जितेंद्र जाधव, (प्रतिनिधी)
बारामती, 19 जून- शहरात अल्पवयीन मुलीवर सशस्त्र हल्ला करण्यात आला होता. या मुलीचा मंगळवारी उपचारादरम्यान पुण्यात मृत्यू झाला. हल्ला करणारा आरोपी बालाजी उर्फ बाल्या अनिल माने हा अद्याप फरार आहे. वैष्णवी उर्फ चिमी अशोक जाधव असे मृत मुलीचे नाव आहे. विशेष म्हणजे वैष्णवी ही मटका किंग कृष्णा जाधव खून खटल्यातील आरोपी होती.
वैष्णवी हिच्यावर सोमवारी (17 जून) रात्री पावणेनऊच्या सुमारास स्टेडियम जवळील, सांस्कृतिक केंद्रानजीक धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला होता. या घटनेत ही मुलगी गंभीर जखमी झाली होती. तिच्यावर पुण्यातील ससून हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मंगळवारी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या घटनेने बारामतीत खळबळ उडाली होती. पोलिसांनी शहरात अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला आहे.
खुनी हल्ला झालेली ही मुलगी मटका किंग कृष्णा जाधव खून खटल्यातील आरोपी होती. जाधव खून खटल्यातील 21 आरोपींवर पोलिसांनी मोक्कांतर्गत कारवाई केली आहे. या मुलीचाही त्यात समावेश होता. परंतु,अल्पवयीन असल्याने तिच्यासह अन्य काही अल्पवयीन आरोपींची 'मोक्का' कोर्टाने जामिनावर सुटका केली होती. त्यामुळे ही मुलगी तुरूंगाबाहेर आली होती. गुन्हेगारी कारवायांमध्ये तिचा यापूर्वी सहभाग राहिला आहे.
खंडणी दिली नाही म्हणून झाला होता मटका किंगचा खून..
मटका किंग कृष्णा जाधव याने खंडणी दिली नाही म्हणून गतवर्षी 5 नोव्हेंबरला त्याचा निर्घृण खून करण्यात आला होता. दिनेश रावसाहेब वायसे, विनोद शिवाजी माने, गणेश विठ्ठल माने, अनिल संभाजी माने, सुनील संभाजी माने, प्रेम दिनेश वायसे, अविनाश जाधव, संदीप जाधव, चिमी ऊर्फ वैष्णवी अशोक जाधव, रवी माकर, मोठ्या बिट्या ऊर्फ सचिन रमेश जाधव, लोकेश परशुराम ऊर्फ दत्तात्रय माने, गुलाब उत्तम माने या सर्वांनी संगनमत करून कट रचून कृष्णा जाधव याचा धारदार हत्याराने खून केला होता.
VIDEO: बिग बी अमिताभ बच्चन यांची नात का होतेय ट्रोल?