसे वाटते की, त्याला ट्रस्टी म्हणून काढण्या मागचे कारण काय होते व आता परत घेतले तर त्यानी अशी काय विशेष कामगिरी केली? मागचा 4-5 वर्षांपासून तर कौस्तुभ आमटेचे नाव पण कुठे वाचण्यात आले नाही. इतक्या वर्ष तो होता कुठे ? की आमटे कुटुंब पण सर्व सामान्य माणसान प्रमाणे मुलगा ( घराण्याचा वारस) आणि मुलीमध्ये फरक करतात. आज मी सर्वांना खुले आव्हान करते की, आनंदवनला जावे व शीतल आणि गौतम यांनी जे काम केले आहे ते स्वतःच्या डोळ्यांनी बघावे. आणि मग काय ते ठरवावे. आमटेंना सारख्या नावाजलेल्या लोकांनी पण मुला - मुलींमध्ये फरक करावा ही खरंच लाजीरवाणी गोष्ट आहे. नाही का ? उंची न अपुली वाढते फारशी वाटून हेवा। श्रेय ज्याचें त्यास द्यावें, एवढें लक्षांत ठेवा। ती पूर्वजांची थोरवी त्या पूर्वजांना गौरवी। ती न कामी आपुल्या, एवढें लक्षांत ठेवा। कौस्तुभ आमटे च्याबाबतीत वरच्या ओळी अगदी योग्य ठरतील. ज्या प्रचंड गतीने व डेडीकेशनने आज व मागच्या अनेक वर्षांपासून शितल व गौतमनी आनंदवनात काम केले आहे त्याला तोडच नाही. त्या बद्दल आम्हाला त्या दोघांचा खूप खूप अभिमान वाटतो. इंथे मला आमटे लोकांना आणखीन एक प्रश्न  विचारावासा वाटतो की, एक मानसिक नैराश्य असलेली व्यक्ती एवढे प्रचंड  जबाबदारीचे काम कसे काय करू शकेल? आज आता मी आनंदवनातच आहे व शीतल व गौतम शिवाय इंथे आमटे कुटुंबातील एकही जबाबदार व्यक्ती उपस्थित नाही. तिच्या व्यतिरिक्त एकही डॅाक्टर नाही. शीतल एकटीच दवाखान्यातील सगळ्या आजारी लेप्रसी पेशंटची काळजी घेते आहे. मग ती जर स्वत: मानसिकरित्या आजारी आहे ( तीच्या आई-वडिलांनी पत्रात लिहल्या प्रमाणे) तर सगळे आमटे तिच्या भरोशावर पूर्ण आनंदवन सोडून हेमलकशाला काय करतात आहेत ? सगळे आमटे शितल- गौतम च्या विरूद्ध कट-कारंस्यान तर रचत नाहीये ना ? विकास आमटे व प्रकाश आमटे यांना याबद्दल हे सगळं लिहण्याची वेळ माझ्यावर यावी हे माझे दुर्भाग्यच आहे. त्यांनी जनाची नाही तर मनाची लाज बाळगावी एवढेच माझे म्हणणे आहे. शीतलला ला कसलाही मानसिक त्रास नाही व हा त्रास तिच्या वर जबरदस्तीने लादला जातोय व तो पण तिच्या सख्या आई-वडिलांकडून हे तीचे खरं दुर्भाग्य आहे. शेवटी एवढेच सांगावेसे वाटते की, आमचे पुर्ण करजगी कुटुंब सदैव तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे व पुढे पण राहू. सुहासिनी करजगी शिरीष करजगी दरम्यान, शीतल आमटे यांच्यावर सोमवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. शीतल आमटे यांचे चुलत रात्री उशिरा बंधू डॉ. दिगंत प्रकाश आमटे यांची प्रतिक्रिया प्रसार माध्यमांनी जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता ते म्हणाले की, 'आमच्यासाठी हे सगळं अत्यंत धक्कादायक आणि अनपेक्षित आहे. आम्ही सर्व जण धक्कामध्ये आहोत. सध्या काहीही सांगण्याच्या मन:स्थितीत नाही' असं सांगत त्यांनी पुढे काही बोलण्यास नकार दिला. डॉ.शीतल आमटे यांनी सोमवारी सकाळी  आनंदवन येथील आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली. शीतल यांनी विषाचे इंजेक्शन घेतल्याची माहिती समोर येत असून, हे विष घेतल्यावर त्यांना तातडीने वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले, पण शेवटी त्यांची प्राणज्योत मालवली. कौटुंबिक वादाची पार्श्वभूमी! मध्यंतरीच्या काळात शीतल आमटे यांनी फेसबुकवर एक व्हिडीओ लाईव्ह करून आनंदवनातील महारोजी सेवा समितीच्या कामाबद्दल आणि संस्थेतील विश्वस्तांबद्दल नाराजी व्यक्त करत गंभीर आरोप केले होते. त्यांच्या या आरोपांमुळे एकच खळबळ उडाली होती. पण, दोन तासांनंतर त्यांचा फेसबुकवरील हा व्हिडीओ डिलीट करण्यात आला होता. त्यांच्या या व्हिडीओमुळे आमटे कुंटुंबातील वादावर चर्चा रंगली होती. परंतु, आमटे कुटुंबाकडून एक पत्रक प्रसिद्ध करून सर्व आरोप फेटाळून लावण्यात आले होते.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या