Home /News /maharashtra /

बारामतीच्या पाण्यावरून शरद पवारांचे जशास तसे उत्तर, भाजप नेत्यांचा तिळपापड

बारामतीच्या पाण्यावरून शरद पवारांचे जशास तसे उत्तर, भाजप नेत्यांचा तिळपापड

बारामतीला पाणी बंद करण्यास खासदार रणजितसिंह नाईक – निंबाळकर आणि रणजितसिंह मोहिते पाटील यांनी माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या माध्यमातून भाग पाडले होते.

बारामती, 20 फेब्रुवारी : भाजप सरकार सत्तेत असताना मोहिते पाटलांनी बारामतीचे पाणी बंद करून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना शह दिला होता. परंतु, सत्तेच्या सारीपाटावर राजकारणाचा डाव उलटला. महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर फडणवीस यांनी घेतलेल्या निर्णयांना स्थगिती देण्यात आली. बारामतीसाठी महत्त्वाच्या असलेल्या नीरा डाव्या कालव्याचा निर्णयही रद्द करण्यात आला असून या निर्णयामुळे भाजप नेत्यांचा डाव त्यांच्यावर उलटवण्यात पवारांना यश आलंय. ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत नीरा डाव्या कालव्याचं पाणी पुन्हा एकदा बारामतीसाठी सोडण्याचा घेण्यात आलेल्या निर्णयावर माढा मतदारसंघातील नेते आक्रमक झाले असून नीरा देवघरचे पाणी पेटणार अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. निरा – देवघरचे पाणी बारामतीला शरद पवारांनी वळवले असल्याचा ठपका ठेवून तत्कालीन भाजप सरकारला ते पाणी बंद करण्यास खासदार रणजितसिंह नाईक – निंबाळकर आणि रणजितसिंह मोहिते पाटील यांनी माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या माध्यमातून भाग पाडले होते. त्यावेळी त्या प्रश्नावरून मोठे राजकारण तापले होते. परंतु, राज्य सरकारच्या झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत नीरा डाव्या कालव्याचं पाणी पुन्हा एकदा बारामतीसाठी सोडण्याचा घेण्यात आला आहे. त्यामुळे दुष्काळी भागातील हक्काच्या पाण्यावर पुन्हा एकदा ‘दादा’ गिरी होत असल्यानं यावरून राजकारण तापले असून बेकायदेशीर पाणी वापरास आपला विरोध असल्याचं निंबाळकर यांनी सांगितलं. सांगोलयाचे शिवसेना आमदार शाहजीबापू पाटील यांनी मंडळात काल झालेला निर्णय हा अधिकृत आहे का नाही हे पाहून निर्णय घेऊ मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आमच्यावर अन्याय करणार नाही, अशी भूमिका आमदार शाहजी पाटील यांनी घेतली आहे. तर ज्येष्ठ माजी आमदार गणपतराव देशमुख यांनी खासदार निंबाळकर यांनी घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी झाली आहे का हे मला माहित नाही पण ज्या भागाला उन्हाळी पाण्याची आवश्यकता आहे. त्या भागाला पाणी मिळाले पाहिजे, अशी भूमिका माजी आमदार गणपत राव देशमुख यांनी घेतली आहे. तर माळशिरसचे आमदार राम सातपुते यांनी झालेले पाणी वाटप हे सम न्यायी नसून अन्यायी आहे, असा आरोप केला आहे. तसंच 'पाण्यासाठी जन आंदोलन उभा करू, असा इशारा आमदार राम सातपुते यांनी दिला. तरदुसरीकडे पाण्यासाठी रस्त्यावर उतरू असा पवित्रा लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी घेतला आहे. आता या निर्णयामुळे सोलापूर जिल्ह्यातील शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसच्या  नेत्यांची कोंडी झाली असून पाणी पुन्हा माढा, सोलापूरला मिळणार का असा प्रश्न निर्माण होतोय. काय आहे निरा उजवा व डावा कालव्याच्या पाण्याचा निर्णय? परंतु,  निरा देवघर आणि गुंजवणी धरणाचे कालवे कार्यान्वित नसल्यामुळे विना वापर राहणारे पाणी समन्यायी तत्वावर तात्पुरत्या स्वरुपात निरा उजवा आणि डावा कालवा येथील लाभक्षेत्रास वाटप करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.  याचा फायदा दोन्ही कालव्यांच्या क्षेत्रात झालेले नागरीकरण, औद्योगीकरण, कृषीपूरक उद्योग, साखर कारखाने, फळबागांना होईल. निरा देवघर धरणाचे काम सन -2007 मध्ये पूर्ण असून 11.73 टीएमसी उपयुक्त पाणीसाठा निर्माण झालेला आहे.  गुंजवणी धरणात सन 2018 पासून  3.69 टीएमसी पाणीसाठा निर्मीत झालेला होता. या दोन्ही प्रकल्पांच्या कालव्याची कामे अपूर्ण असल्याने त्यांच्या नियोजित लाभक्षेत्रात पाणी वापर होऊ शकत नाही, ही बाब विचारात घेऊन या पाण्याचा वापर होण्याच्या दृष्टीने या दोन्ही धरणात उपलब्ध होणारे मूळ प्रकल्पाची गरज भागल्यावर शिल्लक राहणारे पाणी निरा डावा कालवा आणि निरा उजवा कालवा यात समन्यायी तत्वावर वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला. हे वाटप निरा डावा कालवा 55 % व निरा उजवा कालवा 45 % असे राहील. या निर्णयामुळे दोन्ही कालव्याच्या लाभक्षेत्रामध्ये समन्यायी तत्वावर 2427 हेक्टर/टीएमसी या प्रमाणात पाणी सिंचनासाठी उपलब्ध होईल. निरा डावा कालव्याच्या लाभक्षेत्रातील पुरंदर आणि बारामती, इंदापूर तालुक्यातील 37070 हे. लाभक्षेत्राला आणि निरा उजव्या कालव्याच्या खंडाळा, फलटण, माळशिरस, पंढरपूर सांगोला तालुक्यांच्या 65506 हे. लाभक्षेत्राला फायदा होईल. आठ तालुक्यातील ग्रामीण / शहरी भागाच्या पाणी पुरवठा सुरळीत होण्यास मदत होईल. निरा उजव्या कालव्याच्या लाभक्षेत्रातील बिगर बारमाही पंढरपूर आणि सांगोला तालुक्यातील ब्रँच 2 च्या खालील वितरीकांना उन्हाळी हंगामामध्ये सिंचनासाठी आणि पिण्यासाठी पाणी उपलब्ध होईल. तसंच या दोन्ही कालव्यांच्या लाभक्षेत्रात झालेले नागरीकरण, औद्योगिकरण आणि परिसरातील कृषीपुरक उद्योग जसे साखर कारखाने, दुग्धव्यवसाय, पोल्ट्री फॉर्म आणि फळबागांवर अवलंबून असणारे उद्योग सुरळीतपणे चालू राहतील.

तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)

Published by:sachin Salve
First published:

Tags: Baramati, Baramti, Indapur, News

पुढील बातम्या